पाठलाग (मराठी भयकथा) भाग ९

 पाठलाग (मराठी भयकथा) भाग ९

आकाशला जिवंत बघून जयेश आणि चंदू जरी खुश झाले पण त्याला वाचविणं तितकंच अवघड होतं. आजू बाजूला रात्रीचा काळकभिन्न अंधार होता,त्यात त्या महालाच्या काळ्या पाषाणातल्या उंच उंच पण छत नसलेल्या दगडी भिंती अजस्त्र राक्षसांसारख्या भासत होत्या. या भिंतीच्या भुलभुलैय्या मध्ये खूप आतवर ते धन असलेलं दालन होतं आणि तिथेच सगळे जमून आता आज शेवटचा प्रयोग करणार होते आणि हे नाट्य संपणार होतं.
नियतीचा खेळ कसला अजीब होता गेल्या दशकात जे साधू आणि वसंत मिळून करू शकले नाहीत ते वसंताच्या मुलांनी आणि जावयाने काही महिन्यातच करून दाखवलं. आज त्यांनी उरलेले सात जण जमवले होते आणि योजनाबद्ध रित्या धन नेण्यासाठी मोठं वाहन लागेल म्हणून बस सुद्धा घेऊन आले होते.
साधू खूप आनंदित होता त्याच्या प्रमाणेच वसंत आणि त्याचा परिवार सुद्धा आनंदी होता कारण आजपासून त्यांचं नशीब बदलणार होतं.
अंधारात अक्षय आणि मोन्या ने मशाली पेटवल्या आणि तिथे धगधगता उजेड झाला. तिथे आधी येऊन साधूने पिशचांना आधीच जागृत केलेलं होतं त्यामुळे आत पुढचे सोपस्कार पार पडायचे होते. वसंत आणि साधूने आकाशला एक कोपऱ्यातून बाहेर काढताच केतनने पटकन त्याच्या तोंडावरची पट्टी काढून त्याच्या तोंडात गुलाबी फळ कोंबलं आणि पट्टी परत लावून मग ओरडला, "हे फळ घे खाऊन भूक लागली असेल तुला उपाशी नको मरुस"
हे वाक्य एकूण आकाशला वाटलं की हे फळ मला खरच खाण्यासाठीच दिलं आहे म्हणून त्याने ते आतल्या आत खाल्लं आणि तो नशेसमान गुंगीत गेला.
आकाशला गुंगी आली होती. भिंतीपलीकडून अंधारातून लपून जयेश आणि चंदू मशालीच्या उजेडात चालणार यांचा हा सगळं खेळ बघत होते . त्या साधू ने त्या हौदाच्या बाजूला सात चौकोन आखले होते. आणलेल्या सगळ्यांना एक एक करून चौकोनात बसवायचं होतं आणि मग पुढचा विधी .
इकडे जयेश आणि चंदू ची तगमग वाढत होती कारण अजूनही पोलीस आले नव्हते. आता त्यांनाच काहीतरी करणं भाग होतं . चार मूलं अनुक्रमे राहुल, विनीत, केतन आणि आकाश यांच्या सोबत तीन अनोळखी मुली असे सातजण जिवाच्या संकटात होते. आज शेवटची रात्र होती आणि मग परत फिरून या जंगलात यायचंच नाही हा विचार सगळेच करत होते अगदी जयेश आणि चंदू सुद्धा .
इकडे पोलिसांना आणायला गेलेला दिलीप चढ चढून दमला होता घाम पुसत तो कसा बसा वरती आला त्याला खूप भूक लागली होती आणि समोर हवे तेवढे स्वादिष्ट गुलाबी फळं दिसत होते. काय करावं सुचत नव्हतं भुकेने तो व्याकुळ झाला पण फळं न खाताच चालत होता. रस्त्यात गुलाबी फळांचा खच पडला होता. अगदी मनात विचार यायचा कि अर्धच फळ खावं म्हणजे कमी गुंगी येईल इथपर्यंत भूक वाढली होती.
शेवटी काहीतरीइलाज करायचा म्हणून खिशात हात घातला आणि तेच पांढरं फुल काढून खाल्लं आणि चमत्कार झाला त्याची भूक एका मिनिटात कुठल्या कुठे पळून गेली. तो अतिशय ताजातवाना झाला. खरं तर हे सगळे मनाचे खेळ होते त्या शक्ती तिथून जाणाऱ्यांच्या मनावर ताबा मिळवून त्याला भूक लागण्याची जाणीव त्याच्या मेंदूकडे पाठवित असत. पण काही थोडं जरी खाल्लं तरी ती जाणीव तोडता येत होती आणि दिलीप ने देखील ते साध्य केलं. आता तो पोलिसांच्या दिशेने झपाझप पावले टाकत जाऊ लागला. आता वळणाचा रस्ता संपून सरळ रस्ता दिसत होता. दूरवर नजर जाईल तिथवर काळोखच होता पण हळूहळू दूरवर अंधारात काहीतरी चमकत होतं थोडासा बिचकतच पण पोलिसांना गाठण्याच्या उद्धेशाने दिलीप झपझप चालू लागला. ती चमकणारी वस्तू जसजशी जवळ येऊ लागली तसतसे तिथे रस्त्यावर काहीतरी आकृत्या हलत आहेत असं वाटत होतं.
दिलीप च्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला, जे काही आहे ते रस्ता अडवूनच होतं त्यामुळे त्याला ओलांडून कस जाणार या विचारात त्याचा वेग कमी झाला पण तरीही तो सावधपणे पुढे चालतच राहिला होता .
