पाठलाग (मराठी भयकथा) भाग ६

 पाठलाग (मराठी भयकथा) भाग ६

तालुक्याला येऊन ट्रेन मध्ये बसल्यावर जयेशने आकाशच्या भावाला फोन केला. 

"हॅलो, मी जयेश बोलतोय"
"हो दादा बोल" आकाशचा भाऊ तिकडून बोलला.
"अरे आकाशचा फोन लागत नाहीये तो गावाकडे आलाय का ?"
" नाही दादा मी पण आजच फोन केला होता पण त्याने उचलला नाही मला वाटलं कामात असेल म्हणून मी परत केला नाही"
"बर तू याआधी केव्हा फोन केला होतास त्याला ?"
"चार दिवसांपूर्वी आमचं बोलणं झालं आणि मध्यंतरी मला देखील फोन करायला जमलं नाही "
"बर ठीक आहे, म्हणजे तो शहरातच आहे गावाकडे नाहीये ओके ओके मी रूम वर जाऊन भेटतो त्याला"
"हो दादा चालेल"
"बर चल ठेवतो फोन बाय"
एवढं बोलून जयेशने फोन कट केला.
धडधडत धावनाऱ्या ट्रेनमध्ये चंदू जयेशच्या तोंडाकडे बघत होता. आता पुढे काय हा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर होता.
ट्रेनमधल्या सीट वर नीट बसत जयेश पुढे चंदूला बोलू लागला, " चंदू, आकाशच्या घरी त्याच्या विषयी काहीच माहिती नाहीये."
"म्हणजे आकाश चा खून झाला हे त्यांना कळलं नाही अजून ? कसं शक्य आहे?"
"तेच तर मी म्हणतोय, असं शक्यच नाहीये पण आता तू घटना बघ आकाशचा खून झाल्याचं मला नवली च्या बस स्टँडवर पोलिसांनी सांगितलं, त्यांनी गांधी चौक पोलीस स्टेशनला फोन लावला विशेष म्हणजे तिथूनच ही आकाशच्या खुनाची माहिती मिळाली पण मग जर पोलिसांना माहीत होतं तर त्यांनी आकाशच्या घरी संपर्क का नाही केला? किंवा चौकशी साठी आपल्याला का नाही बोलावलं ? कारण आकाशच्या फोन मध्ये शेवटचे फोन कॉल्स आपल्यालाच आलेले होते." एवढं बोलून जयेश थांबला.
"सगळं संशयास्पद आहे." चंदू खिडकीबाहेर बघत बोलला.
जयेश पुन्हा बोलू लागला, "माझा एक सरळ म्हणणं आहे, एकतर ते पोलीस नकली असतील, किंवा कामचुकार तरी पण इतका निष्काळजीपणा खरे पोलीस करणारच नाहीत"
"मग तुला काय म्हणायचंय?, ते खोटे पोलीस होते? आणि ते खोटे पोलीस होते तर त्यांनी तुला अशी माहिती का पुरवली? म्हणजे आकाश जिवंत सुद्धा असू शकेल ?" चंदू ने शंका व्यक्त केली.
"बरोबर , हेच म्हणायचंय मला' , जयेश आनंदाने ओरडून बोलला.
"पण चंदू आपल्याला आकाश ला शोधावं लागेल तो कुठे आहे ते बघावं लागेल, आणि त्यासाठी आपल्याला उद्या यांच्यामागे ट्रिप च्या ठिकाणी जायचय."
आता जयेशचं म्हणणं चंदू ला पटत होत त्याने फक्त हम्म इतकाच प्रतिसाद दिला.
ट्रेन भराभर अंतर कापत होती जणू तिला देखील या प्रकरणातील गुप्तता काय आहे ती शोधायची घाई झाली होती.
ट्रेन मधील कोंदट वातावरण बाहेरून येणाऱ्या गार हवेमुळे आता सुखावह वाटत होतं. त्याच गारव्यात कोणी बसल्या बसल्या डुलक्या घेऊ लागलं होतं तर काही गप्पांच्या मैफिली जमल्या होत्या.
जयेश आणि चंदू मात्र दोघे उद्यासाठीचा विचार करत होते.
साधारणतः दीड दोन तासांनी ट्रेन शहरात आली, तसं स्टेशनच्या गराड्यातून बाहेर आल्याबरोबर जयेश ने मोबाईल काढून राहुलला फोन केला.
राहुल म्हणजे तोच जो बस घेऊन जयेशच्या गावी आलेला होता.


"हॅलो राहुल ?"
"हो बोल जयेश तुझा नंबर सेव्ह केलाय मी" पलीकडून राहुल हसत बोलला.
"हो थँक्स, मला माहितीये रे तू सेव्ह केलाय असं, बरं ते जाऊदे मी काय म्हणतोय ते ऐक , उद्या ट्रीपला जाणं फिक्स आहे का तुमचं ? "
"हो रे पण का काय झालं ?"
"काही ही झालं नाही पण मला सांग ना तुम्ही लोक सकाळी किती वाजेल आणि कुठून जाणार आहेत ? "
"अरे सगळं ठरलं आहे त्यात काही बदल होणार नाहीये आपण सकाळी नऊ वाजेला सगळे शहराच्या बाहेरच्या बाजूला आसरी नाक्याला जमू या कारण माझं घर त्याच रस्त्याला आहे, बस उलट मुख्य शहरात ट्रॅफिकमध्ये आणण्यापॆक्षा तुम्हीच तिकडे या मग तिथून पुढे आपण जाऊ "
राहुलच बोलणं चालू असताना दोघांनीही आपल्या रूमच्या दिशेने जाणारी ऑटो पकडली.
"अरे राहुल सॉरी यार पण.... पण चंदू ला आणि मला उद्या नाही येता येणार तुमच्यासोबत ट्रिप ला "
"का रे असं ऐन वेळेला रद्द करतोय ? यार मग आम्ही सहा सात जणांमध्ये काय मजा येणार चला ना यार तुम्ही प्लिज"
"अरे खरच राहुल आम्ही आलो असतो पण थोडा प्रॉब्लेम झालाय तुला सांगतो आम्ही भेटल्यावर "
"तुमची मर्जी, पण इथून पुढे असं ऐन वेळेला टप्पा नाही द्यायचा नाहीतर दोघांना धरून मारेल मी " राहुल गमतीने बोलला.
"तस नाही होऊ देणार मित्रा आपण प्रत्येक ट्रिप ला सोबत असणार आहोत काळजी नको करुस " जयेश द्विअर्थी बोलला.
पण राहुलला ते कळलं नाही. एव्हाना ऑटो त्यांच्या इमारतीजवळ आली होती . जयेश आणि चंदू दोघेही उतरून ऑटोवाल्याला पैसे देऊन आत इमारतीमध्ये गेले , फ्लॅट च दार उघडून आत मध्ये सामान, बॅग ठेवल आणि बेडवर विचार करत पडले.

