पाठलाग (मराठी भयकथा) भाग ५

 

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ५

जयेश आणि चंदू ला वाटलं कि आपण केतन ला आणि त्याच्या मित्रांना आपल्याच गावात पकडलं पण ती मुलं वेगळीच निघाली.
काय होतंय ? काय घडतंय ? जे दिसतं ते खरं कि जे आपण अनुभवलं ते खरं ? या विचारात जयेश आणि चंदू दोघेही हरवले होते. ते दिगुनानाच्या आवाजाने भानावर आले.
"आरं पोरांनो जेवून घ्या तुम्हीपण आज हिथच ह्ये पोरं आज शेतात न्हाय जाणार ते रातच्यालाच शहराला चाललेत मग मित्र-मित्र तुमि सोबतच जेवा आता "
"नाही नको नाना आई ने स्वयंपाक बनवून ठेवला असेल ती पण वाट बघत असेल" जयेश बोलला .
"आर असू दे कि मग काय झालं " दिगुनाना.
"बरं थांबा मी आईला फोन करून सांगतो"
जयेश ने मोबाइलला वरून दोन गल्ल्या पलीकडे असलेल्या स्वतःच्या घरी आई ला फोन लावला.
तो पर्यंत चंदू त्या मुलांशी गप्पा मारायला लागला होता कारण त्याला जयेशच्या डोक्यात काय चाललं आहे ते कळलं होतं नाहीतर जयेश उगाच इतक्या लवकर जेवायला तयार नसता झाला. एकमेकांना इतके चांगले ओळखत होते म्हणून तर ते इतके चांगले मित्र झाले होते.
चंदू त्या मुलांची माहिती काढू लागला. तोपर्यंत जयेशचा फोनदेखील आवरला त्याने आईला फोनवर काहीतरी सांगितलं.
मग त्यांनी त्या मुलांशी ओळख करून घेतली व मित्रांसारख्या गप्पा मारायला लागले. नवीनच ओळख झाल्यामुळे आधीचे तिघे आणि जयेश व चंदू त्यांच्यात गप्पा मध्ये रंगले होते. त्यांच्या गप्पामधून त्यांनी देखील सांगितलं कि ते आत्ता जेवण झाल्यावर तासाभरात शहराकडे जाणार आहेत. त्यांच्या गप्पांमधून इतकं कळलं होतं कि हे तिघे नवीन मुलं आधीच्या मुलांसारखे नव्हते. हे मुलं चांगले वाटत होते. त्यामुळे यांच्यासोबत शहरात परत गेलं तर आणखी जास्त माहिती मिळविता येईल या विचारात जयेश होता आणि तो बोललाच,
"अरे पण आता रात्रीच कशाला जातंय उद्या जाऊया कि आम्हाला देखील परत जायचंच आहे " जयेश बोलला.
त्यावर केतन बोलू लागला, " नको रे सकाळी, आता निघालो तर तीन ते चार तासात पोचू मग म्हणजे सकाळी आम्ही आमच्या ऑफिस ला जाऊ शकतो शिवाय ह्या विनीत च कॉलेज देखील आहे" त्याने बाजूच्या एका मुलाकडे हात केला.
"तुम्ही हि चला ना आमच्या सोबत आत्ताच हवं तर ... " तिसरा मुलगा राहुल बोलला.
हे एकताच जयेश आणि चंदू बावरले पण स्वतः वर ताबा ठेवत चंदू बोलला , "नाही नको आम्ही उद्या निवांत येऊ "
"ठीक आहे तुमची मर्जी पण आपण मस्त गेलो असतो धमाल केली असती आपण सोबत म्हणून बोललो मी " तिसरा मुलगा राहुल परत बोलला.
"अरे रात्रीची कसली धमाल करणार प्रवासात त्यापेक्षा दिवसा गेलो असतो ", जयेश बोलला . त्याला त्यांच्यासोबत दिवस जाणं असुरक्षित वाटत होतं.
"अरे धमालच करायची तर आमच्या यासोबत येणार का तुम्ही का परवा ? आम्ही आणखी एक दोन दिवसाच्या सहलीवर जाणार आहोत" केतन बोलला.
"अरे हो यांना पण घेऊयात मोठा ग्रुप तेवढी मज्जा येईल " राहुल बोलला.
"चालेल कि आम्हाला पण " चंदू ओरडला.