जसजसा दिलीप अंधारात रस्त्यात पुढे चालत होता तसतशी ती पुढची आकृती थोडी थोडी नीट दिसू लागली ते काहीतरी वाहन असावं आणि दिलीप आनंदित झाला आणि ती पोलिसांची गाडी असू शकते म्हणून तो धावतच पुढे निघाला. तो जवळ पोचला ती खरोखर पोलिसांचीच गाडी होती. तिच्यात सहा पोलीस कर्मचारी आलेले होते. पण गुलाबी फळ खाण्याच्या नादात त्यांना गुंगी आली होती दोन अधिकारी मधल्या सीटवर तर बाकीचे दोन खाली रस्त्यावर गाडीला टेकून बसले होते आणि दोन अनुक्रमे ड्राइव्हर सीटवर आणि शेजारी असे बसले होते.
दिलीप ने ताबडतोब गाडीचा दरवाजा उघडून मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं,
"मला जयेश ने पाठवलं आहे तुम्हाला घ्यायला , मला माहितीये तुम्हाला नशा कशाने आली ते, त्यावरचा इलाज देखील आहे माझ्या कडे"
एका दमात एवढं बोलून दिलीप पुढच्या कामाला लागला.
त्याने खिशात खूप सारे पांढरी फुलं आणली होती, ती त्याने दोघं अधिकाऱ्यांना दोन दोन खायला दिली त्यांनी हि विश्वास ठेवून ती खाल्ली. दिलीप बाकी च्या कर्मचाऱ्यांना फुलं देतो तोपर्यंत आधीचे अधिकारी बऱ्यापैकी भानावर आले होते प्रत्येकाला दोन दोन फुलं दिले त्यामुळे सगळे लवकर साधारण झाले.
दिलीप त्यांना पुढील माहिती देऊ लागला , "साहेब तिकडे सहा पोरांचा जीव धोक्यात आहे प्लिज लवकर चला त्यांना बळी देण्याची तयारी चाललेली दिसत होती " आकाशला अजून दिलीपने पाहिलं नव्हतं त्यामुळे तो फक्त सहा मुलं म्हटला होता.
दिलीप च बोलणं एकून त्यावर एक तरुण पोलीस निरीक्षक म्हणाला , "अरे बापरे सहा जणांचा बळी ?? आपल्याला लवकर जायला हवं , अण्णा गाडी घ्या लवकर"
त्यासरशी सगळे गाडीत बसले आणि अण्णा नावाच्या कर्मचाऱ्याने गाडी काढली व सगळे त्या रस्त्याला लागले. गाडीत दिलीपने जे काही पाहिलं होत ते सगळं त्यांना सांगितलं. आता अंधाऱ्या वाटेवर गाडी भरभर पुढे पळत होती. एक कर्मचाऱ्याने रेडिओ वरून त्यांच्या मुख्य स्टेशनला इथे घडत असलेल्या घटनेविषयी माहिती दिली आणि आणखी कुमक लागली तर तयार राहा असं देखील सांगितलं. दिलीप ने आधी सांगितलं असल्यामुळे आता चुकूनही त्या गुलाबी फळाला कोणी हात लावत नव्हतं .
आता गाडी उताराला लागली होती.
*
दगडी हौदाच्या बाजूला सात चौकोनात सातजण बसवले होते सांधू ने सगळ्यांना शांत रहायला सांगितलं, त्यांचे हात पाय तोंड मोकळे केले कारण असेही ते थोडेसे गुंगीतच होते आणि त्यांच्या कपाळाला कसला तरी टिळा लावला. हे
केतन अक्षय मोन्या त्यांच्या बायका वसंत त्याची बायको मीना हे सगळे हा प्रकार बघत होते आणि मनातून खूप खुश होते. मशालींच्या उजेडात त्यांच्या चेहऱ्यावरचा आसुरी आनंद आगीसारखा भेसूर दिसत होता.
आता साधू हौदाच्या भिंतीवर असलेल्या अपरिचित देवतेच्या मूर्तीजवळ आला तिची पूजा करून लागला.
जयेश आणि चंदूचा मात्र आता संयम सुटला होता कारण त्यांच्या मित्रांचा त्यांच्या देखत अंत होणार एवढा अंदाज त्यांनी बांधला होता.
"चंदू चल यांचा खेळ बंद पाडू आपण .. " जयेश बोलला.
"ते कस ?" चंदू चा प्रश्न आला.
"अरे दिलीप ला जाऊन खूप वेळ झाला पोलीस आता कोणत्याही क्षणी येतीलच तोपर्यंत आपण यांचा टाईमपास करू .. " एवढं बोलून जयेश घाईने त्या हौदाकडे निघाला सोबत अर्थातच चंदू देखील निघाला.
साधू ने मूर्तीची पूजा केली आणि मोठयाने ओरडला, "आज सातजण देतोय, राहिलेले सातजण S , सात S .. ." आता सगळे सोपस्कार झाले फक्त शिलालेखावरील तिसरी ओळ वाचून पटकन तिथून निघायचं बाकी होतं, तेवढ्यात मागून जोराचा आवाज आला ,
"थांबा "
तो जयेशचा आवाज होता.
सगळेजण आवाजाच्या दिशेने पाहू लागले कारण या ठिकाणी या वेळी कोणी मनुष्य असणं त्यांना अपेक्षित नव्हतं.
तोपर्यंत जयेश अन चंदू दोघेही चालत पुढे आले त्यांना बघून केतन, मोन्या आणि अक्षय रागाने लालबुंद झाले.
"तर्रर्रर्र तुम्ही आलातच का इथे मारायला साल्यांनो.. " केतन रागाने बोलला.
या ठिकाणी दोन केतन होते एक केतन जो दिगू नाना चा भाचा होता तो चौकोनात गुंगीत बसलेला होता आणि हा एक नीच वृत्तीचा केतन ज्याने हा सगळं डाव घडवला होता.
"हो आलो कारण आमच्या मित्रांना तुम्ही असं मारू शकत नाही ." चंदू बोलला.
"अरे वा मग तुम्ही पण मरा त्यांच्या सोबत " असं म्हणत वसंत ने कमरेला लावलेल पिस्तूल काढलं आणि दोघांच्या दिशेने ताणून धरलं.
