पाठलाग (मराठी भयकथा) भाग ७

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ७

 जयेश आणि चंदू ला जोडीला दिलीप मिळाल्यामुळे जरा धीर मिळाला होता. फार्म हाऊस मधून येणाऱ्या किंचाळण्याच्या आवाजांमुळे आता तिघेही थोडे घाबरले होते पण त्यांना त्या तीन मुलांना वाचवायचं होतंच . त्यामुळे ते गवतातून झुडुपांमधून तिकडे लपत छपत जाऊ लागले. अर्धा रस्ता ओलांडला. थोड्याच अंतरावर फार्म हाऊस च कुंपण होतं, ते कुंपण ओलांडून आत शिरले तेव्हा मात्र आरडा ओरडा बंद झालेला होता फक्त काहीतरी धूस फूस जाणवत होती. तिघेही गुपचूप हॉल च्या खिडकीजवळ आले जयेशने दिलीप ला इशार्यानेच पाठीमागे कोणी येईल म्हणून लक्ष ठेवायला सांगितले . फार्म हाऊस चा हॉल चा पोर्चमध्ये जाणार मुख्य दरवाजा उघडा होता त्यामुळे कोणी बाहेर आलं तर या तिघांना सहज बघू शकत होता यांना मदत होती ती फक्त अंधाराची. जयेशने आधी खिडकीच्या बाजूने मध्ये डोकावून पाहिलं मध्ये पाच सहा जण उभे दिसत होते.पण बाकीचे सहाजण काही दिसत नव्हते जयेश खिडकीच्या आणखी जवळ आला तर त्याला दिसलं खाली गुळगुळीत फरशीवर हात, पाय आणि तोंड बांधून पडलेले विनीत, राहुल आणि दिगू नानाचा भाचा केतन हे तिघे आणि त्यांच्याच बाजूला त्याच मुलींमधील तीन मुली तशाच अवस्थेत बांधलेल्या दिसल्या. हा मात्र जयेश साठी धक्का होता त्या तीन मुलींना का बांधलं असेल ? सोबतच बाजूने चंदू देखील हे दृश्य बघत होता. त्या तीन मुली तर त्यांच्यापैकी होत्या मग त्यांना का बांधलं असावं ? दोघेही विचारात पडले.इथे त्यांचा जुना मित्र आकाश मात्र दिसत नव्हता. 
तिथे खिडकीच्या जवळ एकमेकांशी बोलणं अशक्य होतं त्यामुळे दोघे एकमेकांच्या तोंडाकडे आश्चर्याने पाहू लागले. तोच समोरच्या अर्धवट जीर्ण झालेल्या जुनाट महालाच्या अवशेषांमधून एक कार फार्म हाऊस च्या दिशेने येतांना दिसली तिचा रात्रीचा प्रकाश दूरवर पडत होता तो प्रकाश तोंडावर पडण्याआधी तिघेजण बाजूच्या भिंतीआड गेले.

ती कार फार्म हाऊस च्या मध्ये आली त्यातून एकजण उतरला. तो धावतच आत शिरला.
"अरे चला रे किती वेळ लावताय तो जागृत व्हायची वेळ जवळ येतेय. आपल्याला वेळेच्या आत सगळं खेळ संपवायचा आहे, कारण जरासुद्धा इकडे तिकडे झालं तर कोणीच वाचणार नाही"
"हो हो, हे काय आम्ही पूर्ण तयारीनिशी आलोय ह्या वेळेस हे बघा हे तिघे आणि ह्या तिघी", असं म्हणत तिथे उभा असलेला केतन बोलताच. मोन्या आणि अक्षय हसले. ती कार मधून आलेल्या व्यक्तीने बाजूला पडलेल्या त्या सहाजणांकडे एक कटाक्ष टाकला.
"यांचे हात पाय का बांधलेत ?"
"तुम्हीच सांगितले ना ते शुद्धीवर असणं गरजेचं आहे म्हणून "
"अरे मुर्खानो पण मग हात पाय बांधल्यावर ते बसणार कसे काय ? त्यांना गुलाबी फळ खाऊ घातलं असतं तरी चाललं असत".
तोपर्यंत कारमधून एक बाई बाहेर निघाली काही सामान घेऊन.

त्या बाईच्या नजरेतून जयेश थोडक्यात बचावला, कारण तो त्या माणसाला बघायला जाणार होता पण तेवढ्यात मागून ती बाई आली सुदैवाने तिने त्याला पाहिलं नव्हतं. ती पोर्च मधून आत शिरताच आता तो पुन्हा त्या हॉल च्या खिडकी कडे निघाला तिथे आजूबाजूला विचित्र दिसणारी फुलझाडे लावलेली होती. काहींचा सुगंध छान होता तर काहींना उग्र दर्प होता.
लाल , पिवळे, निळे, पांढरे असे वेग वेगळ्या रंगांचे फुलं बाहेरील दिव्याच्या प्रकाशात दिसत होते.
हळूच तो खिडकी जवळ आला मध्ये त्या लोकांनी काहीतरी काम करायला सुरुवात केली होती.
त्याने हळूच मध्ये डोकावून पाहिलं तर मध्ये एक स्त्री पाठमोरी उभी राहून बोलत होती ,"हे बघा काही असो आपल्याला पटापट करायला हवं थोड्याच वेळात तो जागा होईल, त्याचे साथीदार आले तर काहीच साध्य होणार नाही "
पण मामी मी काय म्हणतो, "आपण या सहा जणांना तिकडेच न्यावं लागेल का ? इथे नाही करता येणार का विधी ?" केतन बोलला. 
"नाही केतन ज्या जागेवरून तुम्हाला धन काढायचं आहे तिथेच पूजा करावी लागेल आणि त्याच्या समोर त्याला हे दिसले पाहिजेत ", मामी थोडक्यात बोलली.
ती केतनची मामी होती तर आता जयेशला कळलं,आणि म्हणजे तो दुसरा मनुष्य त्याचा मामा असला पाहिजे.
खूप सारे प्रश्न डोक्यात पिंगा घालत होते. पण त्यांची उकल हळू हळू होत होती. ही स्त्री केतनची मामी होती तर तो पुरुष मामा होता यांना भग्न झालेल्या महल सदृश वास्तूच्या अवशेषांमधून गुप्तधन काढायचं आहे इतकं कळलं होतं.
पण या तीन मुलींना का बांधलं त्यांनी ? पूजेसाठी ? पण त्या तर त्यांच्याच योजनेमध्ये सहभागी होत्या मग तरी ? हा प्रश्न सुटलेला नव्हता.