* * *

आज पाऊस नव्हता आकाश निरभ्र दिसत होतं , सकाळचे आठ वाजले तरी ऊन छान पडलं होतं. रहदारी बऱ्यापैकी चालू होती. जयेश आणि चंदू सकाळी लवकर उठून त्या कोलाहलातून जयेशच्या मोटरसायकल वर गांधी चौक पार करून पुढे बस स्टॅन्ड कडे निघाले. जाताना मधेच दोघे गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आले. आता बस स्टॅन्ड ओलांडून ते पुढे निघाले आता मुख्य हायवेला लागल्यावर ४ किलोमीटरवर आसरी नाका होता, तिथेच सगळे जमणार होते आणि तिथूनच पुढे रस्ता आसरी घाटाकडे जात होता .

जयेशने मुद्दाम मोटरसायकल आसरी नाकापासून थोडी मागे पण तिथली हालचाल बघता येईल अशी आडोशाला उभी केली व तिथेच टपरीवर गरमागरम चहा घेत चंदू आणि जयेश उभे राहिले. आता त्यांना खूप उत्सुकता दाटून आली होती कमीत कमी आजचे मुलं तरी तेच निघावेत ज्यांनी आकाश ला गायब केल होतं. हायवे वरून भरधाव वाहने जात येत होती. मधेच एका कारमध्ये काही मित्र ट्रिप ला जाताना दिसले आणि दोघांनाही त्यांच्या दोन दिवसांपूर्वी ची ट्रिप आठवून अंगावर काटा उभा राहिला. त्यांना राहून राहून हा प्रश्न पडत होता की त्या मुला मुलींनी आकाश जयेश आणि चंदू वर अशी के जादू केली की तिघेही त्यावेळी त्यांच्या दबावात वावरत होते. अक्षरशः संधी थोडी हिम्मत दाखवायला सुद्धा त्यांना कष्ट पडत होते. पण आज मात्र दोघेजण ठाम निर्धार करून आले होते की या सहा जणांचा छडा तर लावायचाच पण आकाशचं मृत शरीराचं त्यांनी काय केलं ? कुठे आहे ? तो तपास करून यांना पोलिसांकडे पकडून देखील द्यायचं होतं.
इतक्यात त्यांना समोर नाक्यावर बस आलेली दिसली बसमध्ये ड्रायव्हर सीटवर राहुल होता तरएक बाजूला विनय आणि केतन बसलेले दिसत होते बहुदा ते राहुलच्या घरूनच बसमध्ये बसून आले असावेत असा कयास त्यांनी बांधला.
दहा मिनिटांपासून बस उभीच होती याचा अर्थ ते ते सहा मुली आणि तीन मुलं अजून आलेले नव्हते.
चंदू कडे बघत जयेश म्हणाला, "चंदू ते आधीचे भामटे कुठून येतील आपल्याला माहीत नाहीये ते आपण उभे आहोत इकडूनच नको यायला त्यामुळे आपण दोघे थोडा वेळ या शेजारच्या भिंतीमागे लपून वाट बघू "
यावर चंदू बोलला, "पण जयेश इथे खूप लोक आहेत आपण त्यांना इथेच धरलं तर?"
"नाही आपल्याकडे पुरावा काहीच नाहीये की त्यांनी आकाशला मारलं शिवाय हे फक्त नऊजन दिसत आहेत याहून अधिक असले तर काहीतरी मोठं नुकसान होऊ शकतं जे आपल्याला देखील माहीत नाही त्यामुळे आधी आपण यांचा उद्देशजाणून घेऊ यांना आपल्याला का मारायचं होतं? हे कळायला हवं कारण यांना आपण उभ्या आयुष्यात काधी पाहिलं नाही आणि ना त्या आकाशच्या कम्पनीच नाव ऐकलं त्यामुळे आत्ताच धोका पत्करायला नको"

दोघांचं आडोशाला उभं राहून समोर बसकडे सतत लक्ष होतं. थोड्याच वेळात बस जवळ दोन ऑटो थांबल्या त्या बसच्या पलीकडे थांबल्या त्यामुळे त्यातून कोण उतरलं हे कळत नव्हतं पण जे कोणी उतरलं त्यांना बघून ड्रायविंग सीटवर बसलेला राहुल हातवारे करून काहीतरी बोलत होता. तसे ते सगळे जण बस मध्ये चढू लागले. जयेशच्या अंदाजाप्रमाणे बरोबर सहा मुली आणि तीन मुलं होते ते. ते नऊजण आणि हे तिघे असे बारा जण त्या बसमधून पुढे जाणार होते. राहुलने बस स्टार्ट केली आणि पुढे रस्त्यावर घेतली आणि आसरी घाटाच्या दिशेने बस निघाली .
गाडी शहरापासून लांब आली तशी पावसाची रिपरिप चालू झाली होती निपचित पडलेल्या ओल्या रस्त्यावर बस दिमाखात धावत होती. वायपर काचेवरचे पाण्याचे थेंब रागाने बाजूला करत होते. पण पाण्याचे थेंब देखील माघार घ्यायला तयार नव्हते सारखे ओघळून काचेवर येत होते.
बस मध्ये जरी आनंदाचं वातावरण असलं तरी त्यातील सगळ्यांनाच पुढे काय घडणार याची अपेक्षा नव्हती, विशेषतः राहुल, दिगु नाना चा भाचा केतन आणि विनीत तिघेही त्या सहा जनांसोबत पाऊस आणि ट्रिप एन्जॉय करत होते. बस मध्ये खाण्याचं सामान नेलं असल्यामुळे बाकी चटर पट खाणं चालूच होतं. बसमधील सगळेजण हसत,खेळत, गाणी म्हणत मस्त मजा करत होते.

