पाठलाग (मराठी भयकथा) भाग ८

 पाठलाग (मराठी भयकथा) भाग ८

केतनचा मामा, वसंत त्याचं नाव होतं. त्याच्या आणि साधू मध्ये धनाविषयी तडजोड झाली आणि त्यांनी दोघांनी मिळून ते धन काढायचं ठरवलं अर्धा अर्धा हिस्सा दोघे वाटून घेणार होते बारा रांजण पैकी सहा वसंत म्हणजे केतनच्या मामा ला आणि सहा त्या साधू ला अशी वाटणी आधीच ठरली होती. आता त्यांना पुढच्या कामाच्या तयारीला लागायचं होतं १२ वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी त्यांना मिळालेला होता पण म्हणून पूर्ण बारा वर्ष ते त्यात घालवणार नव्हते. पोलिसांना चुकवून आणि जगाला फसवून बारा जण गायब करायचे त्यातही सहा तरुण अविवाहित मुली म्हणजे मोठं अवघड काम होतं. इथे एखाद्या गुन्हेगाराने एखादा खून केला तर तो पचवायला त्याला दहा वीस वर्ष परागंदा व्हावं लागतं तरीही सापडला तर फाशी किंवा जन्मठेप . अशावेळी त्याठिकाणी १२ जणांना गायब करणं म्हणजे सोपं काम नव्हतं. पण दोघांनी ते काम सुरु केलं.
त्यांनी त्यांच्या लढाईची पहिली पायरी गाठली, पहिल्या खेपेस त्यांनी एक मुलगा तरुण व्यापारी मुलगा जमीन विकण्याच्या बहाण्याने पळवून देखील आणला त्याला हात पाय बांधून त्या जंगलात घेऊन गेले हि त्यांची चाचणी होती. तोपर्यंत साधूला जंगलाची बरीच रहस्ये कळली होती जसे कि गुलाबी फळ वैगेरे.
त्या मुलाला घेऊन गेल्यावर त्यांनी त्याला गुलाबी फळ खाऊ घातलं आणि तो गुंगीमध्ये गेला. त्याच अवस्थेत त्याला त्या महालात त्यांनी नेलं. तेथील सर्व आकृत्या त्यांचे हे कारनामे बघत होत्या. मशालींच्या उजेडात त्याला त्यांनी हौदाच्या बाजूला साधूने आखलेल्या चौकोनात बसवलं. त्या पिशाचाने सांगितल्या प्रमाणे हौदाच्या भिंतीवरील मूर्तीची पूजा करून मोठ्याने ओरडला "आज एकजण देतोय" "एक " आणि तो बाजूला असलेल्या शिलालेखावरील तिसरी ओळ वाचू लागला. ओळ वाचून पूर्ण होताच दोन मिनिटे शांततेत गेली. त्या वेळात वसंत म्हणजे केतनच्या मामला वाटलं हे सगळं खोटं आहे कि काय. तो गुंगीत आलेला मुलगा हि सारखा मला झोप येतेय म्हणत होता. पण बिचार्याला काय माहित त्याच्यासोबत काय घडत आहे ते त्याला इतके गुलाबी फळ खाऊ घातलं कि त्याला काहीच करता येत नव्हतं. अचानक पुढच्याच मिनिटात तो मुलगा जागच्या जागी अदृश्य झाला.
कुठूनतरी पिशाचाचा आवाज साधूला ऐकू आला, " ताबडतोब निघ तुझं काम झालंय, लवकर निघ आता इथून"
हा आवाज वसंत ला काहीच कळला नाही त्याच्यासाठी फक्त कोणीतरी जोरजोरात गुरगुरुन किंचाळणं ऐकू आलं, त्याला कारण होतं पिशाचांची प्राचीन भाषा फक्त साधूला कळली कारण ते फक्त साधुशीच बोलत होते. इतरांसाठी ते फक्त गुरगुरणं आणि किंचाळणं होतं. ते देखील इतकं भयानक कि कोणी सामान्य मनुष्य तिथून घाबरून पळून गेला असता पण साधू मुळे वसंत तिथे थांबला.
त्यांच्या मर्जी खेरीज त्यांची भाषा कोणाला कळू शकत नव्हती साधूला थोडाफार अभ्यास होता म्हणून त्यांनी त्याच्याशीच संवाद चालू ठेवला होता.