फार्महाऊसच्या हॉल मध्ये केतनच्या मामीने एक हळदीचं वर्तुळ रेखाटलं आणि त्या बांधून ठेवलेल्या सगळ्यांना त्यात आणलं. त्याच्या तोंडावर पट्टी बांधली असल्यामुळे ते बोलू शकत नव्हते फक्त हम्म हम्म करून रडत होते. त्यांना कळलं होत कि आपल्यासोबत काहीतरी भयंकर होत आहे .
मुलींची अवस्था देखील खूप वाईट होती त्या देखील रडत होत्या. त्यांना वर्तुळात आणताच तिने दोघांच्या मदतीने त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडावरील पट्टी काढून त्यांच्या तोंडात गुलाबी फळ  कोंबलं आणि ते बेधुंद झाले आणि अर्धवट गुंगी येऊन खाली लोळत पडले त्यानंतर तिने एक पांढरं फुल त्यांना हुंगायला दिल आणि तोंडावर पट्टी पुन्हा बांधली आणि आश्चर्य म्हनजे त्याबरोबर त्यांची धुंदी निम्म्यापेक्षा कमी झाली आणि ते पायावर उभे राहून चालू शकतील इतके सशक्त झाले पण धुंदीतच  ते होते.

"लक्षात ठेवा यांना आणखी पाच मिनिटांनी हे फुल हुंगायला दिलं तर हे पूर्ण शुद्धीवर येतील पण तस अजून तरी नाही करायचं " एवढं बोलून मामी पुढे चालू लागली.

चालताना मामीने त्या बांधून ठेवलेल्या मुला मुलींना खडसावलं, "जर जिवंत राहायचं असेल तर माझ्या सोबत चला नाहीतर इथे फुकट मराल. "

"जिवंत ?" म्हणजे हे यांना मारणार नाहीयेत का ? " चंदू ने जयेशला प्रश्न केला.

"हं पण काहीतरी भयंकर नक्कीच करतील असं दिसतंय "जयेश बोलला.
एव्हाना हातात मोठी पूजेची थाळी घेऊन केतनची मामी आणि मामा दोघेही फार्महाऊसच्या बाहेर जाऊ लागले.
केतन, मोन्या, अक्षय तिघे व त्यांच्या सोबत असलेल्या तीन मुली यांनी बांधून ठेवलेल्या तीन मुलांना आणि तीन मुलींना पायी चालता येईल इतपत मोकळं केलं . आणि त्यांना बाहेर नेऊ लागले जीवाची भीती असल्यामुळे ते सहाजण त्यांच्या सोबत रडत रडत चालू लागले.

तोच मामाने आवाज दिला, "इथून पटकन निघा आम्ही त्यांना उठविण्याची प्रक्रिया करून आलो आहोत ते इकडे येऊ शकतात"
तेवढयात मामी ओरडली, "केतन, मोनू अक्षय तुमच्या बायकांच्या हात हातात असू द्या म्हणजे त्यांनी पाहिलं तरी त्यांना कळेल कि ह्या तुमच्या बायका आहेत आणि विवाहित आहेत".

"नाही गं हे चौकोनाबाहेर बाहेर आहे काही नाही होणार " मामा बोलला. 
या सर्व संवादावरून एक कळत होतं की काहीतरी अमानवीय इथे आहे, ते जे कोणी होते ते क्रूर होते पण त्यांना सुद्धा नीतिमत्ता होती तर माणसापेक्षा कैकपटीने जास्त पण क्रूर देखील होतेच ते पण आज मानवच त्यांच्या घरात घुसून त्यांना फसवायला निघाला होता एक स्वतःला सभ्य म्हणवणारा प्राणी मानव त्यांचं धानाच्या लालसेने निघाला होता.
आता इतका उलगडा झाला होता कि बाकीच्या मोकळ्या असलेल्या तीन मुली केतन, मोन्या आणि अक्षय यांच्या बायका होत्या.

इतक्यात त्यांच्यातील एका मुलीची तोंडावरूल पट्टी चुकून उघडताच ती ओरडली ,"तुम्ही फसवलं आम्हाला तुम्ही बोलले होते कि आम्हाला काही नाही होणार म्हणून आम्ही साथ दिली "
त्यासरशी केतनच्या बायकोने तिला सणदिशी थोबाडीत हाणली ,"तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ? सांगितलं न तुला काही होणार नाही म्हणून, तर मुकाट्याने चाल "
आणि तिच्या तोंडावर पुन्हा पट्टी बांधली. म्हणजे जसं विनीत, राहुल आणि दिगु नाना चा भाचा केतन यांना या लोकांनी फसवून खोटं बोलून आणलं होतं तसच त्या तीन मुलींना देखील त्यांनी काहीतरी खोटं  सांगून फसवून आणलं होतं. खूपच नीच माणसं होती तर ही. पण ह्या सर्व नाट्यामध्ये अजून एक जण होता ज्याने याची सुरुवात केली होती.
**
दुरून कुठून तरी दीर्घ शीळ ऐकू येत होती, कदाचित हा तिथे असणाऱ्या शक्तींच्या वावराच्या संकेत असावा.