भर पावसात बसचा पाठलाग करायला जयेश आणि चंदू ला अवघड जात होतं कारण पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत असल्याने मोटरसायकल बसच्या वेगाने चालवायला मर्यादा येत होत्या. पण तरीही जयेश शर्थीने बसपासून दोन तीनशे मिटर अंतर ठेवुन गाडी चालवत होता. सुदैवाने जयेश आणि चंदू रेनकोट घालून आणि पूर्ण तयारीनिशी निघाले असल्यामुळे ओले झाले नव्हते बाकी त्यांच्या रेंनकोट वर मात्र पावसाचे थेंब सपासप पडत होते. महामार्ग असला तरी पावसामुळं वर्दळ कमी झाली होती. मोठमोठे ट्रक आणि कार फक्त रस्त्याने जात होते अधून मधून एखादी एसटी बस दिसत होती.
गेल्यावेळी सारखी बस आता यावेळी मात्र त्या घाटाआधी लागणाऱ्या हॉटेलवर थांबली नाही तर सरळ आसरी घाटाकडे निघाली. ते बघून जयेश आणि चंदू अचंबित झाले. पण त्यांना लगेच कळलं की या वेळी त्यांनी खबरदारी बाळगली असावी.
आणि खरं तसच होतं. गेल्यावेळी त्यांचा प्लॅन ठिकाणावर पोचण्याआधीच आकाश, जयेश आणि चंदूला कळला होता तो कसा कळला हे त्यांना माहीत नव्हतं पण हॉटेलवरून निघाल्यावरच हे सगळं झालं होतं म्हणून ह्या वेळी त्यांनी शिताफीने हॉटेलवर जाणं टाळलं होतं
कोण होते ते ? त्यांना काय हवंय? त्यांनी ह्या वेळेस नवीन तीन मुलं धरून आणले होते हे स्पष्ट होतं आणि त्यामुळे आणखी एक गोष्ट स्पष्ट होती की त्यांची जयेश आणि चंदू सोबत वैयक्तिक दुष्मनी नव्हती पण त्यांचा काहीतरी तर उद्देश असेल तीनच मुलं नेऊन त्यांना ठार मारायची योजना त्यांनी का केली?
असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात उभे राहत होते.
पण जयेश आणि चंदू मुकाट्याने त्या बसच्या मागे निघाले होते.