आज एक जण देऊन झाला होता दोघांना हायसं वाटलं आणि बाहेर येऊन कार मध्ये बसले रात्रीच्या किर्रर्र अंधारात ती कार जंगलातील झाडांवर रस्त्यावर उजेड फेकत चालली होती. त्या उजेडात मधेच एखादी आकृती पळतांना दिसायची पण सोबत साधू असल्यामुळे त्या आकृत्या धोकेदायक नव्हत्या हे साधूला आणि साधुमुळे वसंत ला माहित होतं . जंगल ओलांडून ती कार शहराकडे निघायला लागली होती. परत जातांना हायवे ला ते थांबले तिथल्या धाब्यावर मस्तपैकी चहा घेतला आपल्या काळ्या कृत्यांचा दोघांना देखील कौतुक वाटत होतं वर दोघांत चर्चा रंगली, ते दोघे चर्चा करत होते कि या मुलाला आपण कसबस आणला आता हा गायब झाल्याचं निस्तरायला खूप अवघड जाईल त्यापेक्षा आपण इथे काहीतरी लालच लागेल असं काहीतरी करूया जेणेकरून लोक इकडे फिरायला येतील आणि आपण त्यांना आयतं पकडू.
हि युक्ती साधूला देखील आवडली. त्याने त्याला एखादं मोठं हॉटेल किंवा रिसॉर्ट बांधायची सूचना केली. वसंताला देखील ती सूचना आवडली आणि त्यावर त्यांनी काम चालू केलं.
ते रिसॉर्ट बांधून होई पर्यंत काम सोपं नव्हतं पण साधूच्या मार्गदर्शनात सर्व बांधकाम झालं. तिथलेच आदिवासी मजूर त्यांनी आधी गोळा केले पण आदिवासींना त्या भागाचा महिमा माहित असल्याने ते कामास आलेच नाहीत त्यांनी स्पष्ट नकार दिला.मग यावर उपाय म्हणून दुरून परप्रांतीय मजूर आणून काम चालू केलं दररोज संध्याकाळी मजुरांना तिथून बाहेर नेलं जाई व दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आणून सोडलं जात होतं. अर्थात सर्वकाही साधूच्या मार्गदर्शनात चालू होतं . तिथूनच जवळ दगड फोडून काम सुरु केलं. काही सामान जे बाहेरून आणायचं होतं ते ट्रक मध्ये लादून स्वतः वसंत आणत होता. पण कामाला वेग फार कमी होता. ते बांधण्यातच त्यांचे २ वर्ष गेले.
रिसॉर्ट बांधून तर झालं पण तिसऱ्या वर्षापर्यंत तिकडे तीन जण सुद्धा फिरकले नाहीत. दोघांनाही निराशेने घेरलं आता मात्र त्यांना कळलं कि इकडे वर्दळ वाढविण्याचा आपला प्रयत्न चुकीचा आहे , इकडं फिरायला कोणीच येणार नाही. खूप जाहिरातबाजी करून सुद्धा त्यांच्या रिसॉर्ट ची चौकशी करायला कोणीच आलं नाही. त्यांना या गोष्टीच राहावून राहून आश्चर्य वाटत होतं कि असं कसं होऊ शकतं.
यावर त्यांनी नवीन उपाय शोधला लोक इकडे येत नाहीत तर आपण स्वतः लोकांना इकडे आणायला हवं आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलं. एक एक करून ते तरुण अविवाहित स्त्री पुरुष शोधत गेले. पुरुष लवकर आणण सहज शक्य होतं पण स्त्रीला आणणं त्यांना दोघं पुरुषांना अवघड होत. एव्हाना त्यांनी अजून एक तरुण तिथे नेऊन विधी पार पडला होता. पण दोन पुरुष झाले तरी एकही स्त्री नेली नाही म्हणून ते विचारात होते. साधूने वसंताला सुचविले कि मुलींना आणण्यासाठी आपल्याला एक स्त्री ची मदत घ्यावी लागेल आणि म्हणून त्यांनी वसंताच्या बायकोला म्हणजेच केतनच्या मामीला योजनेत सामील केलं, जेणेकरून तिच्यासाठी अविवाहित स्त्रियांना आणणं सोपं जाईल. नवऱ्याला मोठं घबाड मिळणारच आहे म्हणून ती देखील तयार झाली.
आता त्यांना अपेक्षा होती कि पटापट कामे होतील हे सर्व होईपर्यंत भराभरा आठ वर्षे निघून गेली होती.ह्या आठ वर्षाच्या काळात वसंत आणि मीना यांच्या एका मुलीचं आणि दोन मुलांचं लग्न देखील झालं होतं . घरात दोन आधुनिक सुना होत्या घरात सगळ्यात चांगलाच एकोपा होता.