जयेशला अचानक काहीतरी आठवलं, ती जी मामी होती केतनची तीच तर त्याला नवली फाट्यावर भेटली होती नकली पोलीस अधिकारी बनून सोबत तो केतनचा मामाच होता तिच्यासोबत पोलिसी वेशात आणि आणखी एक कोणीतरी होता. तिने त्याला सांगितलं होतं कि आकाश चा खून झाला म्हणून. तर त्याचा संशय खरा निघाला ते नकली पोलीस होते आणि त्यांनी जयेशला फसवलं होतं पोलिसांत जाऊ नये म्हणून पण जे व्हायचं ते झालंच होतं.
पोलिसांवरून जयेशला आठवलं इकडे येतांना तो आणि चंदू गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन संभाव्य घटनाक्रम सांगून आले तसेच आकाशच्या मिसिंग ची तक्रार देखील नोंदवून पुराव्यासह गुन्हेगार पकडण्यासाठी म्हणून त्यांना त्यांच्या मागे येण्यास सांगून आले होते. पोलिसांनी जयेश आणि चंदू सोबत एक जीपीएस डिव्हाईस दिले होते ज्यामुळे त्यांचं लोकेशन कळत होतं . पण आता ते अजून इथपर्यंत आले नव्हते त्यामुळे जयेशने ताबडतोब कॉल करायला मोबाईल काढला, आणि फोन लावला सुदैवाने मोबाईल ला नेटवर्क होतं, सात आठ रिंग वाजल्यानंतर फोन उचलला.
"हल्ल्ल्लो "
"मी जयेश बोलतोय तुम्ही कुठे आहात ?"
"जयेश sss अरे आम्हाला खूप झोप येतेय तू प्लिज नंतर फोन कर ना ... " समोरून एक पोलीस निरीक्षक चा भान गमविल्यासारखा आवाज येत होता.
"अहो इथे सहा जणांचा जीव धोक्यात आहे तुम्ही असे मध्येच कुठे झोपताय ??"
"अरे काय करू आमच्या पैकी कोणाला गाडी सुद्धा चालविता येत नाहीय "
"बरं तुम्ही आत्ता कुठे आहात ?"
"आम्ही आता इथे दुसऱ्या नाल्याला ओलांडून दोन तीन किलोमीटर पुढे आलोय आम्हांला खूप भूक लागली होती .... "
जयेश काय समजायचं ते समजून चुकला होता. त्यांनी गुलाबी फळ खाल्लं असणार. 
त्याने दिलीप कडे पाहिलं, "तुम्ही एक काम करा पोलीस उताराच्या पलीकडे पर्यंत डोंगराच्या पलीकडे आलेच आहेत तुम्ही त्यांना घेऊन या आम्हाला या जंगलाची फारशी माहिती नाहीये प्लिज एवढं करा"
दिलीप एका शब्दात तयार झाला. आणि वाटेकडे निघाला. तेवढयात केतनचं लक्ष दिलीप कडे गेलं ते बागेतील पांढरी फुल तोडून सोबत घेऊन चालले होते.
ते बघून केतन आणि चंदू च्या चेहऱ्यावर आनंदाची झलक उमटली. हि तीच पांढरी फुल होती जी हुंगल्याने मधील मुलांची धुंदी कमी झाली होती आणि आणखी पाच मिनिटाने हुंगविल्यावर पूर्ण शुद्ध येणार होती. दिलीप तीच फुलं घेऊन निघाल्यामुळे दोघांना आनंद झाला कारण आता पोलीस लवकर येऊ शकत होते. लवकर म्हटलं तरी त्यांना एक ते दीड तास लागणार होता कारण पाच किलोमीटर अंतर पायी रात्रीच्या अंधारात तुडवत जाऊन दिलीप त्यांना आणणार होता. आणि त्यांना आणायला निघालेल्या दिलीप ला रस्त्यामध्ये रोखायचे प्रयत्न देखील होणार होते आणि हे दिलीप जाणून होता. पण आज हा खेळ संपायला हवा आणि या मुलांना वाचवून आपण येथून बाहेर निघायलाच हवं या इर्षेने तो पेटला होता.


पण आता या सहा जणांचं काय ते तर मामीच्या मागे मागे जाऊ लागले सगळे हॉल च्या बाहेर आले तेव्हा जयेश, चंदू आणि दिलीप तिघेही लपले. कार तशीच सोडून ते काहीतरी सामान एक मोठ्या पिशवीत घेऊन सगळे त्या जीर्ण झालेल्या महालाच्या दिशेने निघाले. जवळपास आठ एकरात त्याचे अवशेष पसरले होते यावरून तो महल खूप मोठा असावा असा अंदाज येत होता. 

"केतन मी सांगेल तेव्हा आपणआत्ता जिथे जात आहोत तिथे बस घेऊन ये , कारण माल खूप आहे " केतनचा मामा त्याच्या कानात कुजबुजला. केतन ने होकारार्थी मान फक्त हलविली. 
ढग दाटून आले होते त्यामुळे वातावरणात अजूनच अंधार भरून राहिला होता. गवतातील किडे देखील आता शांत होते फक्त रातकिड्यांचा आवाज तेवढा ऐकू येत होता ती एक पावसाळी रात्रच होती आणि ती देखील निवडायला कारण होतं ते कारण मात्र गोपनीय होतं.
हळू हळू केतनचे मामा मामी आणि त्यांच्या मागे काही साहित्य घेऊन केतन, मोन्या ,अक्षय आणि अर्धवट धुंदीत असे विनीत, राहुल आणि दिगु नाना चा भाचा केतन असे तीन जण त्या तीन अनोळखी मुलींसोबत त्या जीर्ण झालेल्या महालाच्या दिशेने चालत होते. ह्या जागेवर अजूनही पुरातत्व खात्याचं लक्ष गेलं होतं पण ते फक्त एक बोर्ड लावण्यापलीकडे काही करू शकले नव्हते. तो बोर्ड देखील इंग्रजांच्या काळातील वाटत होता कारण तिथपर्यंत पोचणं हेच जिकिरीचं काम होतं तिथल्या अमानवी शक्ती तिथं पर्यंत कोणी पूर्ण शुद्धीवर पोचणार नाही याची पूर्ण काळजी घेत असत. पण कालांतराने त्या राजवाडा म्हणा किंवा महाल म्हणा तिथपर्यंत कोणाला पोचू न देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते हळू हळू क्षीण होत गेले, जबाबदारी नीट पार पाडत नव्हते कारण त्या शक्तींना सेवेला ठेवणारे मानवच होते पण आता तेमानव आता हयात नव्हते. तिथे कोणी येऊ नये म्हणून त्यांनी फक्त गुलाबी फळ खाऊ घालायचं एवढा एकच सोपा मार्ग अवलंबला होता , मात्र ते फळ खाऊ घालणारे कालानुरूप शक्ती कमी झाल्यामुळे कोणाला इजा पोचवून किंवा जबरदस्तीने खाऊ घालू शकत नव्हते, फक्त आग्रह करू शकत होते आणि त्यामुळेच केतनच्या मामाच्या टीम सह जयेश आणि चंदू सुखरूप तिथं पर्यंत पोचले होते.
केतन च्या मामाला इथली सर्व माहीती असावी म्हणून तो आत मध्ये येऊन त्याने काहीतरी पळवाट शोधून तिथे फार्म हाऊस बांधलं असावं नाहीतर तिथे फार्म हाऊस बांधणं शक्य नव्हतं.
रात्रीच्या अंधारात मोठमोठ्या टॉर्च घेऊन रस्त्यामधील फूटभर उंचीचे गवत तुडवत केतन त्याचा मामा मामी हे लोक बाकीच्या लोकांना तिकडे घेऊन चालले होते. टॉर्च च्या प्रकाशात गवंतावरील किडे उडतांना दिसत होते . त्यांच्यापासून अंतर ठेवून जयेश आणि चंदू अंधारात चाचपडत येत होते, त्या भग्न राजवाड्याचे अवशेष आता त्यांना अंधारात पुढे गेलेल्या टॉर्च च्या प्रकाशात दिसत होते. मोठमोठ्या शिळा तिथे वापरल्या होत्या महाल मोठ्या जागेत पसरलेला असता तरी त्याला बऱ्याच ठिकाणी छत नव्हतं ते कधीच कोसळलं होत पण भिंतींमुळे ते ते विभाग अजून शाबूत होते . दगडी भिंतींवर गवत उगवलं तसच खाली देखील गवत उगवलं होतं. आता हे सगळे मिळून चौदा जण आणि त्यांच्या मागून सुरक्षित अंतर ठेवून लपत छपत जयेश आणि चंदू त्यांच्या नियोजित जागे कडे निघाले होते.