साधू ने धावत जाऊन वसंताचा पिस्तूल धरलेला हात खाली घेतला आणि खुणेनेच असं काही न करण्यास सांगितलं. वसंतने नाईलाजाने तो हात खाली घेतला आणि जयेश व चंदू ला उद्देशून बोलू लागला ,
"कोण आहेत रे तुम्ही ? कशाला मरायला आलात इथे आत्ताच्या आत्ता निघा इथून तुम्ही दोघेच आहात आमच्या पुढे, इथेच तुम्हाला मारून गाडून निघून जाऊ कळणार देखील नाही, निघा इथून "
यांना इथून हाकलून चालणार नाही कारण हे असेच बाहेर गेले तर बोभाटा होईल आणि पोलिसांपर्यंत प्रकरण जाईल म्हणून ताबडतोब केतन मध्ये पडत म्हणाला,
"हे बघा तुम्ही स्वतः विनाकारण आमच्या मध्ये पडू नका नाहीतर आम्हाला तुम्हाला नाईलाजाने ठार करावं लागेल त्यामुळे आता आलाच आहेत तर जरा आमच्या सोबत सहकार्य करा तुम्हाला देखील आम्ही याचा फायदा आम्ही मिळवून देऊ " केतनने सारवासारव केली.
"आम्ही इथे फायद्या तोट्यासाठी नाही आलो , आम्ही इथे आमच्या मित्रांना वाचवायला आलोय, त्यामुळे तुम्ही हा सगळं खेळ थांबवा नाहीतर परिणाम खूप वाईट होतील " जयेश ओरडून बोलला. त्याच्या ह्या बोलण्याने सगळे आश्चर्यचकित झाले कारण हे दोघे फक्त होते आणि वरून जयहस परिणामांची धमकी देत होता.
भिंतीवर बसलेलं पिशाच आता खाली उतरलं ते खाली उतरताच त्यासरशी हवेत सर्रर्रर्रर्र करत गारवा वाढला आणि थंडी वाजू लागली. पण तो पिशाच कोणाला दिसत नव्हता.
साधूला कळून चुकलं की आपल्याला विलंब होतोय आणि ती जाणीव करून द्यायला कोणतं तरी एक पिशाच जवळपास फिरत आहे.
सगळ्यांना अचानक वाढलेल्या गारव्याने थंडी जाणवू लागली.
साधू वैतागून बोलला, "तुमचं काय आहे ते लवकर निस्तरा नाहीतर खूप अवघड होऊन बसेल.
सगळेच्या सगळे मारले जाऊ आपण इथेच "
साधूच्या बोलण्याने सगळे भानावर आले.
केतनने सरळ व्यावहारिक फासा फेकला, "तुझं नाव जयेश आहे आणि हा चंदू , मला अजून लक्षात आहे तुम्हाला काय हवं ते तुम्ही आत्ताच पटकन सांगा तुम्हाला दोघांना ते मिळून जाईल पैसे, गाडी ,घर तुम्ही फक्त बोला पण फक्त आता इथे घोळ घालू नका" केतन नरमून बोलला.
हे बघून जयेश व चंदू दोघांना आश्चर्याचा धक्का बसला इतर वेळी आपल्याला मारायला उत्सुक असणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून तडजोडीची भाषा ऐकू येत होती.
मधल्या वेळात मोन्या आणि अक्षय या दोन्ही भावांची चुळबुळ चालू झाली, त्यांचं मत होतं कि एवढे सात जण आपण इथे मारायला सोडतच आहोत तर या दोघांना जिवंत ठेवून कशाला धोका पत्करायचा यांना देखील इथेच संपवा. आणि हा हेतू अक्षय ने त्याच्या वडिलांकडे म्हणजे वसंत कडे जयेश अन चंदू ला ऐकू जाणार नाही अशा आवाजात कानात बोलून दाखविला.
यावर त्याला जवळ घेऊन त्याच्या कानात वसंत कुजबुजला, "अरे अक्षय केतनला तू ओळखत नाही का ? त्याला फक्त हि पूजा पार पाडून इथून बाहेर निघायचं आहे आणि बाहेर गेल्याबरोबर तो यांना सोडणार नाहीच त्यामुळे तू शांत राहा त्याच प्लॅनिंग बरोबर आहे "
हे एकूण अक्षय ची कळी खुलली आणि त्याने मोन्या ला देखील खुणेनेच निश्चित राहायला सांगितलं.
मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्यात मशालींच्या ज्वाला इकडे तिकडे हलत होत्या, त्यात ह्या सगळ्यांचा सावल्या मागे दगडी भिंतीवर आणखी भेसूर दिसत होत्या.
जयेश पुढे आला आणि म्हणाला, आम्हाला तुमचा पैसे नको काही नको आम्हाला फक्त आमचे मित्र परत द्या"
जयेश च हे वाक्य ऐकून केतन अचंबित झाला, "तुमचे मित्र ? तुमचा एकच मित्र आहे इथं तो म्हणजे आकाश " केतन बोलला.
"नाही फक्त आकाश नाही तर राहुल विनीत आणि त्यांच्या शेजारी बसलेला हा केतन हे देखील आमचे मित्रच आहेत " त्या मुलींकडे जयेशने दुर्लक्ष केलं होतं कारण त्या मुलीसुद्धा आधी यांच्याच योजनेत सहभागी होऊन यांना तिघांना मारायला निघाल्या होत्या त्यामुळे त्या तीन मुलींविषयी त्याला त्यांना वाचवावे असं जरी वाटत असलं पण अजिबात सहानुभूती नव्हती त्याही पेक्षा आधी त्याला त्याचे मित्र वाचवायचे होते. नाहीतरी त्या मुलींना त्यांची शिक्षा मिळायला हवी असं देखील त्याला वाटत होतं.