ह्या सगळ्या धामधुमीत हि पहिली आठ वर्ष अशीच निघून गेली आणि आता फक्त चारच वर्ष उरले होते. पण ह्या पूर्ण कालावधीत त्यांनी पिशाचाना फक्त दोन पुरुष दिले होते. अजूनही सहा अविवाहित मुली आणि चार अविवाहित मूलं द्यायचे होते.
आता मात्र दिवसागणिक साधूला आणि वसंत व त्याची बायको मीना यांना खूप चिंता सतावू लागली. त्यांना वाढत्या वयपरत्वे हे अवघड जाणार होतं मग कोणीतरी तरुण भागीदार हवे असं त्यांना सारखं वाटू लागलं .
साधू देखील उशीर होत असल्यामुळे चिडचिड करत होता.

एके दिवशी संध्याकाळी त्यांच्या गप्पा चालू असताना साधू वैतागून बोलला ,
, "तुझ्या सारखा भक्कम भागीदार मी यासाठी निवडला कि आपलं काम पटापट मार्गी लागेल आणि आपण मोकळे होऊ, पण तू तर खूप हळू काम करत आहेस "
"महाराज नीट विचार करा आणि मग बोला, तुम्ही सांगितलेल्या धनासाठी माझा खूप पॆसा मी ओतलाय करत काही नाही म्हणत असाल तर ते तुम्ही "वसंत काहीसा चिडून बोलला.
"अरे हो तुझं सगळं म्हणणं मला मान्य आहे, पण आपण खुप वेळ दवडतोय त्या पेक्षा आपण तरुण मुलांना पार्टनर केलं तर ? "
यावर वसंताची बायको मीना म्हणाली , "हो मलाही असच वाटत आहे, आपण परक्या मुलांना भागीदारीत घेण्यापेक्षा आपल्याच मुलांना घेऊयात"
वसंताचा याला विरोध होता पण नाईलाजाने बाहेरचे भागीदार वाढू नये म्हणून त्याने होकार दिला.
ठरल्याप्रमाणे एके दिवशी त्याने मुलीला आणि जावयाला बोलावून घेतले त्याचा जावई म्हणजे त्याचाच भाचा होता केतन. केतन आणि त्याची बायको दोघेही तिच्या माहेरी वसंत कडे आले . वडिलांनी अचानक का बोलावलं असावं ह्या विचारात ती होती.
त्यांना बसवून मीनाने म्हणजे केतनच्या मामीने दोन्ही मुलांना अक्षय आणि मोनू यांना देखील बोलावलं आणि त्यांच्या दोघांच्या बायकांना देखील बोलावलं कारण त्यांचे नवरे काय करणार आहेत हे त्यांना माहित असायला हवं असं वसंत आणि मीना ला वाटत होत.
अक्षय मोनू आणि केतनची बायको हि तिघे भावंडं होती आणि वसंत हा केतनचा मामा आणि सासरा होता.

केतन त्याची बायको, त्याच्या बायकोचे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायका. केतनचा मामा म्हणा किंवा सासरा म्हणा वसंत आणि त्याची बायको मीना या सगळ्यांशी बोलायला मार्गदर्षन करायला साधू महाराज अशी मोठी बैठक भरली.
आणि त्यांच्या समोर आजपर्यंत घडलेला सर्व इतिवृत्तांत सांगण्यात आला.
साधू ने पिशाच सोबत केलेली बातचीत, बांधलेलं बिनकामाचा रिसॉर्ट , ते गुलाबी फळ ते अद्भुत जंगल सगळं काही माहिती त्यांना दिली.
आणि त्यांची मदत कशी गरजेची आहे हे देखील समजावून सांगितलं. याउपर कोणाचा विरोध असेल तर त्यांना ह्या योजनेत सहभागी व्हायची इच्छा नसेल तर तस सांगितलं तरी चालेल एवढी मोकळीक देण्यात आली.

पण त्यांच्या सुदैवाने दोनच दिवसात सगळ्यांनी या कामासाठी त्यांचा होकार कळविला आणि सगळे मिळून हे काम पार पाडू असं ठरवलं नाहीतरी या धनाचा सगळं लाभ त्या मुलांनाच होणार होता. साधू देखील त्याच्या घर गृहस्थीमध्ये रमण्यास उत्सुक होता त्याला देखील संसाराचा गाडी बंगला, ऐश्वर्य, पत्नी या सगळ्या गोष्टींची स्वप्ने पडू लागली होती.

आणि आता वसंत चे दोन मुलं, दोन सुना आणि जावई आणि मुलगी असे तरुण सहाजण या कामात युद्ध पातळीवर तयारी करू लागले. केतनच्या नेतृत्वाखाली सगळे काम करत होते. सगळ्यात आधी त्यांनी तिथे जाऊन त्या रेस्टोरंट ला फार्म हाऊस मध्ये रूपांतरित केलं .