वाटेत आजूबाजूला त्या महालाचे वेगवेगळे भाग लागत होते. आधी गोठे आणि तबेले असावेत अशी जागा होती, कुठे बैठकीचा हॉल तर एक बाजूला आलिशान खोल्या पुढे एक खूप सुरक्षित आणि छोट्या छोट्या चित्रविचित्र आकृत्यांचं शिलालेख असणारं दालन आणि बाजूलाच भिंतीत कोरलेल्या सैनिकांच्या सारख्या मुर्त्या. त्याच्याच आधी उजवीकडे वळून आणखी त्या महालातील दोन मोठे चौक ओलांडल्यावर उजव्या बाजूला दोन्ही बाजूने सलग तीस फूट उंच दगडी भिंत होती आणि त्या दोन्ही भिंतींच्या मधून सरळ जावं लागत होतं , त्या भिंतीवर देखील असेच सैनिक कोरले होते व छोट्या छोट्या चित्रविचित्र आकृत्या काढलेल्या होत्या तो बहुतेक काहीतरी शिलालेख असावा. त्यात ५० मीटर सरळ गेल्यावर डाव्या बाजूला एक मोठा हॉल होता त्यात खाली पूर्ण दगडी फरशी होती हीच त्यांची नियोजित जागा होती. तिथे सर्वजण पोचले,जयेश अन चंदू लांबच उभे राहिले. तिथे हॉल मध्ये वेगळाच देखावा होता. त्या हॉल म्हणा किंवा दालन म्हणा त्यात मध्यभागी एका मशालीच्या उजेडात एक कोणीतरी जटाधारी माणूस भगव्या कपड्यांमध्ये तिथे बसून काहितरी ध्यान लावून बसला होता त्याने समोरच्या बाजूला जमिनीवर सहा चौकोन रेखाटले होते. त्यांच्या पुढे एक मोठा गोलाकार हौद होता. त्याच्या कडेला देखील विझलेल्या मशाली लावलेल्या होत्या.
हे सर्व लोक तिथे पोचताच त्या साधूने त्यांना बसायची खूण केली आणि केतनच्या मामाकडे बघून आनंदाने हसत बोलू लागला.
"खूप छान आणि परफेक्ट काम केलत ह्या वेळी तुम्ही, मी खूप खुश आहे आणि आज तो देखील ही आजची भेट पाहून खुश होईल आणि आपल काम आजच पूर्ण होईन जाईल "
लांबून भिंतीआड असलेल्या जयेश आणि चंदू च्या कानावर हे शब्द पडले साधूच्या तोंडी 'परफ़ेकट' हा इंग्रजी शब्द एकूण तो आधुनिक साधू असावा असं वाटलं.
यावर केतनचा मामा बोलला, "ते जरी सगळं खरं असलं तरी आपल्याला इथे परत परत यायचं नाहीये , त्यामुळे एकदाच सगळं आवरून घेऊ इथून आणि ह्या वाईट जंगलात परत नकोच यायला चार वेळा आपण त्याला असं थोडं थोडं देऊ शकणार नाही म्हणून आज हा शेवटचा खेळ "
"हो तुझं अगदी बरोबर आहे " एवढं बोलून तो साधू पुन्हा त्याच्या कामाला लागला.
साधूने पुढील सूचना केली "तुमची टॉर्च बंद करा आणि मशालींचा उजेड करा. हा कृत्रिम उजेड बघून तो येणार नाही आला तरी तो आपल्याला घुसखोर समजेल त्यामुळे टॉर्च , ई. बंद करून मशाली पेटवा"
साधूचा आदेश येताच केतन, मोन्या आणि अक्षय मशाली पेटवायच्या कामाला लागले.

कोण होता हा साधू ? हा इथे अचानक कसा काय आला? केतनच्या मनाशी याची गाठ कधी पडली ? आणि हे कोणाला जागृत करण्याविषयी बोलत होते? केतनच्या मामाचं एवढं मोठं फार्म हाऊस होतं पण तो ते सोडून जायला उतावीळ होता असं काय घडणार होतं इथे? पण त्या आधीस्क्रिप्ट मध्ये हा साधू कसा घुसला या सगळ्यात ? असा प्रश्न पडणं स्वाभाविक होतं.  मागे लपून छपून आलेल्या जयेश आणि चंदू ला देखील हा प्रश्न पडला होता.
तर गंमत अशी होती की तो साधू इथे आला नव्हता तर त्याने इथे सगळ्यांना आणलं होतं त्याच्या आणि चंदूचा मामा म्हणजेच वसंत दोघांच्या फायद्यासाठी, मुख्य कर्ता करविता शोधक तोच होता. तर कोण होता हा साधू ???


एका नेहमीच्या आयुष्याला कंटाळून एका ज्ञानी संन्याशी महंतांच्या सहवासात गेलेला हा एक साधारण मनुष्य होता, पण कालांतराने  त्यानं त्या महंतांकडून कडून भरपूर काही शिकलं वेगवेगळ्या भाषा, कला, विद्या ई .शिकून हा देखील हुशार झाला होता. पुढे संन्याशी महंतांचं निधन झाल्यावर हा सर्वत्र भटकंती करत फिरू लागला, पण त्याची विद्या, प्राचीन भाषा चे ज्ञान याचा त्याला उपयोग करून घेता येत नव्हता. स्वतःचे पोट भरण्याचे वांधे तिथं शिष्य कुठून जमविणार?

दहा वर्षा पूर्वीची गोष्ट, तो साधू फिरत फिरत इकडं आला आणि य जंगलाच्या कडेला साधना करत असतांना त्याला जवळपास काही शक्तींचा वावर जाणवला. हे जंगल मानवी हस्तक्षेपापासून अलिप्त असल्याने तो इथे खुश जरी होता पण त्या शक्तीचा शोध घेण्यासाठी त्याने त्यांच्या सीमेत प्रवेश केला. आणि त्याला कळायला लागलं कि त्या शक्ती कशाचं तरी रक्षण करत आहेत या जंगलात रक्षण करण्यासारखं काही नव्हतं असेल तर एखादं गुप्तधनाचं कोठार किंवा धन असलेली गुहा असेल असं त्याला वाटलं म्हणून तो हे वैराग्याच जिणं सोडून तो धनसाठा मिळवून आयुष्य सुखी करावं या विचाराने पछाडला .