पावसामुळे आणि ढगांनी सर्वबाजुनी आभाळ व्यापून टाकल्यामुळे भर दुपारी सगळी कडे अंधारलं होतं. तास पाऊस फार जोराचा नव्हता पण संततधार चालू होती. त्या काळ्या ढगांनी एक विचित्र दडपण मनावर निर्माण केलं होतं. महामार्गावर सर्व वाहने हेडलाईट चालू ठेवूनच धावत होती. आता आसरी घाटाचा डोंगर जवळ येत होता, त्याच्या डोक्यावर त्याच्या तीनपट आकाराचं काळ्या ढगांचा मोठं गाठोडं ठेवलेलं दिसत होतं त्यामुळे घाटातील रस्ता तर पूर्णच अंधारलेला होता. अक्षरशः रस्त्यावर ढग उतरले होते. आणि उंचीवर असल्यामुळे हवा देखील चालत होती. आता ती बस आणि तिचा पाठलाग करणारी जयेश आणि चंदू ची बाईक घाट चढायला लागले होते. घाटात ढग उतरल्यामुळे फार पुढचं दिसत नव्हतं हेडलाईट च्या प्रकाशात फक्त वीस मीटर पुढचा रस्ता दिसत होता. आणि समोरून येणाऱ्या गाड्यांचे फक्त हेडलाईट दिसत होते. आसरी घाटाला पावसाळ्यात या वातावरणाची सवय झाली होती. पण तिकडे नवीन गाडी चालविणारा नक्कीच चुकून वळणावरील एखाद्या खडकावर आपटला असता. त्यामुळे सर्व वाहने हळू हळू चालत होती. त्यात वारा जोराने वाहत होता घाटमाथ्यावर आल्यावर दोघेजण बसलेले असून सुद्दा बाईक मधेच वाऱ्याने हलायची.
इतका कठीण पाठलाग आपण का करतोय? कोणासाठी ? आणि कशासाठी करतोय हा प्रश्न दोघांना अजिबात सतावत नव्हता, त्यांना प्रश्न फक्त आकाशचा पडला होता आकाश जिवंत असल्याची त्यांना दाट शक्यता वाटत होती व तितकीच त्याच्या मरणाचीदेखील पण आता नवीन तीन मुलं त्यात अडकले होते त्यांचाही जीव वाचवायचा होता. त्या मुलांना त्यांनी या ट्रिपवर जाण्यापासून आधीच परावृत्त केलं असतं पण मग आकाशचा पत्ता लागला नसता आणि हे सहा मुलं हाताशी लागले नसते त्यांनी नवीनच तीन मूलं शोधून त्यांचं काम पूर्ण केलं असतं.
हा पाठलाग आता उलटा झाला होता सावज शिकाऱ्याचा पाठलाग करत होतं आणि शिकारी मात्र दुसऱ्या सावजा सोबत खुश होता. अस सध्यातरी चित्र दिसत होतं. पण आकाश आणि जयेशवर सगळ्याना वाचवायची जबाबदारी येऊन पडली होती.
"जयेश"
घाटातून अंधारलेल्या महामार्गावरून हळू हळू बाईक पुढे जात होती त्यातच मागून चांदूने आवाज दिला.
"हा बोल चंदू"
"अरे तुला काही कळलं का?"
"काय झालं?"
आपल्या मागे एक गाडी होती ती शहरापासून आपल्या मागेच चालत होती . एस यु व्ही असून सुद्धा ती आपल्याला ओव्हरटेक करून पुढे गेली नाही. पण आता ती गाडी घाटात दिसत नाहीये", चंदू थोडा घाबरला होता.
"म्हणजे ? तुला काय म्हणायचं आहे ? एक एसयूव्ही कार आपला पाठलाग करत आहे असं ?"
"हो आपला पाठलाग करत होती पण आता दिसत नाहीये", चंदू बोलला.
"च्यायला हे एवढे फास्ट कसे काय झालेत ?" जयेश बोलला.
"हो ना, पण नक्की तेच आहे कशावरून?" चंदू ने शंका व्यक्त केली.
"चंदू तूच बोलला ना त्यांनी आपल्याला ओव्हरटेक नाही केलं म्हणून" जयेश ओरडून बोलला.
"अरे हो पण हे भलतेच कोणी निघाले तर ?"
"अरे बाबा इथे पावसाने आणि अंधाराने त्यात घाट मी आधीच वैतागलोय आणखी या बसचा पाठलाग करतांना कोणी आपला पाठलाग करत असेल तर मात्र भयानक आहे यार "
हळू हळू घाट पार होऊन गाड्या आसरी घाटाच्या बाहेर पडत होत्या. जसजसे घाट उतरून खाली येऊ लागले तसतसे रस्त्यावरील ढग विरळ होत गेले आणि कोणीतरी वर्गातील फळा स्वच्छ धुवून पुरावा तसा रस्ता स्पष्ट दिसू लागला.
मागून कोणती गाडी पाठलाग करत होती हे काही दोघांना नीट कळलं नाही पण आता ती गाडी दिसत नसल्यामुळे दोघंही तो विषय विसरले. घाट संपला घाटाखाली पाऊसदेखील कमी झालेला होता. त्यामुळे जरा बरं वाटत होतं. पण समोर रस्त्यावर जिचा पाठलाग करत आहेत ती बस दिसत नव्हती, म्हणजे बस वेगाने पुढे गेली असावी. आता काळजी पुढे निघून गेलेल्या बसची करावी कि मागून येणाऱ्या कार ची या विवंचनेतच जयेशने बस नजरेआड होऊ नये म्हणून गाडी सुसाट चालवायला सुरुवात केली. या वेळी बसने रस्ता नको बदलायला कारण आसरी घाट ओलांडल्यावर काही किलोमीटरवर नवली फाटा आणि तिथून मध्ये वळायचं एवढंच त्याला माहित होतं पुढचा रस्ता बसच्या मागे जाऊनच कळणार होता. घाटापासून लांब आल्यावर पाऊस थांबला होता त्यामुळे हवेने रेनकोट वरचं पाणी देखील सुकलं होतं पण वातावरणात एक गारवा भरून राहिला होता.
सुदैवाने नवली फाट्याच्या वळणावर बस स्टॅन्ड च्या पुढे त्यांना बस उभी असलेली दिसली म्हणजे हे नक्कीच काहीतरी घ्यायला थांबले असावेत.
"चंदू मला भूक लागलीये रे "
"हो रे मला पण , चल हे थांबले आहेत तर आपण पण काहीतरी खाऊन घेऊ "
असं म्हणत दोघेही बस पासून जरा दूर असलेल्या ढाब्यावजा छोटेखानी हॉटेल मध्ये घुसले पण त्यांनी जागा अशी धरली कि तिथून बसवर लक्ष राहील.
"चंदू जरा आजू बाजूला लक्ष असू दे, नाहीतर ते यायचे आपल्यातच जेवायला " जयेशने विनोद केला.
"त्यात काय मग त्यांना आता मनसोक्त जेवू घालायचच आहे आपल्याला "
यावर दोघेही मनमुराद हसले.
दोघांचंही जेवण झालं चहा देखील घेऊन झाला. जयेश ला काय बुद्धी सुचली कोण जाणे त्याने सोबत पार्सल जेवण सुद्धा घेतलं. कदाचित रात्री मुक्काम करावा लागला तर म्ह्णून असेल पण त्याने भरपूर अन्न सोबत बांधून घेतलं. हे बघून चंदू ला त्याच्या दूरदृष्टीच कौतुक वाटलं.
इतक्यात जयेशने चंदू ला खसकन ओढून बाजूला घेतलं आणि ओरडला.
"चंद्या हेल्मेट घाल पटकन "
"का रे काय झालं ?"
"ते बघ त्यांच्यातले दोघे इकडे येतायत"
चंदू ने क्षणाचा विलंब न करता हेल्मेट घातलं.
जयेशने दाढी वाढवली होती त्यावर गॉगल आणि वरून माकडटोपी चढवली त्यामुळे तो कोणाला ओळखू आला नसता आणि म्हणूनच त्याने स्वतःच हेल्मेट चंदू ला घालायला लावलं.