नंतर शहरात येऊन केतनच्याच नेतृत्वाखाली एक जाहिरात एजन्सी च ऑफिस उघडलं. या मुलांचं नियोजन जबरदस्त होतं. त्या ऑफिस मध्ये कोणीतरी एक काल्पनिक व्यक्ती मालक बनवला. आणि केतन टीम लीडर असं भासवलं आणि बाकीचे पाचजण साधारण कर्मचारी बनले. आणि त्यांनी त्यांचा बुद्धीचा दुरुपयोग सुरु केला.
नोकरी साठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आणि मुलाखती घ्यायला सुरुवात केली. त्यांचा डाव यशस्वी होत होता.
आणि सुरुवातीलाच एक मुलगा आणि तीन मुली भरती केल्या. ऑफिस मध्ये मुलींची संख्या जास्त असल्यामुळे तरुण मुलींना जॉईन होण्यास संकोच नव्हता त्यामुळे त्यांचं इप्सित लवकरच साध्य झालं आणि त्यांनी एका ट्रिप च नाव करून त्यांना त्याच फार्म हाऊस वर आणलं .
तिथून पुढे मग साधू महाराज आणि वसंत आणि मीना यांनी त्या चौघांना रात्रीच्या अंधारात त्या पिशाचाला जस आधी विधी केला होता तसच देऊन टाकलं.
साधूने धानाच्या हौदाजवळ चार चौकोन आखून भिंतीवरील मूर्तीची पूजा केली मोठ्याने बोलला ,"आज चारजण देतोय", "चार". गुलाबी फळांच्या गुंगीत असलेल्या मुलींना आणि त्या मुलाला काही कळत नव्हतं. साधूने शिलालेखात तिसरी ओळ मोठ्याने वाचली त्या ओळीचा अर्थ साधू ला देखील कळत नव्हता, फक्त वाचता येत होतं. दोनच मिनिटात त्या मुली आणि तो मुलगा जागेवरून अदृश्य झाले.
अचानक मोठ्या आणि क्रुद्ध आवाजात पिशाच कुठूनतरी बोलू लागला, "दरवेळेस सांगणार नाही आता शेवटचं सांगतो हे समर्पण केल्यावर ताबडतोब निघून जायचं अजिबात थांबायचं नाही, पटकन इथून जायचं "
मीना तो आवाज एकूणच थरथरत होती पण नवरा आणि साधू मुळे तिला हिम्मत आली होती. साधूने मुलांना मुद्दाम दालनाच्या बाहेर उभं ठेवलं होतं ते तिथूनच मध्ये काय घडतं ते बघत होते.
आता हा सोपस्कार पार पडल्यावर मात्र साधू सह मीना आणि वसंताला खूप बरं वाटलं होता. कारण जे आठ नऊ वर्षात त्यांना जमलं नाही ते मुलांनी एका महिन्यात करून दाखवलं होतं. अजूनही त्यांना समर्पणासाठी चार मुलं आणि तीन मुलींची गरज होती.
आता वेळ होती नवीन कर्मचारी भरती करण्याची. आता त्यांनी ऑफिस च नाव बदललं जागा बदलली आणि पुन्हा जाहिरात देण्यात आली. पण या वेळेस त्यासारख्या योजनेमध्ये पटकन बसेल होईल असा उमेदवार मिळत नव्हता. दोन महिन्यात फक्त एकच मुलगा त्यांना मिळाला तो होता आकाश.

होय आकाश तोच जयेश आणि चंदू चा मित्र अतिशय टुकार , खोटारडा, स्त्रीलंपट अशा आकाश ला त्यांनी रुजू केलं. या वेळी मुलाखतीतून मुली न मिळाल्यामुळे केतन, मोनू आणि अक्षय च्या बायकोने प्रत्येकी एक एक मैत्रीण आणावी असं ठरलं आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी खोटे नाटे बोलून त्या मुली देखील पंधरा दिवसात जमविल्या त्यांना त्यांनी कसलं तरीखोटं अमिष दाखवलं आणि सांगितलं कि कि तीन कुमार आणि तीन कुमारिकांची पूजा करायची आहे ज्यांतून आपल्याला खूप धन मिळेल . आम्ही विवाहित आहोत त्यामुळे आम्हाला पूजेला बसता येणार नाही त्यामुळे तुम्हाला बसावं लागेल असं खोटंच सांगितलं.