खरं तर तो साधू त्या धनाच्या साठ्याच्या मोहात पडला होता, त्याला जागा देखील कळली होती . पण त्याला तिथवर पोचता येत नव्हतं. त्याला कंदमुळे खाऊन जगायची सवय असल्यामुळे तो चविष्ट गुलाबी फळ खाऊन वारंवार धुंद व्हायचा आणि उद्देश विसरायचा. नंतर तो हळू हळू समजू लागला कि हे गुलाबी फळ खाण्यासाठी नाहीये पण यातच त्याचे दोन दिवस गेले होते.
मग तो फळ खाण टाळू लागला आणि इतर वस्तूंवर भूक भागवू लागला.पण त्यानंतरही त्याला वेगवेगळ्या रूपात ते फळ खाण्यासाठी खूप आग्रह केला गेला एक आदिवासी ललने पासून ते एका ज्ञानी संन्याशाच्या रूपापर्यंत सगळी रूपे तिथं आली पण त्याने देखील ते फळ खाणं टाळलं, तो ढळला नाही. आणि एके दिवशी संध्याकाळी तो शोध घेत घेत त्या महाल पर्यंत आलाच जंगल, प्राणी पशु यांची त्याला भीती नव्हतीच पण आता त्याला धनाची लालसा होती पण साधू देखील हुशार होता. रात्री तिथे दगा फटका होऊ शकतो म्हणून त्याने अभ्यास करण्यासाठी दिवसाची वेळ निवडली त्यावेळी तो तिथून लांब जाऊन त्याने रात्र काढली .

सकाळ होताच तो त्याचं सर्वकाही यावरून त्या महालाजवळ पोचला मनातून आनंदाच्या लाख उकळ्या फुटत होत्या धन मिळणार म्हणून, श्रीमंत होणार म्हणून, या भटकंतीच्या आयुष्याचा, उपासमारीचा फाटक्या कपड्यांचा, लोकांच्या विचित्र नजरांचा आलेला कंटाळा. हळू हळू तो भग्न महालाच्या अवशेषांमधून जाऊ लागला. त्यांने आजवर केलेलं वाचन आणि अभ्यास त्याला कामी येत होत तो भग्न अवशेषांमधून वाट काढत जात असतांना त्याला तेथील चिन्हांमधील भाषेमुळे कळत होत कि येथे काय असावं. प्राचीन भाषेचा अभ्यास त्याने केला होता जो इथे उपयोगी आला त्याला खूप हायसं वाटलं.
पण एवढा मोठा महाल इथे धनसाठा देखील मोठाच असणार मग त्याच्या रखवालीसाठी काही तरी तरतूद नक्कीच केलेली असणार. साधू असला तरी हुशार होता. पुढे पुढे जात असतांना मध्येच त्याला तेथील मुख्य राणीच दालन लागलं त्यावर लिहिलेला संदेश तो सहज म्हणून वाचू लागला. त्या भाषेत तो पटाईत नसला तरी लिखाण, वाचन आणि संभाषण करू शकत होता. त्याने तो मुख्य राणीच्या द्वारावरील शिलालेख वाचायला सुरुवात केली ... वाचून झाल्यावर त्याला घाम फुटला कारण त्याचा अर्थ असा निघत होता... "जो कोणी या द्वाराच्या आतून विना परवानगी तसेच चोरीच्या उद्देशाने किंवा राणीस भेटावयास जाणारा पुरुष असेल तर या द्वारावर असणाऱ्या चित्रामधील जे भूतयोनीतील सैनिक दिसत आहेत ते त्या माणसाला फाडून खाऊन टाकतील.  हा लेख त्याला धडकी भरवणारा वाटत होता कारण इथे अशा प्रकारचे संरक्षक कवच असतील तर खजिना मिळविणे अवघड होतं. त्याने त्या द्वाराच्या दोन्ही बाजूला नीट पाहिलं तर तिथे आठ सैनिक कोरले होते एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार.
त्यामुळे त्याची राणीच्या भग्न झालेल्या दालनात जाण्याची हिम्मत झाली नाही पण तशी ती गरज देखील नव्हती कारण तो धनासाठी आलेला होता. राणीला कोणी भेटू नये म्हणजे राणीला किंवा मधील स्त्रियांना परपुरुषांपासून दूर ठेवण्यासाठीच हि क्रूर योजना केली असावी हे त्याला एव्हाना कळलं होतं.पण आज ना तिथे राणी होती ना आणखी कोणी स्त्रिया बाहेरून त्या दालनामध्ये दिसत होतं ते फक्त माजलेलं गवत एक थोडा आतमध्ये असलेला छोटा तलाव इतर खोल्या ई . म्हणजे हे मूत रक्षक लावण्याचं काम ज्याने कोणी केलं तो चांगलाच क्रूरकर्मा आणि अमानवी विद्या जाणणारा आणि वापरणारा असावा. कारण मनुष्य मेला तरी आत्मा अमर राहतो त्यामुळे त्या मृतांच्या आत्म्याच्या बळावर विशिष्ट विधी करून त्याने ते रक्षक त्याने जिवंत ठेवले होते.
हळू हळू पुढे जेव्हा तो त्याच्या अंदाजानुसार खूप आतमध्ये असलेली धन असलेल्या दालनाजवळ जवळ पोचला, तिथे देखील दगडी भिंतीत तसेच खूप सारे सैनिक कोरले होते. आणि बाजूला मुख्य द्वाराच्या बाजूला त्याच त्या प्राचीन चिन्हांच्या भाषेत शिलालेख होता. त्याने तो वाचला  त्यात लिहिलं होतं कि या दालनातील सर्व खजिना हा महाराज दण्डपाणि यांच्या मालकीचा आहे. त्यांच्या मालकीच्या खजिन्यास चोरीच्या उद्देशाने कोणी हात लावल्यास येथील रक्षक पिशाच ची टोळी आणि त्यांचा अधिकारी पिशाच त्या स्त्री पुरुष किन्नर किंवा अजून कोणी असेल त्याला रक्त शोषून मारून टाकतील.
इशारा सरळ होता साधूला जागृत शक्तींचा वास जाणवत होता त्यामुळे तिंथं काही करणं म्हनजे ताबडतोब यमसदनी जाणं असच होतं . तो हिमतीने खजिन्याच्या दालनात घुसला. खजिना दिसला तरी हात लावायचा नाही हे ठरलं होतं, डोळे बंद करून त्याने विचार केला त्याला धनाची जागा कळली ते मध्यभागी असलेल्या गोलाकार हौदाच्या मध्ये होतं.तिथला कडक पहारा त्याला जाणवत होता त्यामुळे हे आडाखे बांधून तो तात्काळ मागे फिरला. या वेळी मात्र त्याला कोणी त्रास देऊ शकत नव्हतं कारण तो चोरी करत नव्हता.
बाहेर येऊन खूप विचार केला कि तिथे लिहिलेला नियम पाळून सुद्धा हे धन कसं मिळविता येईल. खूप विचार करून तो एका निष्कर्ष पर्यंत आला होता. 