"तुझे मित्र इथून परत मिळणं शक्य नाहीये तू पैसे गाडी बंगला माग.. किंवा त्यांच्या बदली आम्हाला दुसरे मुलं दे ", साधू ने मधेच जयेशला सल्ला दिला.
हा सल्ला एकूण जयेश विचारात पडला, काहीही करून पोलीस येई पर्यंत वेळ घालवणं गरजेचं होतं आणि म्हणून जयेश बोलू लागला, पण या बोलण्याआधी त्याने मनातून काहीतरी जबरदस्त योजना आखली आणि मग बोलू लागला, "ठीक आहे तुम्हाला बदली मुलं चालतील ना, मग त्यांच्या बदली आम्हाला दोघांना घ्या आणि त्यांना सोडा "
"दोघांच्या बदली दोघेच सुटतील" केतन काहीसा चिडत बोलला.
"ठीक आहे तर मग आकाश आणि राहुल ला सोडा आणि त्यांच्या जागी आम्हाला घ्या " जयेश आणि चंदू दोघे एकसुरात बोलले जणूकाही त्यांनी आधी सर्व योजना आखून ठेवली होती .
नुकसान काहीच नसल्याने हा व्यवहार केतन, वसंत आणि साधू यांना देखील चालणार होता या सगळ्यात केतन मोन्या आणि अक्षय च्या बायका शांत कोपऱ्यात उभ्या होत्या.
"चला जा पटकन त्यांच्या जागेकडे तिथे तुम्ही बसा आणि त्यांना इथून आम्ही बाहेर काढतो " साधूने हुकूम सोडला.
हौदाच्या दोन फूट उंच भिंतीपलीकडे अंधारात हे सातजण गुंग होऊन सात चौकोनात बसले होते सुदैवाने त्यांचे हात पाय मोकळे होते. जयेश आणि चंदू हौदाच्या पलीकडील बाजूला गेले, त्यांच्यावर लक्ष ठेवायला म्हणून केतन जाऊ लागला.
पण इतक्यात साधूने त्याला रोखले, "नको तिकडे जाऊ नकोस कारण नंतर आपल्याला पटकन इथून बाहेर जावं लागतं त्यांनी तुला मुद्दाम म्हणून पाच मिनिट जरी धरून ठेवलं तर उगाच प्रॉब्लेम होईल आणि तू जीवानिशी जाशील त्यांच्यावर विश्वास नको ठेवू त्यापेक्षा इकडेच थांब. मी शिलालेखावरील तिसरी ओळ वाचताच आपण ताबडतोब बाहेर निघायचंय इथे पाच मिनिट जरी थांबलो तर सगळे मरू "
साधूचा आणि केतन चा संवाद सगळ्यांना ऐकू जात होता अगदी जयेश आणि चंदू ला सुद्धा पलीकडे जाऊन ते खाली बसले आणि पटापट खिशातून आणलेले पांढरे फुल प्रत्येकी दोन दोन असे प्रत्येकाच्या तोंडात आवाज न करता कोंबू लागले.
इकडे केतन पुन्हा साधूला प्रश्न करू लागला ,"पण त्यांनी तिकडे काही गडबड केली तर ??"
त्याला साधू म्हणाला ,"तू काळजी नको करू आधी आपला जीव वाचव त्यांच्यापैकी एखादा वाचला तर आपण बघून घेऊ पण आपल्यापैकी एखादा मरता काम नये "
जयेश आणि चंदू ने सगळ्यांना पांढरं फुल खाऊ घातलं आणि जवळपास सगळे हळू हळू गुंगीतून बाहेर येत होते त्यांना सगळ्यांना त्यांनी हळूच बाहेर जायचं आहे अशी खूण केली पण ते शुद्धीवर आले तरी त्यांचे हातपाय साधारण हालचाली करण्यास काही सेकंद घेणारच होते त्यामुळे ते लगेच उठू शकले नाहीत.
हौदाच्या पलीकडे उजेडात केतनचं समाधान झालं पण वसंत साधूला बोलला , "अजून ते दोघे बदलीचे मुलं इकडे आले नाहीत ?? जाऊन बघू का ?"
साधू चिडतच बोलला , "कसे येतील ते गुंगीत आहेत ना ? ते शुद्धीत असते तर पटकन आले असते, आणि ते मेले तरी आपल्याला काय फरक पडतोय आपलं आवरू द्या आता मला "
आपली चूक कळून वसंत शांत झाला.
"आता कोणीच काहीच प्रश्न करणार नाही सगळे एकदम शांत बसा आणि मी सांगेल तेच करा" साधू चिडून बोलला. त्याचं चिडणं स्वाभाविक होतं कारण खूप वेळ वाया घालवला गेला होता. आणि बाकीच्यांना देखील हे पटलं त्यामुळे ते आता स्तब्ध उभे राहिले.
आता वेळ आली होती, साधू शिलालेखाजवळ गेला, सगळ्यांची नजर साधूवर होती तिकडून दुरून हवा जोरात वाहत होती. गारव्याने किंवा भीतीने सगळ्यांच्या अंगावर काटा आलेला. साधू एका हातात मशाल घेऊन शिलालेखा जवळ गेला आणि तिसरी ओळ वाचू लागला. तिथे उपस्थित असणाऱ्यांपैकी कोणाला त्यातलं अक्षर देखील कळत नव्हतं फक्त साधूने सांगितल्यामुळे ते चुपचाप उभे होते.
साधू ने तिसरी ओळ वाचून होताच. काही सेकंदात नेहमीप्रमाणे मोठा आवाज आला,
" आता ताबडतोब निघा इथून बाहेर आज सातजण दिले म्हणजे तुमचं काम झालं समजा पटकन निघा इथून बाहेर आमचे प्रमुख येत आहेत लवकर पळा"
हा घोषणासमान मोठा आवाज ऐकताच साधू सह सगळेजण घाई घाई बाहेर निघायला लागले पण हीच घोषणा जयेश आणि चंदू यांनीही ऐकली आणि त्यांनी हा अमानवी आवाज पहिल्यांदाच ऐकला त्यामुळे ते खूप घाबरले आणि तेदेखील बाकीच्या मुलामुलींना ओढत बाहेरच्या बाजूला पळायला लागले.