हो हे तेच दोघे होते मोन्या आणि आधीचा ट्रिप प्लॅन करणारा केतन. त्यांना ओळखण्यात दोघांनीही अजिबात गफलत केली नाही आधीच पाऊस पडून डबकी तुंबलेल्या त्या तुटक्या डांबरी रस्त्यावर एक कार दोघांच्या बाजूने जाऊन बरोबर केतन आणि मोन्याजवळ थांबली त्या कार वाल्याने त्यांना एक बॅग दिली आणि थोडावेळ काहीतरी चर्चा केल्यानंतर तो कार घेऊन आल्या दिशेने निघून गेला.
त्यांची चर्चा चालू असताना चंदूने शेजारच्या पण टपरीवाल्याला विचारलं,
"काका इथे पोलीस स्टेशन कुठं आहे हो ?"
यावर तो माणूस आश्चर्यचकित होऊन म्हणाला ,"आरं बाबा इथं एवढुसं गाव नवली हा त्या नवली गावचा फाटा इथं कसलं आलं पोलीस स्टेशन ? इथे असलं काय बी न्हाई गेले दोन वर्स झाली गावात आमी पोलीस न्हाई पाहिला "
तेवढ्यात जयेश मधेच बोलला, "अहो काका पण दोन चार दिवसांपूर्वी तर मी इथे एक महिला पोलीस अधिकारी आणि तिच्या सोबत सहकारी पोलीस पाहिले होते "
त्यावर तो माणूस बोलू लागला, "बाळा इथं पोलीस काही मॅटर झाला तवाच येत्यात, आणि येवढ्यात तरी काही मॅटर झाला न्हाई मंग पोलीस यायचा संबंधच काय राह्यला?"
यावर जयेश मात्र चाट पडला कारण तो पोलिसांनां भेटला होता त्याला पोलिसांनी आकाशचा खून झाला सांगितलं होतं. म्हणजे एकतर ते पोलीस नकली होते किंवा ते देखील होणाऱ्या गुन्हयात सहभागी होते. विचार करत असतानाच तिकडे कारचा आवाज आला मघाशी आलेली कार आता निघाली होती.
तो गेल्याबरोबर केतन आणि मोन्या बसमध्ये जाऊन बसले आणि बस निघाली देखील आताही राहुलच बस चालवत होता. जयेश आणि चंदू च्या मनात साहजिक राग होता. त्यांना असं वाटत होतं कि यांना इथेच गाठावं आणि इथेच सगळा सोक्षमोक्ष करावा पण त्यांच्या योजनेत अजून काहीतरी होतं ज्यामुळे ते शांत उभे राहिले होते.
बस नवली फाट्यावरून मुख्य महामार्ग सोडून नवली गावाच्या दिशेला वळली होती त्या मागोमाग जयेश आणि चंदू आपली गाडी घेऊन निघाले आता गाडी चंदू चालवत होता. पाऊस थांबलेलाच होता त्यामुळे फार काही अडचणी नव्हत्या पण रस्ता निसरडा झालेला होता. थोड्या वेळाने नवली गाव लागलं तसं गाव ओलांडून बस पुढे जाऊ लागली , बसपासून सुरक्षित अंतर ठेवून हे दोघे मित्र त्यांची बाईक घेऊन चालले होते.
"च्यायला चंदू पोलीस नकली होते तर पोलिसांची बातमी पण नकली निघायला हवी "जयेश पाठीमागून बोलला.
त्याचा रोख आकाशच्या खुनाकडे होता हे चंदू ला कळलं.
"हो ना यार आक्या जिवंत सापडायला पाहिजे तो किती का नालायक असे ना पण त्याच्या कुटुंबासाठी तरी तो जिवंत सापडायला हवा"
"हम्म " जयेशने इतकंच उत्तर दिलं. त्याला आकाशच्या भंपकपणाचा कायम राग यायचा. कॉलेजमध्ये असताना देखील तो सहानुभूती मिळविण्यासाठी कुठल्याही पातळीवर जायचा. विषेशतः मुलींची सहानुभूती कारण त्याचा स्वभावच स्त्रीलंपट होता आणि मुली त्याच्या जाळ्यात फसायच्या देखील. त्यामुळे अशा धोकेबाज मुलाचा जयेशला राग होता. पण कितीही केलं तरी शेवटी सोबत राहिलेले मित्र झालेले होते ते त्यामुळे त्याची काळजी होतीच तसेच त्या तीन मूळ आणि सहा मुलींना अद्दल देखील घडवायची होती पण अद्दल घडवायला त्यांचा गुन्हा खरच आहे का ? आणि आहे तर तो काय आहे ते काय करणार आहेत हे देखील माहित असं गरजेचं होतं आणि त्यामुळेच हा पाठलाग उलट्या दिशेने चालू होता.
बसच्या मागे जातांना आता तीच चौफुली आली जिथून मागच्या वेळेला आकाशने बस वळवली होती. यावेळी मात्र तिथे कोणी प्रवाशी बसची वाट बघत उभे नव्हते. आता इथून पुढचा रस्ता दोघांसाठी अनोळखी होता. इथूनच पुढे कुठला तरी नाला कि नदी होती ज्याला पूर आल्यामुळे गेल्या वेळी हे माघारी गेले होते.

चंदू गाडी चालवीत होता बस मध्ये आणि त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी अंतर होत त्यामुळे चिंता नव्हती पण तरीही त्यांना ढोक पत्करायचा नव्हता . इकडे रास्ता खराब होत जागो जग खड्डे पडले होते  त्यातून बस काय मोटरसायकल सुद्धा खूप हळू चालवावी लागत होती. अखेरीस एक वळणावर ती छोटी नदी आली त्यावर छोटा फरशीचा पूल बांधलेला होता. पुलावरून थोडे थोडे पाणी वाहतच होत. बस तीनदीओलांडून बऱ्यापैकी दूर गेली तसे जयेश आणि चंदू देखील पुलावरून जाऊ लागले . आधीच खराब रस्ता त्यात सुद्धा फरशीचा  पूल  आणि त्यातही  पुलावरून पाणी वाहत होत चंदू ने कशी बशी गाडी पाण्याबाहेर काढली नाही  अर्धा फूट पाणी पुलावरून वाहत होत पण त्याला वेग खूप होता.  पूल चढून आल्यावर पुढे रस्ता आणखी खराब होता . 

सुदैवाने बस दृष्टीपथात होती . आजूबाजूला वेगवेगळी झाडे होती नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे ती सगळी धुवून निघाली होती . निसर्गसौंदर्य  खूप होतं पण  पण त्याचा आनंद फक्त पुढील बसमध्ये बसलेले मित्रच घेत होते हे दोघे पूर्ण विचारात आणि चिंतेत होते.   