आणि यावर सगळ्यांची सहमती झाली कि उद्या हे तिघे मूळ त्यांचा जॉब आणि कॉलेज अटेंड करतील आणि तोपर्यंत हे जयेश आणि चंदू शहरात येतील मग परवा सकाळी परत ट्रिप ला निघतील. जयेश आणि चंदू ने अशी चार दिवसांची सुट्टी टाकलीच होती आणि त्यांना आकाश आणि ह्या प्रकरणाचा छडा लावायचाच होता म्हणून ते ह्या ट्रिप साठी तयार झाले होते एरवी त्यांना आकाश च असं झालेलं असत्यांना ट्रिप ला जाण्यात काही आवडण्यासारख नव्हतं.
बघता बघता सगळ्यांचं जेवण होत आलं होतं . मग तिघे जण जाण्याची तयारी करायला लागले जयेश ने न राहवून त्यांना प्रश्न विचारलाच ,
"अरे तुम्ही तिघेच आहेत मग हि एवढी बस कशी काय घेऊन आलात फिरायला ?"
त्यावर तिघेही हसले. केतन सांगू लागला,
"असं आहे हि बस आहे राहुलच्या काकांची आणि ती इकडे काल संध्याकाळी टूरिस्ट्स घेऊन येणार होती आणि एका बाजूनेच भाडे असल्यामुळे इकडून रिकामीच जाणार होती मग ड्रायव्हरला सुट्टी देऊन राहुल आम्हाला सोबत घेऊन आला तेव्हढंच इकडे फिरणं झालं आमचं .
जयेशला कालच्या गोष्टी पण विचारायच्या होत्या पण तो थांबला .
कारण आत्ताच सगळं सांगण्यात किंवा विचारण्यात अर्थ नव्हता, कारण हे मूलं देखील कालच्या त्या प्लॅन मध्ये सहभागी असले तर ? हा प्रश्न त्याच्या मनाला भेडसावत होता. कारण आकाश तर जीवानिशी गेला त्याचं मृत शरीर कुठे आहे याचा सुद्धा अजून काही थांगपत्ता लागला नव्हता ना पोलिसांनी जयेशला किंवा आकाशला परत फोन केला. अजून आकाशच्या बॉडी चा सुद्धा शोध घ्यायचा होता. खूप सारं अवघड काम वाढून ठेवलं होतं . पण कस मार्गी लावायचं हे कळत नव्हतं. आकाश कसाही असली तरी आपण त्याचा तपास लावण्या ऐवजी स्वतःचा जीव वाचवत गावाकडे पळून आलो हे सुद्धा जयेशच्या मनाला बोचत होतं .
जयेशला राहून राहून एक प्रश्न पडत होता तो म्हणजे गांधी चौक पोलीस स्टेशनला आकाशच्या खुनाची बातमी कशी कळली आणि त्यांनी पुढे चौकशी म्हणून आपल्यला बोलावलं का नाही ? त्यांनी काहीच तपास केला नाही का ? त्याला पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद वाटू लागली.
तो पर्यंत केतनच्या मामा मामीचा म्हणजेच दिगुनाना चा निरोप घेऊन तिघेही मुलं निघायला लागले होते.
जयेश मात्र विचारातच हरवलेला होता. या मुलांकडून बाकी माहिती कशी काढायची ??. तो विचारात असतानाच त्याच्या खांदयावर राहुलने हलकेच नवीनच झालेल्या मित्रत्वाची चापट मारली, "जयेश चल निघू का मग आम्ही "
"हो हो चालेल " जयेश बोलला.
तिघेजण बसमध्ये चढले आणि राहुल ड्राइवर सीटवर जाऊन बसला. इंजिन स्टार्ट करत तो जयेश आणि चंदू ला बोलला, "परवा भेटू मग सकाळी ट्रिप ला जायला
तसं मी उद्या रात्री फोन करेलच "
"हो हो नक्की भेटू 'चंदू बोलला.
"अरे राहुल पण ट्रिप कुठे जाणार आहे आपली ? ते तर सांग " जयेश ने प्रश्न केला.
"अरे हो तुम्हाला सांगायला विसरलो"
" माझा एक नवीनच झालेला मित्र आहे , त्याचंही नाव केतनच आहे, त्याच्या मामाच फार्म हाऊस आहे आसरी घाटाच्या पुढे नवली फाट्यापासून मध्ये , धरणाच्या बॅकवॉटर्स जवळ आहे. "
हे एकूणच जयेश आणि चंदू गार पडले .
चंदू आणि जयेश दिगुनानाच्या नजरेत या मुलांना सरप्राईझ देणार होते पण सरप्राईझ तर त्यांनीच यांना दिलं होतं . परत एकदा आसरी घाट, नवली फाटा , केतनच्या मामाच बॅकवॉटर्स जवळ असलेलं फार्महाउस . दोघांनाही आपलं डोकं कोणीतरी घट्ट धरून वरून हातोडा मारत आहे असच वाटलं.