इकडे वसंत , मीना , साधू , केतन मोन्या अक्षय आणि त्यांच्या बायका असे नऊ जण त्या दालनाच्या बाहेर निघाले खरे पण साधूचा डाव फसला होता कारण त्यांच्या मागोमाग दहा वीस सेकंदाच्या अंतराने त्या आवाजाच्या भीतीपोटी जयेश, चंदू, आकाश,राहुल, दिगुनानाचा भाचा केतन, विनीत आणि त्या तीन मुलींना बाहेर घेऊन आले त्यांनी पांढरे फुल खाऊन बरा वेळ झाला होता त्यामुळे आता ते सर्व पूर्ण शुद्धीत आले आणि बाहेर पळत सुटले.
पुढे गेलेल्या आधीच्या लोकांना मागून आरडा ओरडा ऐकू आला म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं तर मागून हे नऊ जण त्यांच्या मागे त्या दालनातून बाहेर निघून त्या महालाच्या बाहेर जाण्यासाठी पळत सुटले होते.
हे बघून साधू मात्र पागल झाला ,"अरे रे रे र्रर्रर्र मेलो आपण आता सगळे मेलो " असं म्हणत तो जोरजोरात रडू लागला आणि पळू लागला. कारण सातजण साधू ने सात जण देणं अपेक्षित होतं पण तिंते जागेवर एकजण देखील नव्हता सगळे बाहेर पळून आले होते. साधूला वाटलं गुंगीमुळे हे मुलं तिथे तसेच बसून राहतील त्यांना कोणी पांढरं फुल खाऊ घालेल हे त्यांना अजिबात अपेक्षित नव्हतं कारण हे रहस्य फक्त ठराविक लोकांनाच माहित होतं .
आता साधू ची अवस्था केविलवाणी झाली होती. तो अक्षरशः रडकुंडीस आला. साधू ची हि अवस्था बघून त्याचे इतर साथीदार देखील घाबरले. काय झालं म्हणून विचारायला लागले.
पण आता वेळ संपली होती एवढा मोठा त्या जीर्ण महालाचा परिसर होता तिथून पटकन बाहेर पळून जाणं शक्यच नव्हतं.
शेवटी वसंत ने हिम्मत केली त्याने सरळ मागून धावत येणाऱ्या मुलांवर पिस्तूल रोखलं आणि त्यांना सांगितलं ताबडतोब मध्ये जाऊन बसा सगळे नाहीतर तुम्हाला इथेच गोळ्या घालून ठार करेल. नाही म्हणायला त्यांच्यात अंतर बरच होतं त्यामुळे अंधारात नेम लावणं देखील अवघडच होतं आणि हे राहुलच्या लक्षात आलं बाकीचे थबकले असतांना राहुल ओरडून बोलला , "अरे याचा इतक्या दूर नेम लागणार नाही घाबरू नका "
आणि जयेश देखील ओरडला ,"हो अंधार आहे याला नेम धरता येणार नाही घाबरू नका पण परत त्या जागेकडे जाऊ नका दुसरी कडे पळा तिथे भूत आहे "
हे ऐकून ते मुलं आणि तीन मुली दुसऱ्याच रस्त्याने त्या महालाच्या अवशेषांमधून बाहेर पळायला लागले.
सगळेच घाबरले होते पण आता स्वतः चा जीव वाचवणं गरजेचं होतं .
"साहेब इकडे वळवा गाडी ते सगळे आता समोरच्या महालाच्या भिंतींच्या मध्ये गेले असतील कारण तिकडेच ते बळी वैगेरे करणार होते " दिलीप पोलिसांना सांगत होता.
अगदी वेळेवर पोलिसांची गाडी येऊन पोचली होती. अण्णानी गाडी तिकडे वळवली. पोलीस गाडीच्या हेडलाईट च्या प्रकाशात त्या काळ्या कुट्ट रक्त दगडी भिंती आणखी विशाल भासत होत्या. ते गाडी घेऊन आत मध्ये जाऊ लागले त्यांनी जीपीएस डिवाइस च लोकेशन पाहिलं ते तिथेच जवळ होत पण तोच त्यांच्या कानांवर आरडा ओरडा ऐकू येऊ लागला.
त्यांनी गाडी तशीच भिंतींमधील रस्त्यांवरून पुढे आणखी मध्ये नेली पुढे जाऊन आतला एक चौक लागला तिथे गाडी पोचताच त्यांना समोरून काहीजण धावत येतांना दिसत होते ताबडतोब ते गाडीतून त्यांची हत्यारे काठ्या आणि पिस्तुलं घेऊन खाली उतरले. समोरून पळत येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश होता त्यामुळे चेहरे स्पष्ट दिसत होते पण त्यात जयेश नव्हता आणि चंदू हि नव्हता . तेवढ्यात पोलिसांना दिलीपने सांगितलं,
"साहेब , हेच ते लोक आहेत ज्यांनी मुलांना आणि मुलींना किडनॅप केलं होत बळी देण्यासाठी."
"अरे , पण ते इतके घाबरलेले का आहेत ?"
तोच त्यांना डावीकडून जयेश चा आवाज आला "सर आम्ही इकडे आहोत आम्ही येतोय तुमच्याकडे .. "
त्या आवाजाच्या दिशेने त्यांनी पाहिलं तिकडून सगळे तरुण मुलं आणि तीन मुली पळत येतांना दिसत होते पण चेहरे कळत नव्हते.