आपल्याला फक्त तीन मुलांना पूजेला बसवायचं आणि आपणदेखील बसायचं आहे पूजा करायची आणि पैसे मिळवायचे . या सोप्या कामासाठी त्या तीन अविवाहित मैत्रिणी देखील ताबडतोब तयार झाल्या होत्या. काहीच न करता, गोपनीयता बाळगून फक्त एका पूजेला हजेरी लावून जर भरपूर पैसे मिळणार असेल तर तो कोण नाकारणार आहे का ? हि खोटी गोपनीयता त्या मुलींच्या जीवावर उठू शकणारी होती, पण तरुण अविवाहित मुलींनी याबाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा कारण त्या सॉफ्ट टार्गेट असतात. त्यांनाफसविणं सोपं होतं .
आणि पुढची ट्रिप प्लॅन करायला सुरुवात झाली होती.
ऑफिस मध्ये केतन अजून तीन मुलं कशी जुळवायची हा विचार करत होता इतक्यात.
ऑफिस मध्ये केतनच्या दारावर टकटक झाली, "कम इन "केतन बोलला
"अरे आकाश ये काय म्हणतोस ?"
"सर मला एक विचारायचं होतं , आपण ऑफिशिअल ट्रिप ला जाणार आहोत त्याबद्दल.. " आकाश बोलला.
आकाश ट्रिपबद्दल काहीतरी विचारतोय म्हणून केतनच्या कपाळावर घाम आला पण तरी तो पुढे बोलला,
"हो बोल ना आकाश काय विचारायचं आहे ?"
"सर आपल्या ट्रीपमध्ये मी माझ्या मित्रांना आणलं चालेल का ? प्लिज "
या वाक्याने केतन खूपच आनंदित झाला, "अरे पण ते मॅरीड असतील ना ?"
"नाही सर बॅचलर आहेत "
या वाक्यानंतर तर केतन प्रचंड खुश झाला होता. त्याचं मोठं काळजी करण्याचं कारण आकाश ने मिटविला होतं.
तो बोलला , "चालेल आकाश काहीच प्रॉब्लेम नाहीये तिघांना घेऊन ये ट्रिप ला "
आकाश बुचकळ्यात पडला ,"सर तिघांना ...?... दोघेच आहेत सर ते "
केतन ला स्वतःची चूक कळली त्याला तीन मुलं हवे होते तो चेहरा साधारण करत बोलला, "ओके ओके फाईन नो प्रॉब्लेम दोघांना घेऊन ये "
"थँक यू सर " म्हणत आकाश आनंदाने केबिन बाहेर पळाला. आकाश आणि त्याचे मित्र धरून तीन मुलं झाले पण केतनला अजून एक मुलगा कमी पडत होता.
ठीक आहे एकच तर मुलगा कमी पडतोय तो कधीही कसाही मॅनेज होईल सध्या हे मोठ्या संख्येने हातात आहेत यांच काम आधी करून घेऊन म्हणून ते ट्रिप च्या प्लॅनिंग ला लागले.
ट्रिप साठी केतनने त्याच्या मित्राची म्हणजेच राहुलची बस त्याला न सांगताच आणली. कारण ती बस केतनच्या ऑफिस समोर पार्क असायची आणि तिची चावी मित्र म्हणून केतनच्या ऑफिस ला ठेवलेली असायची . तीच बस घेऊन ते ट्रिप ला जाणार होते.

*
आकाशने आनंदाने त्याच्या दोनी मित्रांना जयेश आणि चंदू ला फोन केला, इथेच जयेश आणि चंदू चा या सगळ्या नाटकात प्रवेश झाला होता. आणि पुढचा सुरुवातीचा सगळं घटनाक्रम घडला तो असा.
आकाश च्या आमंत्रणामुळे ते ट्रिप ला निघाले, बस मध्ये हॉटेल ला थांबली तेव्हा मध्येच त्यांना यांची फसवणुकीची योजना मुलींच्या स्वच्छतागृहात केलेल्या गप्पांमुळे कळली आणि ते सतत बसमधून पळण्याचा मार्ग शोधू लागले. पण केतन च दुर्दैव आणि जयेश अन चंदू च सुदैव म्हणून नवली गाव ओलांडताच केतनच्या मोबाईल वर वसंत मामाचा फोन आला तो आणि साधू बस च्या पुढेच गेले होते पण त्यांनी निरोप दिला कि दोन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे त्यामुळे बस काय कोणतंही वाहन येऊ शकत नाही आम्ही माघारी फिरतोय तुम्ही देखील काहीतरी वेगळा प्लॅन करा.
त्यामुळे मोठ्या नाईलाजाने त्याने बस माघारी घेतली. माघारी येत असतांना जयेश, चंदू आणि आकाश यांना पकडून ठेवायचं त्यांच्या मनात होतं कारण तिघांना त्यांच्या कामाची थोडीशी भनक लागली होती पण नवली गावाजवळ बस पोचताच जयेश आणि चंदू बसमधून पसार झाले.