आजूबाजूला दाट हिरवळ त्यातच डोंगररांगांमधील दूरवरून दिसणारे धबधबे बाजूला वाहणारे छोटे छोटे ओहोळ असे वातावरण आणि तिथेच मधून गेलेल्या खडबडीत रस्त्यावरून पुढे बस आणि मागे हे दोघे असं चित्र दिसत होतं. थोड्याच वेळात आणखी एक मोठा नाला लागला त्यावर पुलावरून पाणी वाहत होते पण हा देखील आधी बस ने ओलांडला मग थोड्या वेळात जयेश आणि चंदू आले चंदूने यावेळी शिताफीने पुलावरील पाण्यातून बाईक काढली. हा पूल ओलांडून पुढे आल्यावर मात्र दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला कारण इथून पुढचा रस्ता खूप चांगला होता जसं कि या रस्त्यावर वाहने आलीच नसावीत. रस्त्यावरील पालापाचोळा कचरा पाण्यामुळे धुवून निघाला होता आणि कला कुळकुळीत रस्ता चमकत होता .
या गुळगुळीत रस्त्यावर पुढची पांढरी बस धावत होती आणि त्यामागे दोघांची बाईक थोड्याच अंतरावर जयेश आणि चंदू ला रस्त्याच्या बाजूने शेताच्या बांधावरून देतात तसा जोराची हाक ऐकू आली, "अरे ss तुम्हाला भूक लागली असेल काही खाऊन घे ना पोटाला "
तसा चंदू हसला आणि बोलला "चल जयेश, काहीतरी खाऊन घेऊ "
जयेशनेही त्याला हसून प्रतिसाद दिला "हो ना सांगितलंच आहे तर खाऊन घेऊ "
पुढे अर्धा किलोमीटर गेले असतील तोच त्यांना रस्त्यात एक म्हातारा दिसला. म्हाताऱ्याच्या जवळ कसलेतरी गुलाबी फळं होती .
गाडीचा वेग कमी असल्यामुळे म्हातारा त्यांना म्हणाला ,"अरे पोरांनो लैच जंगलामधीं चाललात. "
त्यावर थोडी माहिती काढायच्या उद्देशाने गाडी थांबवून चंदू म्हणाला,"हो ना बाबा, हा रस्ता कोणत्या गावाला जातो पुढे ? "
त्यावर म्हातारा सुरकुतलेल्या चेहेऱ्यावर एक कुरूप हास्य आणत म्हणाला "हा रास्ता कुटच न्हाय जात पोरांनो "
म्हातारा पुढे बोलू लागला,"बाळांनो तुमि जंगलात हाईत, लै लांब वरून आलेलं दिसत्यात, तर तुमाला भूक लागली आसल नई का ? मी काय म्हंतु ह्ये घ्या थोडी फळं हाईत घ्या खाऊन "
मध्येच जयेश बोलला "नाही बाबा नको आम्हाला "
"अर पोरांनो लै चवदार आन पोस्टीक फळं हैत " म्हातारा बोलला.
चंदूच मन झालं कि म्हाताऱ्याच्या समाधानासाठी एक फळ घेऊन खावं तो हात पुढे करणार तोच जयेश ने त्याच्या कमरेला मागून बोट टोचुन खुणावलं.
आणि बोलू लागला , "नको बाबा आम्हाला फळ जातो आम्ही . चल जयेश "
जयेशने मुकाट्याने गाडी काढली.
म्हाताऱ्याने शेवटची विनवणी केली ,"पोरांनो मी पयसं न्हाई मागत असच देतुया पण खावा हि फळं लय चवदार हैत "
पण नको नको म्हणत दोघे गाडी घेऊन पुढे निघाले.
"काय रे जयेश बिचारा म्हातारा किती आग्रह करीत होता पण तू बोलला म्हणून मला हि संशय आला म्हातारा काहीतरी खाऊ घालून लुबाडायचा आपल्याला"
"हम्म, कसं आहे चंदू आपण अनोळखी जागी आहोत तेही जंगलात मग कशाला रिस्क घ्यायची "
असं बोलत बोलत अर्धा पाऊण किलोमीटर पुढे आले तोच रस्त्यात मध्यभागी म्हातार्याकडे असलेला गुलाबी फळांचा ढीग पडलेला दिसला.
तो ढीग पाहून चंदू आणि जयेश दोघेही खुश झाले पण तरीही एकही फळाला हात न लावला त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूने पुढे नेली.

कारण दोघांच्याही लक्षात आलं कि आत्ताच तर इथून बस गेली मग रस्त्यात हि फळं कुठून आली? नक्कीच कोणी तरी आपण थांबावं म्हणून जाणून बुजून टाकली असावीत. दोघेही विचारमग्न झाले होते. आजूबाजूचं निसर्ग बघत ते पुढे चालले होते.
अंदाजे एक किलोमीटर पुढे आल्यावर त्यांना रस्त्यात एक आदिवासी स्त्री दिसली. त्या स्त्री ने त्यांना हात करून थांबवलं.
"बोला " जयेश बोलला.
"तुम्ही दुपारचे जंगलात चाललात यायला उशीर व्हईल नाय का ?"
"तर मग ?" चंदू बोलला.
"माझ्याकडून हि फळ घ्यावा भूक लागेलच तुमाला थोड्या टाईमान त खायला कामात येत्याल हि फळं "
त्यांनी पाहिलं तर हि बाई तेच गुलाबी फळं त्यांना देऊ लागली "
दोघांनीही एकाच वेळी ते फळं घ्यायला नकार दिला पण यामुळे ती बाई काहीशी चिडली.
"सांगते आहे तर घिऊन टाका ना हि फळं "
जयेश बोलला, "नाही नकोय घेतली आम्ही मागेच बाबांकडून "
"कायला खोटं बोलत्या ? मला म्हाईत हाये तुमि न्हाई घेतलं काय बी, न्हाय तर मला लगेच कळलं असतं " आता ती खरोखर चिडली.
तेव्हा चंदू बोलू लागला, "पण तुम्ही आम्हाला बळजबरी कशाला करताय ? आमची मर्जी ना "
ती बाई चिडून बोलू लागली "जा नका घिऊ आता भूक लागेल तेव्हा बरुबर माघे येऊन खाल" आणि ती फणकार्यात ती फळ रस्त्यावर फेकून निघून गेली.
आता मात्र दोघेही विचारात पडले आपण जेमतेम दहा पंधरा किलोमीटर आधी नवली फाट्यावर भरपूर खाल्लं सोबत पार्सल घेतलं आणि आपल्यला कशाला भूक लागेल. असो हि मार्केटिंग ट्रिक असेल यांची म्हणून दोघे पुढे निघाले.
आता मात्र रस्त्यात कोणीही लागलं नाही पण रस्ता सुनसान होता आणि त्यामुळेच बस नजरेआड झाली असली तरी दूरवरून बसमधील गाण्यांचा आवाज येत होता.
आणि रस्ता इथून तिथून एकच होता त्यामुळे हे पुढे निघाले.