पोलिसांना देखील प्रश्न पडला कि आणि बळी जाणारे घाबरले हे ठीक आहे पण बळी देणारे देखील घाबरले आहेत म्हणजे असं काय झालं ?
हे सगळं घडे पर्यंत साधू, वसंत, मीना, केतन मोन्या, अक्षय , त्यांच्या बायका सगळे पोलिसांपर्यंत पोचले.
पण त्यांना इकडे आड तिकडे विहीर असं झालं पुढे पोलीस आणि मागे पिशाच. सगळे घाबरले होते कारण साधू ओरडतच होता कि, "हे सातजण बाहेर पळून आले त्यामुळे ते पिशाच आता आपल्याला सोडणार नाहीत. "
ज्या चौकात पोलीस गाडी उभी होती त्या चौकाच्या सगळ्या बाजूला त्या महालाच्या उंच उंच दगडी भिंती होत्या जवळ जवळ तीस तीस फूट उंचीच्या चारही बाजूने त्या भिंतींच्या मधून रस्ते येऊन त्या चौकात मिळत होते. एक रस्ता सरळ बाहेर जात होता एक त्या धानाच्या दालन कडे आणि दोन समोरासमोर विरुद्ध दिशेनं इतर दालनांकडे जात होते.
साधू वसंत केतन यांची टीम पोलिसांपर्यंत पोचली खरं पोलीस त्यांना काही विचारणार तोच बाजूच्या भिंतीवरून काहीतरी मोठ्या वटवाघळासारखं उडत आलं आणि त्याने झडप घालून केतन ला उचललं आणि भर्र्कन कुठेतरी गायब झालं. सगळ्यांचा आरडा ओरडा वाढला भीतीने ओरडू लागले इथून बाहेर चला म्हणू लागले.
एका पोलीस अधिकाऱ्याने साधू ला पकडलं आणि विचारू लागले, "काय आहे हे सगळं ? काय केलंस तू ? कोणाचा बळी द्यायला निघाला होता ?"
साधू गयावया करू लागला "साहेब सगळं सांगेलं आधी इथून बाहेर काढा पाय पडतो कारण आता बाहेर नाही पडलो तर आमच्या पैकी कोणी वाचणार नाही "
"का ? कोण मारेल तुम्हाला ?"
"ते पिशाच आम्हाला मारून टाकतील साहेब ... आम्हाला वाचवा इथून बाहेर काढा "
"साहेब हेच आहेत ते हरामखोर "जयेश धापा टाकत बोलला. जयेश ,चंदू आणि त्यांची टीम देखील इथे चौकात दाखल झाली होती.
"साल्यानो तुम्ही काय केलं हे, तुम्ही पळून आले म्हणून ते चिडले आता ते सगळ्यांना मारून टाकतील " वसंत चिडून जयेश ला बोलला.
हे ऐकताच एका पोलिसाने फाडकन वसंतच्या कानाखाली लगावली, "त्यांना बळी देऊन तुम्हाला पळायचं होत का मग ?"
हा संवाद काही सेकंदाचा होता तोच वरून एकदम मोठाल्या तीन काळ्या आकृत्या आल्या आणि त्यांनी अक्षय, मोन्या आणि त्यांची आई मीना या तिघांना काही सेकंदात गायब केलं . ते उडून जात असताना त्यांच्या ओरडण्याचा भेसूर आवाज ऐकू येत होता.
या वेळेस सगळ्यांनी त्यांना स्पष्ट पाहिलं ते वटवाघुळ नव्हतंच तर ते माणसांसारखं दिसणारं पण लांब लांब पाय त्यावर टोकदार नखं तसेच हात सुद्धा लांब आणि मोठमोठाले नखं होते, चेहरा तर कळतच नव्हता जवळ जवळ पंधरा फूट उंचीचा राक्षसी माणूस कसा दिसेल असे भयावह ते होते. त्यांच्या अवती भवती कसलं तरी धुराचं वलय होतं.
पोलिसांना घटनेचं गांभीर्य कळलं पण आता जे जिवंत आहे त्यांचे जीव वाचविणं महत्वाचं होतं. त्यांनी सगळ्यांना गाडीत तर सगळे मावळे नसते म्हणून सगळ्यांना बाहेरच्या दिशेने लपत छपत पळायला सूचना केली आणि स्वतः त्या उडत येणाऱ्या आकृत्यांवर पळत पळत नजर ठेऊ लागले.
एक पोलीस कर्मचारी गाडी घेऊन बाहेरच्या दिशेने निघाला आणि बाकीचे त्या बाहेरच्या पळणाऱ्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी त्यांचा मागे पळू लागले.
पळत पळत शेवटची भिंत आणि त्यातील मोठी काळीशार दगडी कमान ओलांडून सगळ्यांना बाहेर पडायचं होतं . तिथपर्यंत आले पण समोरच दृश्य बघून सगळेच थबकले.सगळ्यांच्या मणक्यामधून सनक गेली.
मृत्यू काय असतो ते त्यांना दिसत होत . त्या कमानीवरती सहा आणि खाली सहा असे बारा पिशाच तिथे उभे होते. साहजिकच बाहेरचा रस्ता त्यांनी अडवून ठेवला होता.
पंधरा पंधरा फूट उंचीचे काळेशार पिशाच, मोठमोठे टोकदार दात आणि नखं, डोळ्यांच्या जागी विस्तव ठेवला असावा असे डोळे असा भयानक अवतार घेऊन ते रस्ता अडवून उभे होते.
"तुम्ही कितीही पळाले तरी उपयोग नाही आम्ही तुम्हाला घरापर्यंत येऊन मारू शकतो त्यामुळे हि पळापळ थांबवा"
"आणि लक्षात घ्या आम्ही सगळ्यांना नेणार नाहीये त्यामुळे बाकीचे मूर्खांनी विनाकारण धावपळ करू नका "
त्या पिशाचांचा आवाज घुमला. ते चक्क मराठीत बोलत होते हे बघून साधूला काही क्षणासाठी आश्चर्य वाटलं पण त्याला ताबडतोब आठवलं कि समोरच्याला त्यांची भाषा कळणं शक्य नाही पण ते समोरच्याच्या भाषेत ऐकू जाईल असं बोलू शकतात.