त्याच वेळी केतनला राहुलचा म्हणजे त्या बस मालकाचा फोन आला. त्याला ती बस घेऊन त्याच दिवशी दुपारी अर्जंट कुठेतरी जायचं होत, एक टुरिस्ट लोकांचा गृप त्याला सोडवायला घेऊन जायचा होता त्याला त्याच वेळी ती बस हवी होती.
ध्येयाच्या इतक्या जवळ आल्यावर आधी पुराने आणि आता बस चा मालक राहुलने देखील ऐन वेळी खो घातला होता. केतन राहुल वर प्रचंड संतापला होता पण कस बस तो शांततेत त्याला बस द्यायला तयार झाला कारण चूक त्याची होती न विचारताच हा बस घेऊन आलेला होता. आता त्याला सगळ्यांना शहरात सोडून देणं भाग होतं पण आकाश त्याच्यासाठी धोकेदायक होता कारण आकाशला त्यांचे काहीतरी कपटी मनसुबे आहेत हे कळलं होतं. त्यामुळे आकाशला बंदी बनवून ठेवणं गरजेचं होतं. हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा दूर गेला होता. आजच समर्पण रद्द झालं होतं.

जयेश व चंदू पसार झाले म्हणजे त्यांना पुढची कल्पना आली असणार आणि त्यांनी आकाश ला देखील सावध केलं असणार म्हणून त्याने तांबडतोब बस च्या मागोमाग येणाऱ्या कार मध्ये असलेल्या साधू महाराज , वसंत आणि मीना यांना ताबडतोब नावली बस स्टॅन्ड वर खोटे पोलीस बनून उभं राहायला सांगितलं आणि दोन मूलं येतील त्यांना ताब्यात घ्यायला सांगितलं. त्यांच्या कार मध्ये सगळं साहित्य होताच नकली गणवेश वैगेरे तिथेच एका हॉटेलच्या वॉशरूम मध्ये कपडे बदलून ते तयारी निशी येणाऱ्या दोन मुलांच्या शोधात तिथं थांबले .
बराच वेळ वाट पाहिली तरी कोणी येईना पण मधेच एक मुलगा येऊन त्यांना त्याच बसची तक्रार द्यायला आला या नकली पोलीस बनलेल्या वसंत, मीना यांनी त्याला चेहऱ्याने ओळखलं नाही पण तो वर्णन करत असलेली बस तीच होती म्हणून त्याला पकडण्यासाठी त्यांनी खोटंच आकाशच खून झाला असं सांगितलं . या मागे कारण होतं जेणेकरून जयेश घाबरेल आणि चौकशीच्या नावाखाली आपण याला ताब्यात घेऊ असा त्यांचा डाव होता पण दुर्दैवाने तिथे नकली पोलीस अधिकारी बनलेल्या मीना, वसंत आणि साधू महाराज यांना समोर उभा असलेल्या त्या मुलाच्या म्हणजेच जयेशच्या पाठीमागे खरे खुरे पोलीस दिसले आणि ते पोलीस त्यांच्याचकडे येत होते त्यामुळे यांना जयेशकडे दुर्लक्ष करून त्याला सोडून द्यावं लागलं. जयेशच्या पाठीमागे असल्यामुळे त्याला ते खरे पोलीस दिसले नाहीत आणि तो आकाशच्या खुनाच्या बातमीने चक्रावून त्याच्याच धुंदीत निघून गेला. खरे पोलीस यांच्याकडे आल्यावर यांनी आपण नाटक मंडळीत काम करणारे आहोत असे सांगितलं आणि वेळ मारून नेली. पण त्या पोलिसाना यांचा विश्वास बसत नव्हता त्यांनी शहानिशा करण्यासाठी तिघांना ते पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले तिथे या तिघांचा इतका वेळ घेतला कि यांना परत जयेशला शोधायला वेळच मिळाला नाही कसेबसे पैसे देऊन ते सुटून आले. पण हे मात्र जयेशच्या पाठयववर पडलं आणि तो वाचला.


चंदू नवली गावात नातेवाईकांकडे पळून गेला होता . आणि जयेश तिथून फाट्यावरून दुसऱ्या बस मध्ये बसून परत शहरात आला सुदैवाने जयेश त्या नकली पोलिसांच्या तावडीतून वाचला होता. शहरात आल्यानंतर जयेश ने आपल्या फ्लॅट वरील महत्वाचं सामान आणि कागदपत्र आवरलं आणि गावाकडे निघून गेला.
हा सगळं घटनाक्रम आधी घडला होता पण यात आकाशच काय झालं ते कळलं नव्हतं. बस शहराकडे परत नेण्यापूर्वी त्यांनी मागून आलेल्या कार मध्ये आकाश ला टाकलं केतनला बस घेऊन शहरात जायचं होत आणि वसंत , साधू आणि मीना हे त्या दोन मुलांवर लक्ष ठेवून नवली फाट्यावर थांबले त्यामुळे वेळ होईल आणि ट्रिप रद्दच होतेय म्हणून त्या तीन मुलींनी देखील शहरात जाण्याचं निर्णय घेतला. सगळे वेगवेगळ्या कामात विभागल्या गेल्यामुळे त्या दिवशी समर्पण करणं रद्द केलं पण आकाशला नियंत्रणात ठेवणं अवघड होतं . कारण त्याला सत्य कळलं होतं. त्यामुळे आकाश ला कार मध्ये टाकून अक्षय, मोन्या फार्म हाउस ला जाणार होते पण नदीला आलेल्या पुरामुळे पलीकडे जात येत नव्हतं त्यामुळे ते त्याला घेऊन शहरातच आले.