आता रस्त्याला एक मोठा उतार लागला होता . उताराच्या खाली मोठं खूप मोठा मैदानी भाग होता अंदाजे चार किलोमीटरचा परीघ असावा. मोठ्या उतारामुळे यांना आता खालचा रस्ता दिसत होता उताराच्या थोडं पुढे जाऊन बस थांबलेली दिसत होती.
रस्त्याचा उतार संपला तशी दोघांनाही अचानक भूक लागली. तासाभरापूर्वी जेवण करूनसुद्धा आता अचानक भूक कशी लागली हा विचार करून दोघेही आश्चर्यचकित झाले. आणि त्यांना मघाशी भेटलेल्या म्हातारा आणि त्या बाईची आठवण झाली.
"जयेश खूप भूक लागली आहे यार चल जाऊन त्या बाई कडचे फळं घेऊन येऊ ती रस्त्यावर टाकून गेली आहे असेच"
"चंदू पागल झालास का ? मला काहीतरी अमानवीय असल्याचा दाट संशय येतोय त्यामुळे इथलं काहीच खायचं नाही आपण "
"मग हि भूक ? असं वाटतं सकाळपासून काहीच नाही खाल्लं "
"हो रे मला देखील तस वाटत आहे"
"मग आता ?"
"इथलं काही खाऊ नको, मी आपल्या  मित्रांना सोडवल्यावर खायला लागेल म्हणून खूप सारे समोसे आणि पराठे हॉटेल मधून घेतलेत आपण त्यातील काही खाऊन घेऊ "
दोघांनीही रस्त्याच्या कडेलाच खायला सुरुवात केली.
एक समोसा पेक्षा जास्त ते खाऊ नाही शकले कारण जसे त्यांनी दोन तीन घास खाल्ले तशी त्यांची भूक नॉर्मल झाली. मग काय दोन नीट घासांसाठी एवढं मोठं भूक कशी काय लागली असा विचा त्यांना पडला. 
हा दुसरा आश्चर्याचा धक्का होता. आधीच जेवले असल्यामुळे एक एक सामोसा कसा बसा खात त्यांनी पाणी प्यायलं.
आता पुढे आले तर बसचा आवाज रस्त्याच्या एका बाजूला येत होता त्यांनी पुढे येऊन पाहिलं तर रस्त्यापासून बस डाव्या बाजूला वळून आत झाडींमध्ये जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला लागली होती. ते हि तिकडे वळले.
अंदाजे अर्धा किलोमीटर बसमधील गाण्याच्या आवाजाचा पाठलाग केल्यावर त्यांना बस दिसली. बस हळूच चालली होती. मध्ये रस्त्यात कडेला एक मोठं झाड होतं , ते इतकं मोठं होत कि त्याच्या खोडाजवळ फांद्यांमुळे अंधार होता.  त्याच्या पलीकडे काय आहे दुरून काही कळत नव्हतं. बस त्या झाडाच्या खालून गेली त्याच्या फांद्या बसला सर्व बाजूने घासत होत्या. पाठोपाठ जयेश अन चंदू त्या विशाल वृक्षाच्या खाली आले. जस ते झाड त्यांनी ओलांडलं तेव्ह्य तेव्हा त्या पलीकडील नजारा पाहून दोघेही हरखून गेले. खुप मोठ्या मैदानात पसरलेला प्राचीन पण भग्न झालेला महल त्याच्या अवती भवती मोठे मोठे सुंदर झाडं , बाजूला प्राचीन बांधकामे होती पण सगळी पडझड झालेली होती . एकीकडे बाजूला नदी समोर धबधबे आणि त्यातच एक छान मोठंसं आकाराचं फार्महाउस बनवलेलं होत केतनच्या मामाच फार्म हाऊस ते हेच होतं . पण एवढं मोठं फार्म हौस त्या भग्न झालेल्या महाल आणि आजूबाजूच्या पुरातन दगडी बांधकामापुढे इवलसं दिसत होतं. तिथेच एका मोठ्या झाडाच्या बाजूला बाईक लावून जयेश आणि चंदू अंदाज चारशे लांबून लपून बघू लागले . बस जाऊन फार्महाउस च्या अंगणात थांबली. मुलं शांततेत खाली उतरले आत्तापर्यंत तरी सगळेच सुखरूप दिसत होते. सगळं आपापले सामान, बॅग घेऊन फार्महाउस मध जात होते. बसच्या पलीकडे एक एसयूव्ही कारउभी होती. बहुतेक केतनच्या मामाची असावी.  हे दोघे सगळं  बघत असतानाच त्यांच्या मागून एक व्यक्ती त्यांच्याकडे हसत पाहत असलेला दिसला.  तो या दोघांकडे आला. 

"तुम्ही दोघे शुद्धीवर आहेत का ?" तो व्यक्ती बोलला . 

त्यावर जयेश बोलला ,"म्हणजे ? क क काय झालं ? "

पाठोपाठ चंदू चिडून बोलला , "ओ काका नीट बोला, शुद्धीवर म्हणज काय बोलताय ?" 

"अरे तुम्हाला मी बोललेलं कळतंय म्हणजे  तुम्ही शुद्धीवरच आहेत ", तो माणूस आनंदाने म्हणाला. 