पळवाट अशी होती, महाराज दंडपाणि यांच्या मालकीचं धन कुठपर्यंत होतं जोपर्यंत ते जिवंत होते पण तरीही समजा हात लावल्यावर रक्षक पिशाच मागे लागले तर ? आणि त्याने आनंदाने एक चुटकी वाजविली त्याला यातून देखील मार्ग मिळाला होता.
त्याने मनामध्ये ती योजना आखली आणि तिथे भग्न राजमहालात रात्री जायचं ठरवून मस्त दिवसभर झोप काढली.

अंधार पडू लागला तसा संन्याशी आनंदाने त्या राजवाड्यांच्या अवशेषांकडे निघाला पूर्ण फलाहार घेऊन तो निघाला होता, मनात धाकधूक होतीच कारण कितीही केलं तरी ते अमानवी होते त्यांच्या संपर्कात जाणं म्हणजे अवघड काम होतं . रात्रीच्या दुसऱ्या प्रहरास तो खजिन्याच्या दालनाकडे निघाला. राणीचं दालन,सैनिकांचे पुतळे , मधला चौक , तो रस्ता सगळं ओलांडून पुढे आल्यावर त्या खजिन्याच्या दालनाच्या दाराशी उभा राहून हा साधू मोठ्यानं ओरडला,
"भिक्षांदेही "
"भिक्षांदेही "
"भिक्षांदेही "
साधूने त्याचा डाव टाकला होता.
हा मार्ग असा होता कि ज्या वेळेला ते पिशाच जागृत असतील म्हणजे रात्रीच्या वेळेला तिथे जायचं आणि संन्याशी म्हणून भिक्षा मागायची , त्या पिशाचांकडे देण्यासारखं काही नाही फक्त ते धन आहे ज्याची ते रक्षा करत आहेत त्यांना तेच द्यावं लागेलं कारण दारावरील याचकाला माघारी पाठवणं हे आधीच्या काळात पाप समजलं जाई आणि ते पिशाच ते धन देतील कारण दंडपाणि च्या मृत्यूनंतर आज त्यावर अप्रत्यक्षपणे त्यांचीच मालकी बसली होती.
साधूचा आवाज त्या दालनात घुमत होता. पाच मिनिटांपर्यंत काहीच हालचाल नव्हती, कदाचित तेवढा वेळ समोरच्याने विचार करायला घेतला असावा. भग्न झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे शेकडो वर्षांत तिथे कोणी भिक्षुक गेला नव्हता. म्हणून काय निर्णय घ्यावा यासाठी तो विचार करत असावा.
पुढच्या दोन मिनिटात तिथे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला, असम्बद्ध विचित्र आवाज येऊ लागले आणि अचानक सगळं शांत होऊन साधूच्या पुढे पिवळी धम्म चकचकती अंधारात चमचम करणारी अशी शुद्ध सोन्याची दोन नाणी येऊन पडली. एकेकीचं वजन दहा ग्राम पेक्षा जास्त होतं. त्यावर दंडपाणि ची मुद्रा होती. साधू चा डाव असफल झाला होता. रक्षक पिशाचांनी त्याला त्याची लायकी दाखवली होती. भीक मागायला आलास म्हणून पूर्ण खजिना ते त्याला देणार नव्हते. ती दोन नाणी घेऊन साधू हात जोडत बाहेर आला.
सुखरूप पणे धन मिळू शकत होतं पण अशीच दोन दोन नाणी मिळवून काय करणार ? पण ठीक आह खेळ कुठपर्यंत चालतो बघूया या विचाराने साधू ने दुसरी दिवशी हि कालचाच दिनक्रम पाळला,  दुसऱ्या रात्री पुन्हा तो तिथे गेला आणि ओरडला , "भिक्षांदेही "
यावेळेस मात्र आवाज जोरजोरात चिडल्यासारखे ओरडत होते पण परत सगळं शांत झालं आणि साधूला तशीच दोन नाणी मिळाली.
आता त्याच्याकडे चार नाणी झाली होती. आता साधू धनाचा पाठलाग करत होता पण त्याला कळत नव्हतं लालसा त्याच्या पाठलाग करत होती.  तिसऱ्या दिवशी साधूने तोच कित्ता गिरविला,  तिसऱ्या रात्री त्याच भयाण वातावरणात तो गेला. अंधारात दगडी शिळा गारेगार झालेल्या होत्या. साधू ने आज काय होईल हा विचार करत भीत भीत पण कडक आवाज दिला, "भिक्षांदेही" "भिक्षांदेही" "भिक्षांदेही" 
त्यासरशी जणू काही त्याची वाटच बघून असल्यासारखा एक धुराचा मोठा लोट त्याच्या डोक्यावरून भपकन जाऊ लागला, वातावरण हिमालयासारखे गार झाले, साधूची दातखीळ वाजू लागली,  आणि त्या दालनात त्याच्या समोर सुमारे चाळीस फुटांवर एक बारा ते पंधरा फूट उंच काळी आकृती उभी राहिली. त्याचे फक्त हात पाय आणि हातातील कसलं तरी धारदार हत्यार तेवढं अंधारात कळत होतं. तो साधूकडे बघत होता हे मात्र निश्चित. ती आकृती मोठ्या कडक आवाज करुन साधू कडे हात करून बोलू लागली ,
"संन्याशी आहेस ना तू ? तुला धनाचा मोह झाला का ? लाज वाटली पाहिजे तुला "