त्यांनी आकाशला आपल्याकडे बंदी बनवून ठेवलं होतं त्याच्या फोनवर जयेश आणि चंदू फोन करतील या आशेने त्यांनी त्याचा मोबाईल चालू ठेवला होता पण जयेश किंवा चंदू दोघांपैकी कोणीच फोन केला नाही. त्यांनी फोन न करण्याला कारण होतं जयेश इथून सरळ गावाकडे गेला त्याचा मोबाईल चार्जिंग अभावी बंद झाला होता आणि चंदू कडे आकाश चा नंबर च नव्हता त्यामुळेदोघांपैकी कोणाचाच फोन आला नाही .


आता केतन आणि त्याची टीम पुढच्या प्लॅनिंग मध्ये लागली होती पाऊस थांबला होता आणि नेमक्या दुसऱ्याच दिवशी राहुल बस घेऊन शहरात परत येणार होता त्यामुळे त्याने यावेळी राहुलवरच जाळे टाकलं. आणि राहुल सह त्याचे दोन मित्र विनीत आणि केतन म्हणजेच दिगू नानाचा भाचा या तिघांना ट्रिप साठी आमंत्रण दिल त्या तिघांनाही फिरायचं वेड असल्याने त्यांनी ताबडतोब होकार दिला. सोबत त्यांनी ट्रिप ला येण्यासाठी जयेश आणि चंदू शी नुकतीच ओळख झाली होती म्हणून राहुलने त्यांना देखील विचारलं पण त्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना असल्यामुळे त्यांनी नकार दिला.

पण सावध झालेल्या जयेश आणि चंदू ने पोलिसांना माहिती देऊन यांच्या बस चा पाठलाग करत यांचे सगळे उद्योग पोलिसांसमोर आणायचं ठरवलं. बसमध्ये यावेळी केतन सह त्याचे दोन मित्र म्हणा किंवा बायकोचे भाऊ मोन्या आणि अक्षय होते सोबतच राहुल विनय आणि दिगुनानाचा भाचा केतन असे एकूण सहा मूलं आणि गेल्या वेलीच्या सहा मुली ज्यात तीन मुली अनुक्रमे केतन मोन्या आणि अक्षय यांच्या बायका होत्या.
आकाशला वसंत त्याची बायको मीना आणि साधू हे गुपचूप कार मधून पुढे घेऊन गेले होते आकाश अजूनही जिवंत होता.
यावेळी पूर्ण सावधानता बाळगत त्यांनी बस नवली फाटा वगळता कुठेच थांबवली नव्हती आणि यावेळेस नदीला पूर देखील नव्हता. या बसच्या पाठोपाठ पाठलाग करत जयेश आणि चंदू मोटारसायकल वर येत होते. आणि त्यांच्या मागून पोलिसांची एक साधारण दिसणारी कार येत होती पण घाट ओलांडल्या नंतर ट्राफिक मुले पोलीस आणि याच्या बाईक मध्ये खूप अंतर पडलं.
इकडे आधी जस झालं तसच त्यांची बस दोन छोट्या नद्या आणि डोंगर ओलांडून पुढे उताराला लागली तिथून मग डावीकडे मध्ये वळून दाट सावली असलेल्या झाडाखालून पुढे मैदानात जाऊन फार्महाऊसच्या आवारात शिरली पहिल्यांदाच हि बस फार्म हाउस पर्यंत पोचू शकली होती, बस नेण्यासाठी कारण होत ते असं कि त्याच बसमध्ये तिथे मिळालेलं धन भरून आणता येणं सोपं जाणार होतं . फार्म हाऊस मध्ये कोणीच नव्हतं पुढे कार मधून आलेले वसंत मीना आणि साधू महाराज यांनी आकाशला सरळ महालाच्या अवशेषांमध्ये नेवून लपवलं होतं .

आता महाराज विधी साठी लागणारी तयारी करू लागला. आधी ध्यान धारणा करू लागला कारण आज त्यांच्या आयुष्यतील खूप महत्वाचा दिवस होता आज ह्या उरलेल्या चार मूलं आणि तीन मुळींच समर्पण झाल्यावर त्यांना सगळं धन आयतं बाहेर काढून मिळणार होतं.

आता कथा मूळ कथेसोबत आली.