तोपर्यंत पोलीस देखील पोचले. ह्या अमानवीय अनुभवाने ते देखील चक्रावले होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक कथा ऐकल्या होत्या पण अनुभव पहिल्यांदाच घेत होते. त्यांच्यातील तरुण आणि धीट असलेला एक पोलीस अधिकारी पुढे गेला आणि त्या पिशाचांशी बोलू लागला,
"तुम्हाला या लोकांना मारून काय मिळणार आहे आम्ही त्यांना त्यांच्या चुकांसाठी कायदेशीर शिक्षा देणारच आहोत त्यामुळे तुम्ही त्यांना सोडून द्या अशी विनंती करतो "
"तुमचे कायदे तुम्ही तुमच्या राज्यात पाळा पण आमच्या राज्यात आमचे कायदे चालतात आणि तुम्ही कितीही विरोध केला तरी आम्हाला ते पाळावेच लागतील आमची इच्छा नसली तरीही , आणि यांनी आम्हाला जे सांगितलं ते वचन पाळलं नाही त्यामुळे आमचं जे नुकसान झालं ते कधीच भरून निघणार नाहीये त्याचा तपशील आम्ही तुम्हाला देणं बंधनकारक नाहीये पण त्यासाठी यांना शिक्षा आम्हाला द्यावीच लागेल "
मधेच दुसरा पिशाच बोलू लागला "आणि तुम्ही सगळे लोक आता पटकन निघावं लागेल कारण अजून थोडा वेळ तुम्ही थांबले तर आम्हाला सगळ्यांना ठार मरावं लागेल ते हि आमच्या इच्छेविरुद्ध त्यामुळे जे आमच्या दृष्टीने गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही तशी शिक्षा देऊच आणि त्यांना आम्ही घेऊनच जाऊ शिवाय आम्हाला प्रेमात सांगा किंवा रागात आम्ही अजिबात ऐकणार नाही उलट आम्हाला अडथळा निर्माण केल्याबद्दल तुम्हास सगळ्यांना ठार मारू "
एक पिशाच झटकन उडून पाठीमागे जाऊन उभा राहिला आणि बोलू लागला, "तुम्ही सगळे असेच थांबा आम्ही त्यांना घेऊन जातो कोणी जरा जरी  जागेवरून हललं  किंवा मध्ये काह बोललं तर तो मेला समजा त्यामुळे आम्ही सांगेपर्यंत कोणी जागेवरून हलणार नाही आणि कोणी एक शब्द हि बोलणार नाही "
हे ऐकून सगळे घामाघूम झाले होते. एव्हाना हलकासा पाऊस देखील सुरु झाला होता. वरून झिमझिम पावसाचे थेम्ब अंगावर पडत होते आणि सगळे आपण मरतो कि काय या विचारात सुन्न उभे होते.
वसंतच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या कारण दोन्ही मुलं आणि बायको त्याने गमावली होती. तो रडून बोलायला लागला , "आम्हाला माफ करा माझे बायका मुलं प्लिज मला परत द्या तुम्ही सांगाल ते मी करेल हवं तर मला घ्या पण त्यांना सोडा "
तेवढयात डावीकडून एक पिशाच कर्कश आवाजात ओरडला "ए मूर्ख हावरट माणसा तुला अक्कल नाही का दुसऱ्यांचे मुलं बाळ महत्वाचे नाहीत का ? त्यांना बळी द्यायला निघाला होता तू ? तुझ्या लोभी बायको आणि दोन्ही मुलांना त्यांची शिक्षा मिळाली आहेच पण तुला सुद्धा आम्ही घेणारच आहोत "
एवढं बोलताच दुसर्याने त्यावर झडप घातली आणि त्याला गायब केलं.
आता मात्र सगळे शांत होते. आकाशच्या मनात बसमध्ये त्या सहा मुलींनी त्याला दिलेला त्रास आठवत होता. ज्यात तीन अक्षय मोन्या आणि केतन यांच्या बायका होत्या आणि बाकीच्या तीन मुली त्याच्याच बाजूला होत्या. त्यांच्या तावडीतून सुटल्याचा आनंद होताच पण आता पिशाच मलादेखील मारतील कारण मी स्त्रीलंपट पानापायीच यांच्या नादी लागलो होतो हे देखील त्याला जाणवत होतं. तो असा विचार करत असतानाच. वसंतची मुलगी म्हणजे केतनची बायको, अक्षय आणि मोन्याची बायको या तिघांना त्यांनी उचलून नेलं.
पोलीस फक्त आ वासून बघत राहिले काहीच करू शकत नव्हते नाहीतर त्यांचाच जीव गेला असता .
आता साधू, वसंत आणि त्या राहिलेल्या तीन मुली एवढेच उरले होते.
पाऊस हळू हळू वाढत होता. सगळे चिंब भिजले होते. तोच पाठीमागून फडफड ऐकू आली आणि साधू ला घेऊन ते उडाले.
काही सेकंदात त्यांनी वसंत ला उचलला आणि दोन्ही पाय कापून खाली फेकून दिलं.