हे एकूण साधूंच्या अंगावर सर्र्कन काटा उभा राहिला. आज आपण मरतो दोन सोन्याच्या नाण्या साठी आज मारतो असं त्याला वाटलं. तो गोठून उभा राहिला. पण हिम्मत करून बोलला, 
"मला लाज कसली वाटली पाहिजे ? मी तुला धन मागितलं का ? मी फक्त भिक्षांदेही म्हटलं ते धन तूच दिलंस" साधूने साळसूदपणाचा आव आणला.
यावर मोठ्याने क्रूर हसत तो आकृतीमधला उंच पुरुष बोलू लागला,
"अरे संन्याश्या मला वेड्यात काढतोय का ? निलाजऱ्या तू लोभी आहेस संन्याशी म्हणवण्याच्या लायकीचा तू नाहीयेस पण तू ज्या अपेक्षेने आलास तेच मी तुला दिलं आणि वरून तू कृतघनपणा करतोयस का ? आणि लक्षात ठेव इथे बोललेलं तुझं एकूण एक वाक्य नोंदविलं जाईल त्यामुळे जबाबांपासून फिरू नकोस आणि सत्यवचन बोल अन्यथा तूला आम्ही असं मारू कि तू पुढची शेकडो वर्ष वेदनामध्ये विव्हळत विव्हळत मरशील"
यावर साधू वरमला त्याने विषयांतर केलं ,"तुला माझी भाषा कशी कळते ?"
"मूर्खां कसला साधू झालास रे तू ? तुला आता फाडून खावं वाटतं पण तू याचक आहेस म्हणून सोडतोय, तुला इतकी अक्कल शिकविली नाही का ? तुझ्या गुरु ने ? कि तुम्ही कोणत्याही भाषेत बोला उच्चार करा ते आम्हाला आमच्या भाषेतच ऐकू येतात आणि तुला माझी भाषा कळण्याचं कारण सुद्धा तेच आहे तुला ती माझ्यामुळे ऐकू येतेय आणि कळतेय तुझी शक्ती इतकीपण प्रभावी नाहीये"
यावर साधूला स्वतःच्या अज्ञानावर खूप लाज वाटली.

ते पिशाच पुरुष पुढे बोलू लागलं , "मी तुला कधी दिसलो नसतो पण तू एक लोभी मनुष्य आहेस आणि मला किंवा आम्हाला असले लोभी बदमाश लोक हवे असतात ते कशासाठी ते नंतर सांगेल पण आधी एक तू लोभी आहेस आणि तुला हे सगळं धन हवं आहे हे मान्य कर तरच पुढचं सगळं सांगतो जेणेकरून इथे असलेला सगळं धनाचा साठा तुझाच होईल "
"का तुला धन नकोय ?" काहीतर सुचलं म्हणून साधू ने प्रश्न विचारला .
"अडाण्यासारखं बोलू नको, आम्हाला पिशाच्चाना कशाला रे हवं हे सोन नाणं ? आम्ही काय व्यापार धंदा करतो का ? उलट हे धन इथून गेलं तर आम्ही ह्या सेवेतून मुक्त होऊ . कारण धनच नसेल तर रखवालीचा प्रश्न येतोच कुठे ? म्हनजे आम्ही इथून मोकळे होऊ असाच नियम आहे "
साधू ऐकत होता आणि तो पिशाच प्रमुख पुढे बोलू लागला,
"तू जसा नियमाला अपवाद जाणून भीक मागायला आलास तसाच हा आमच्यासाठी नियमातील अपवाद आहे माझ्या सोबत माझ्यासारखे ११ पिशाच आहेत आणि  के भिंतींवर कोरलेले सैनिक देखील आहे पण आम्हाला आता इथून शेकडो वर्षांच्या सेवेतून सुटायचंय कारण आता महाराज नाहीत तर हे जपायचं कोणासाठी पण हे धन इथे असे पर्यंत आम्हाला नियमानुसार
सोडून जाता येत नाही, नियमाने महाराजांनन्तर या धनाचे अप्रत्यक्ष मालक आम्ही आहोत आम्ही ते तुला सहज देऊ पण त्यासाठी तुला आम्ही सांगू ते करावं लागेल "
साधू विचारात पडला कि हा पिशाच मला काय सांगणार आहे , तो त्यांच्या मुक्तीसाठी एखादा विधी करायला सांगेल तर ते देखील करू कोंबड बकरं मागेल ते देखील देऊ,

विचारपूर्वक साधु बोलला , "काय हवंय तुला माझ्या कडून ?"

यावर ते पिशाच गडगडाटी भेदक हसला, "हा हा हा आता कसं आधी मान्य कर तू लोभी आहेस आणि तुलाच हे सगळं धन हवंय "
साधू आवेगात बोलून गेला ,"हो मला माझा लोभीपणा मान्य आहे आणि हे सगळं धन मलाच हवं आहे "
"शाब्बास खूप छान आता तू या विचारापासून मागे फिरू शकत नाहीस हे लक्षात ठेव आणि पुढचं ऐक "
तो पिशाच आता झर्र्कन त्या उंच भिंतीवर जाऊन बसला. तिथून त्याचे खाली लोम्बणारे पाय भयानक वाटत होते. त्याची पायाची बोटे अन नखे खूपच तीक्ष्ण आणि लांब होती, तिथून तो मग्रूर आवाजात बोलला,

"तुला मी सांगितलं तस आम्ही इथे खजिन्यासाठी मी धरून १२ रक्षक आहोत आणि इथे एकूण १२ मोठे मोठे रांजण भरून धन आहे तुला ते सगळं मिळेल पण त्यासाठी तुला आम्हाला १२ जिवंत मनुष्य, त्यात सहा पुरुष आणि सहा स्त्री असावेत ते देखील अविवाहित पाहिजेत आणि जिवंतच आणून द्यावे लागतील. ते का आणि कशासाठी हे विचारायचा तुला काहीच अधिकार नाहीये आता पटकन निघ आणि लवकरात लवकर ते १२ जण जमव "
लोभी साधू विचारात पडला जिवंत ६ - ६ स्त्री आणि पुरुषांचे हे काय करणार ? कदाचित यांच्या मुक्तीचा मार्गच तो असावा पण ... तो पुढे बोलू लागला , विचारपूर्वक अन आणि व्यवहार्य भाषा बोलू लागला, 
"पण ... मी एकटा आहे इतके सगळे जण मी एकावेळी कसे आणणार काहीतरी सवलत द्यावी .. "

साधूला हिणवत तो बोलू लागला, "लोभी सन्याशा खरं तर तुला संन्याशी नाहीच म्हटलं पाहिजे,  एक तर १२ जण तू एकदम नाही आणले तरी चालेल एक एक करून आण किंवा जसं जमेल तसं आण ज्या दिवशी तुझे १२ जण सहा स्त्रिया आणि सहा पुरुष मिळून पूर्ण होतील त्यादिवशी हा सर्व खजिना तुझा. आम्ही स्वतः तुला ते रांजण वर काढून दालनाबाहेर आणून देणार म्हणजे तुला काही होणार नाही , पण एक अट आहे "
"कसली अट ?"
त्या बारा लोकांपैकी ज्या दिवशी आम्हाला तू जेवढे देशील तेव्हा तू आम्हाला देण्यासाठी एक विधी करशील त्या धनाच्या हौदाजवळ जेवढे लोक देणार तेवढे चौकोन आखशील आणि त्यात त्यांना बसवून बाहेर जाऊन ह्या हौदाच्या बाजूच्या भिंतीवरील मूर्तीची पूजा करून, आणलेली माणसांची संख्या मोठ्याने बोलायची आणि नंतर बाजूच्या शिलालेखामधील तिसरी ओळ मोठ्याने तीन वेळा वाचायची . मग आम्हाला कळेल कि तू आला आहेस . आणि मग आम्हाला जे हवं ते आम्ही करू तुला काही इजा होणार नाही विश्वास ठेव .