साधू ने पूर्ण तयार करून आकाश ला तिकडेच मध्ये लपवून ठेवलं होतं आणि आता तो या सगळ्यांची उरलेल्या मुलं मुलींना घेऊन येण्याची वाट बघत होता.
तोच मागून पावलांचा आवाज आला आणि साधू खुश झाला. वसंत म्हणजेच केतनच्या मामाकडे बघून तो आनंदाने बोलला, "खूप छान आणि परफ़ेकट काम केलंत या वेळी तुम्ही, मी खूप खुश आहे आणि आज तो देखील ही आजची भेट पाहून खुश होईल आणि आपल काम आजच पूर्ण होईन जाईल "

यावर केतनचा मामा बोलला, "ते जरी सगळं खरं असलं तरी आपल्याला इथे परत परत यायचं नाहीये , त्यामुळे एकदाच सगळं आवरून घेऊ इथून आणि ह्या वाईट जंगलात परत नकोच यायला चार वेळा आपण त्याला असं थोडं थोडं देऊ शकणार नाही म्हणून आज हा शेवटचा खेळ "
"हो तुझं अगदी बरोबर आहे " एवढं बोलून तो साधू पुन्हा त्याच्या कामाला लागला.
साधूने पुढील सूचना केली "तुमची टॉर्च बंद करा आणि मशालींचा उजेड करा. हा कृत्रिम उजेड बघून तो येणार नाही आला तरी तो आपल्याला घुसखोर समजेल त्यामुळे टॉर्च , ई. बंद करून मशाली पेटवा"
साधूचा आदेश येताच केतन, मोन्या आणि अक्षय मशाली पेटवायच्या कामाला लागले.
हा सगळं कार्यक्रम जयेश आणि चंदू लांबून बघतच होते. साधूंच्या आणि केतनच्या मामाच्या बोलण्यावरून कळत होतं कि हे लोक यांना समर्पित करणार आहेत म्हणजेच नक्कीच ठार मारणार या अंदाजपर्यंत ते आले होते आत त्यांना काही करून सगळ्यांना वाचवायचं होतं. पोलीस इतक्या लवकर येणं शक्यच नव्हतं कारण अजूनही दिलीप पोलिसांपर्यंत पोहचला नव्हता.अंधारात जयेश आणि चंदूच्या बाजूला असलेल्या भिंतीवर बसून काही आकृत्या फिदीफिदी हसत होत्या अंधारात त्यांचे दात चमकत होते त्यांचे पाय इतके खाली लोम्बले होते कि जयेशच्या डोक्यापासून पाच फुटांवर त्यांचे पाय आलेले होते. हा सगळा खेळ ते तटस्थ पणे पाहत होते.

गुंगीत जाऊन पोलिसांना आणायला निघालेल्या दिलीप ला वाटेत वेगवेगळेच चमत्कार दिसत होते. इतर वेळी गुंगीत असल्यामुळे जाणवत नव्हते पण आज तो शुद्धीत होता आणि त्याची वाट बिकट होती. कधी त्याच्यासमोर वाघ यायचा, कधी एखादा हत्ती कधी एखादा साधू भेटायचं तर कधी एखादा त्याच्यासारखा भटकलेला मनुष्य पण या सगळ्यांना टाळत टाळत तो पोलिसांकडे जात होता. त्याला माहिती होतं कि हे सगळं खोट आहे , हे लोक मला फळ खाऊन गुंग करतील त्यामुळे तो नाकासमोर फक्त चालत राहिला. खूप खडतर वाट होती त्याची सुदैवाने जयेशच आणि त्याच बोलणं त्या शक्तींनी एकल नव्हतं नाहीतर पोलीस बनून देखील ते त्याच्या समोर आले असते.
एकदा कोणीतरी त्याला मागून लाथ देखील मारली कारण तो एकटा होता पण त्याने निश्चय सोडला नाही त्याने मागे वळून देखील पाहिलं नाही सरळ चालत राहिला. जिवंत मनुष्यला घाबरविण्याची क्षमता त्या शक्तींमध्ये होती पण त्याला शारीरिक इजा कारण त्यांच्यासाठी खूप अबघड काम होत. ती एक लाथ मारून ज्याने मारली तो वर्षभरासाठी पंगू झाला होता. कारण त्यांची शक्ती फक्त लोकांना घाबरविण्यासाठी आणि भुलविण्यासाठी होती.

इकडे सर्व मुलांना त्या महालात आणण्यात आलं हळूच आकाश ला देखील त्यांनी बाहेर काढलं आकाश ला पाहून जयेश आणि चंदू आनंदित झाले कारण आकाश जिवंत म्हणजे होता . त्याचा खून झालेला नव्हता.

क्रमश :

 

Comments