"म्हणजे काय झालं काका जरा नीट सांगाल की आम्हाला प्लिज ?" जयेश बोलला. 

"अरे बाबानो हि छोटी टेकडी जी तुम्ही उतरून आलात ती उतरल्यावर माणसं स्वतः च भान हरवतात "

"अरे बाप रे का असं ?"

"माहीत नाही  तुमचा विश्वास बसेल कि नाही पण .." तो पुढे बोलू लागला. 

"हा परिसर अतिशय गूढ आहे य परिसरात काहीतरी मोठा खजिना आहे म्हणतात आणि त्याच्या रक्षणासाठी असणाऱ्या शक्तींचा इथे वावर असतो.  आपण शुद्धीत राहून इकडे काही शोधू नये म्हणून तेआपल्याला वेड लावायचा प्रयत्न करतात. 

तुम्ही कसे बचावला हे तुम्हीच सांगू शकता , कारण मी सुद्धा इकडं आलो तेव्हा मला आठवत होतं पण नंतर अजब गुंगीत गेलो .  कशामुळे गेलो ते अजून कळलं नाही. आज आठवा दिवस आहे मी इथली फळं खाऊन जगतोय. आधीतर मला काहीच कळत नव्हतं पण मध्ये थोडं भानावर आलं कि कळत जायचं. "

त्या माणसाला मध्येच थांबवत जयेश बोलला , "तुम्ही इथले फळ खाऊन आज पर्यंत टीका धरला मग आज फळं खाल्लीत का ?"

"नाही  अजून आज नाही खाल्ली  पण आता भूक लागली आता चाललो खायला तेवढ्यात  तुम्ही दिसलात म्हटलं तुमची काही मदत घेऊन बघू , कारण नंतर परत मी बेधुंद झालो तर मला तुम्ही पण नाही भेटायचे" 

"काका तुम्ही ते गुलाबी फळं खातात का ? " एव्हाना चंदू ला  देखील प्रकरण कळलं होता. 

"हो तेच ते गुलाबी " तो माणूस बोलला. 

"अच्छा तर त्या फळासाठी म्हणून सगळे आग्रह करत होते तर ...  त्या फलापासूनच हि गुंगी, नशा येत असावी " जयेश बोलला . 

"हो शक्य आहे , कारण माझ्या अनुभवानुसार मी काही खाल्ल्यानंतरच मला गुंगी येत होती प मी खायला फक्त ते गुलाबी  फळच खात होतो , खूपच चविष्ठ आहे ते " 

"ओके ओक काका ए काम करा आज तुम्ह तुम्ही फळ नका खाऊ आम्ही देतो ते खा "

आज चमत्कार झाला होता दिलीप नाव होत त्या माणसाचं  त्याला आज नशा नव्हती म्हणजे गोम  गुलाबी फळांमध्ये होती तर,  आता तीनजणांची टीम तयार झाली होती. जयेश, चंदू आणि दिलीप वयाने मोठे असल्याने हे त्यांना काका म्हणत होते. 

अजून तर खरी लढाई बाकीचं  होती.  हा परिसर साधा नक्कीच नव्हता आणि ते गुलाबी फळ खायला घालणारे म्हातारा आणि ती बाई खरी माणसे नव्हती.  ती सगळी माया  होती.  पण पुरातन काळापासून तेच काम करत आल्याने त्यांची शक्ती  खूप कमी झाली होती. नाहीतर त्यांनी त्या परिसरात कोणाला येऊ दिलं नसतं. पण आता तर तिथे  चक्क फार्म हाऊस झालेलं होत. पण अशा भयानक जागी फार्म हाऊस  कसं काय बांधलं असावं ? कि ते बांधणारादेखील तसाच शक्तिशाली किंवा त्यातली जाण असणारा असावा . आणि त्याला तिथे राहून त्याच शक्तींकडून काहीतरी काम करून घ्यायचे असावे. असं काय काम असावं बरं जे त्याला करून हवं असेल काही गुप्त धन  वैगेरे??? हो खजिना हा शब्द दिलीपकाकाच्या काकाच्या बोलण्यात आलाच होता.  पण मग हे मुलं इथं ट्रिप का घेऊन आले असावेत?.  हि साधी सहल नक्कीच नव्हती इथे  खूप मोठा कट शिजत होता ज्यात त्या सहलीत सहभागी झालेल्या बसमधील  सहापैकी फक्त तीन मुलींनाआणि त्या तीन मुलांना माहिती होती.  हो तेच ते.. केतन, मोन्या आणिअक्षय पण तिथे एक एसयूव्ही कार देखील आहे म्हणजे कटात आणखी कोणीतरी सहभागी होते.  कोण? केतनचा मामा ? फार्महाऊस तर त्याचंच आहे मग तोच असावा. 

आता संध्याकाळ होत आली होती, पक्षी  घराकडे परतायला  लागले होते . सूर्य कधीच मावळला होता . संधिप्रकाशातही आकाशात काही चांदण्या दिसायला लागल्या  होत्या .  फार्म हाऊस च्या बाहेर मुलं  मस्ती करत होते.  जयेश, चंदू यांनी दिलीप ल सगळं समजावून सांगितलं होतं त्यामुळे दिलीप देखील त्यांना मदत करायला तयार झाला होता. 

सगळे मुलं मुली बाहेर मस्ती , नकला गाणी म्हणून  डान्स करून थकले मग थोड्या वेळाने फार्म हाऊस मध्ये शिरले.  अर्धा तास झाला पण आता काय करायचं हा तिघांना म्हणजे जयेश, चंदू आणि दिलीप यांनी कळत नव्हतं. ते त्यांची योजना करत असतांनाच त्यांना फार्म हाऊस मधून किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. पाठोपाठ रडण्याचा आवाज देखील येऊ लागला.  मुलं , मुली  रडत होते, ओरडत होते.  आता मात्र तिकडे जाणं  भाग होतं . 

क्रमशः 



Comments