"मला किती दिवसात हे बारा लोक जमवावे लागतील ?" साधूने प्रश्न केला.
"अरे आम्ही इथे कित्येक शतकांपासून अडकून पडलोय तू बारा लोकांसाठी जास्तीत जास्त बारा वर्ष घे चल आणि निघ इथून " एवढं बोलून तो पिशाच त्या दिवशीची दोन नाणी त्याच्या पुढे फेकून निघून गेला .
साधू आता विचारात पडला सहा नाणी मिळाली होती ती घेऊन गुपचूप बसावं कि १२ जण जमवून आणावेत ? पण सहा नाण्यांनी काय होणार त्यामुळे तो पुढच्या कामास लागला.
पुढचे चार दिवस तो साधू प्रचंड मानसिक दबावात वावरत होता. बारा रांजण धन त्याच्या गरजेपेक्षा खूप जास्त होतं त्याला अर्धा रांजण सुद्धा खूप झाला असता. पण आता एवढ्या धनासाठी आपण एकट्याला हे सगळं करणं अशक्य आहे म्हणून तो भागीदार शोधण्याचा विचार करू लागला. आता त्याला यासाठी पैशांची गरज देखील होती. त्यासाठी पैसे लागतील म्हणून तो ती नाणी घेऊन तो शहरात आला. त्याची पावले आपोआप सराफी दुकानांकडे गेली,  ती नाणी कोणत्या सराफाकडे विकल्या जातील याचा विचार करत करत. आडमार्गावरील एक मोठ्याश्या सुवर्णपेढीत तो शिरला.

तो सरळ मालकाच्या केबिनकडे गेला कारण त्याला माहित होतं हे गुप्त धन आहे हे असच मोडता नाही येणार पोलिसांचा ससेमिरा मागे लागू शकतो. मालक अनुभवी होता , मालकाला वाटलं साधू काही मागायला आला असावा किंवा काही सोनं मोडायला आला असेल त्यामुळे त्याने त्याला प्रवेश सहज दिला.
"नमस्कार " साधू बोलला.
"नमस्कार महाराज बोला काय सेवा करू ?" पंचेचाळिशीतील शेठ बोलला. 
आणि साधूने त्याला त्याच्याकडची सहा नाणी दाखविली आणि बोलला, "हि मला मोडायची होती "

ती नाणी पाहून त्या मालकाच्या चेहऱ्यावर खूप आनंदमिश्रित वेगळे भाव आले आणि , 
ख्या ख्या ख्या करत तो ती नाणी पाहून हसू लागला,

साधू चकित होत पहात राहिला कि हा वेडा झाला कि काय ? 

पण पुढच्याच मिनिटाला टेबलवरून उठून त्याने एक चोरकप्पा उघडला आणि त्यातून एक नाणं बाहेर काढलं आणि साधूच्या पुढ्यात ठेवलं.
ते नाणं अगदी साधूच्या सहा नाण्यांसारखंच होत.
तो सुवर्णपेढी चा मालक पुढे बोलू लागला, "महाराज हे मला माहितीये हे गुप्तधन आहे पण मला याचा ठावठिकाणा माहित नाहीये मी खूप दिवसापासून याचा अभ्यास करतोय पण मला न हि भाषा कळते न हि मुद्रा "
यावर साधू चिडीचूप बसला. तो मालक पुढे बोलू लागला.
"महाराज तुम्ही जर मदत करणार असाल तर तुमच्याकडे असणार सगळं सोनं मी काळ्याबाजारात विकून देईल ते कितीही असू द्या पण बिनधास्त सांगा मला घाबरू नका आपण सगळं सोन विकू कधीही आणा कितीही आणा असं दोन चार नाणी आणून खेळू नका"
आता मात्र साधूला धीर आला होता. "हे बघ मी तुला सगळं सांगेल तुला अर्ध धन सुद्धा देईल पण .. "
"पण काय ?" शेठ हा एकूण खूपच खुश झाला होता. 
"ते धन आपल्याला काढावं लागेल आणि त्यासाठी थोडं अवघड काम आहे "

या प्रकारांना तो शेठ मुरलेला असावा किंव अनुभवी असावा  तो सहज बोलू लागला , 
"अहो महाराज बिनधास्त सांगा काय करायचं ते जोडा पाहिजे ?सिंगल पाहिजे ? नरबळी पाहिजे सगळं करू आपण. पण माल खरोखर असला पाहिजे रिकामं खोदकाम नको"
यावर साधूची कळी खुलली त्याला हवं तेच समोरचा बोलत होता तो याच कामांसाठी माहीर असावा. साधूचा निशाणा बरोबर अन अचूक लागला होता.
मग पुढे मात्र साधूने सगळी हकीकत, अविवाहित सहा पुरुष सहा स्त्रिया पासून ते नाणी कशी मिळवली इथपर्यंत त्याला सांगून टाकली. साधूची हिम्मत पाहून तो शेठदेखील चकित झाला. पिशाचांकडून साधूने नाणी आणली यावर त्याचा विश्वास बसत नव्हता पण साधू त्याला तिथे न्यायला तयार होता म्हणून त्याला खरं वाटल,  साधू आणि तो दोघे जवळपास पंचेचाळिशीतले समवयस्क होते . पण साधूच्या कारनाम्यामुळे शेठला देखील आत्मविश्वास आला होता. कि हा साधू खूप विलक्षण आहे आणि हे काम तो करू शकतो.
इथेच त्या दोघांची एकमेकांना सहकार्य करण्याची तयारी झाली आणि ते पुढच्या कामास लागलेत. हा  शेठ म्हणजे कोण ? त दुसरा तिसरा कोणी नसून केतनचा मामा होता.  

क्रमश :

Comments