पावसाच्या वाढलेल्या जोरामध्ये सुद्धा पिशाचाच कर्कश आवाज कानावर स्पष्ट आला, "आमच्या दृष्टीने गुन्हेगार असणाऱ्यांना आम्ही योग्य अशा शिक्षा केल्या आहेत परत इथे येऊन बाकीच्यांना शोधायचा मूखर्पणा करू नका कारण ते इथे सापडणारच नाहीयेत आम्ही त्यांना मारून दुसऱ्या जगात पाठवलं आहे त्यांचे मृत शरीर सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत कारण त्यांना सातशे वर्ष वेदनेत जगून मग मरायचं आहे आणि आम्ही ह्या म्हाताऱ्याला अपंग करून मुद्दाम सोडतोय कारण त्याला बायको मुला-सुना शिवाय अपंग आयुष्य जगायचंय हि त्याची शिक्षा आहे आणि मेल्यानंतर तो परत आमच्याच तावडीत येणार आहे "
बाकी आमच्या भागात कोणी इतर गुन्हेगार आम्हाला वाटत नाही. इतर मुलांना आम्ही ओळखत नाही ते बळी देण्यासाठी आणले होते पण ते आमचे गुन्हेगार नाहीत, आणि बाकीचे मूलं त्यांना वाचवायला आले त्यामुळे तेदेखील आमचे गुन्हेगार नाहीत... "
पिशाच च आवाज भरपावसात कडक आणि स्पष्ट ऐकू येत होता.
"... आमचे गुन्हेगार कोण आहेत ? तर आमचे गुन्हेगार आमच्या हद्दीमध्ये , लोभी, इतरांची आणि आमची फसवणूक करणारे, इथे धन लुटण्याच्या उद्देशाने येणारे, इतरांचे खून करणारे हे आमचे गुन्हेगार आहेत. त्यामुळे तुम्ही सगळे जण आता निघू शकता आणि परत इथे कोणी येऊ नका तुम्हाला इथले नियम कळले आहेत फिरायला या पण कोणाला लुबाडायला किंवा मारायला फसवायला नका येऊ निष्पाप, निरागस आणि लोभी नसणाऱ्या माणसांचं आमच्या हद्दीत स्वागतच आहे पण आता साठी तुम्ही ताबडतोब निघा कारण इथे तांडव होणार आहे ताबडतोब निघा ". असं सल्ला देऊन ते सगळे पिशाच भराभर उडून निघून गेले.
सगळे जण सुन्न झाले होते काहीच सुचत नव्हतं. फक्त आता जीव वाचवायचा होता यांनी मागे वळून पाहताच त्या अवशेषांमध्ये एक खूप मोठी वावटळ उठली होती तिच्यात शिळा देखील उडत होत्या .
दोन्ही पाय तोडलेल्या वसंत ला पोलिसांनी उचलून गाडीत घातलं.
"तुम्ही सगळे लोक कसे येणार आता कारण सगळे पोलीस कार मध्ये मावणार नाहीत " एका अधिकाऱ्याने जयेशला विचारलं.
"सर तिकडे राहुलची बस आणली आहे या लोकांनी तिच्यात येतो आम्ही " जयेश बोलताच त्यांना बरं वाटलं.
सगळेजण धावतच बसकडे निघाले. पोलिसांची गाडी रस्त्यावर बसची वाट बघत उभी होती सगळे मुलं मुली बसमध्ये चढताच राहुल ड्राइवर सीटवर बसला. सुदैवाने चावी तिथेच होती.
बसमधलं चित्र पालटलं होतं. आकाश जयेश आणि चंदू ला मिठी मारून त्याला वाचविल्याबद्दल दहा वेळा आभार मानत होता तीच अवस्था विनीत, दिगुनानाचा भाचा केतन आणि राहुल ची देखील होती . राहुल ड्राइवर सीट वर असल्यामुळे त्याच्या डोळ्यातून फक्त त्याच्या नवीन मित्रांच्या प्रेमामुळे पाण्याच्या धारा वाहत होत्या. आपल्या मित्रांना जिवंत परत आणलं म्हणून जयेश आणि चंदू देखील भावना आवरू शकले नाहीत त्यांनीही अश्रुना वाट करून दिली. त्या तीन मुली ज्या आधी या गुन्ह्यात सहभागी होत्या त्याही ओशाळल्या होत्या. त्यांनी रडून सर्वांची माफी मागितली पण मुलांना त्यांच्या माफीपेक्षा सगळे वाचले हे महत्वाचे होते.
इकडे पोलिसांच्या गाडीत असलेल्या वसंत चे देखील रडणं थांबत नव्हतं सगळ्या जवळच्यांना त्याने गमविलं होतं. चमत्कार म्हणजे त्याच्या तोडलेल्या पायातून अजिबात रक्त येत नव्हतं. त्याला शिक्षाच अशी गजब मिळाली होती कि त्याचा सगळं लोभ गळून पडावा. तिथे असलेले पोलीस अधिकारी आता उद्या वसंत आणि फरारी साधू विरुद्ध गुन्हा नोंदविणार होते, तसेच बाकीचे गुन्हयात सहभागी सदस्य बेपत्ता किंवा फरारी म्हणून लावायचे कि मयत सांगायचे हा विचार करत बसले होते.
बस निघायला लागली तसे जयेश अन चंदू मात्र रेनकोट घालून आपल्या बाईक कडे निघाले, जयेशने बाईक चालू केली आणि रस्त्याला लागला. भर पावसात आणि रात्रीच्या अंधारात रस्त्याने पुढे जयेश आणि चंदू मोटरसायकलवर मध्ये पोलिसांची कार आणि मागे बस असे तीनही वाहन हळू हळू डोंगराचा चढ़ चढत होते.

माणुसकी आणि चांगल्या मित्रांपेक्षा जगात आणखी काही असू शकतं का ? पैसे धन दौलत हे आज इकडे तर उद्या तिकडे आहे ह्या लढाईत मैत्री जिंकली होती.
अगदी दोन दिवसांपूर्वी मित्र झालेले जयेश आणि चंदू हे राहुल दिगुनानाचा भाचा केतन आणि विनीत यांच्यासाठी देव ठरले होते. विस्मयकारक पाठलागात मैत्रीचा पाठलाग करणारे जिंकले आणि लोभाचा पाठलाग करणारे कायमचे हरले होते.

(समाप्त )

 

Comments