गाडीचा गियर टाकत राहुल बोलू लागला, "आणि हो आपल्याला तिकडे मुक्कामी रहायचं आहे रात्रीला खूप मज्जा येईल "
"चला बाय निघतो आम्ही "
"अरे राहुल थांब " जयेश ओरडला.
"काय झालं ?"
"सोबत कोण कोण आहे आणखी आपण सोडून ?"
"अरे हो त्या केतनचे फ्रेंड्स आहेत " राहुल बोलला .
"कोणता केतन आपला केतन का ?"जयेशने प्रश्न आदळला .
दिगुणांनाच भाचा आता आपला केतन झाला होता. हे राहुल ला कळलं .
"नाही रे तो माझा नवीन झालेला मित्र आहे केतन "
चंदू हुशारीने मधेच खोट खोटं हसत बोलला , "राहुल मुली बिली नाही ना बाबा ट्रिप मध्ये ?"
यावर सगळे हसायला लागले .
"खरं सांगू का ?"
"पण तुम्ही ट्रिप कॅन्सल नका करू"
"मुली आहेत, केतनच्या ऑफिस मधील, खरं तर ते कालच जाणार होते त्यांनी बस पण नेली होती जायला पण काही कारणाने ते कॅन्सल झालं, मग ते परवा जाणार आहेत तर तो म्हटलं तू आणि तुझे मित्र घेऊन ये म्हणून आपण सगळे जाऊयात " राहुल निष्पापपणे बोलला.
"ओके ओके तर , ठीक आहे चला तुम्ही निघा आता तुम्हाला उशीर होत असेल. " जयेश ने विषय संपविला.
यावर सगळे हो हो म्हणाले.
राहुलने क्लच वरचा पाय हलकेच उचलला आणि एक्सलेरेटर दाबला तशी बस गुरगुरत पुढे सरकू लागली. हळू हळू गावाबाहेर जात बस रस्त्यावरच्या अंधारात गुडूप झाली. तसे जयेश आणि चंदू दिगुनाना ला आणि त्यांच्या बायकोला स्वादिष्ट जेवणाबद्दल धन्यवाद देऊन जयेशच्या घराकडे निघाले.
रात्रीचे साडेदहा होत आले असतील. ग्रामीण भाग असल्यामुळे गाव लवकर शांत झालेला होता. रस्त्यावर काही कुत्री ग्रामपंचायतच्या मिणमिणत्या दिव्यांखाली झोपली होती. कोणाच्या घरातून टीव्ही चा आवाज बाहेर येत होता . आणि हे दोघे विचारमग्न अवस्थेत घराकडे चालले होते.
"चंदू "
"हं "
"काय खेळ चालला आहे यार"
"हो ना यार काय होईल रे जयेश "
"आपण ट्रिप ला जाऊ न जाऊ पण मला तर आधी हा विचार पडलाय आकाश च काय ?"
पोलिसांनी काय केलं त्याच्या घरच्यांना फोन केला कि नाही हे सुद्धा माहित नाहीये" जयेश उद्विग्न होऊन बोलला.
बोलत बोलत दोघे घराजवळ पोचले, दरवाजा उघडाच होता.
आईला आपण आल्याचं सांगून जयेश आणि चंदू दोघेही गच्चीवर झोपायला जाऊ लागले तेवढ्यात आई ने आवाज दिला,
"अरे जय खाली घरातच झोपा ना पाऊस आला रात्री तर परत धावपळ होईल तुमची"
"नको ग आई , जाऊदे गच्चीवर आवडतं मला आणि हे बघ किती चांदणं पडलंय काही पाऊस येत नाही आज"
एवढं बोलून ते दोघे वरती गच्चीवर झोपायला गेले.
गच्चीवर झोपायला कसलं त्यांना गप्पा मारायला हवं होतं आणि घरच्यांना ह्या भानगडी पासून दूर ठेवायचं होत त्यामुळे दोघे गच्चीवर झोपायला आले.
खाली मोठा प्लास्टिक चा कागद टाकून मग त्यावर दोन छोट्या गादया जयेशने घातल्या व पांघरून म्हणून खालून दोन गोधड्या घेऊन आला.
दोघेही मित्र तिथे गादीवर पडले. "उद्या आकाशच्या घरी फोन करावा लागेल, काय आहे काय नाही ते तरी कळेल. त्याच्या घरच्यांना काही कळलं आहे कि नाही हे आपल्यला कळेल तरी " चंदू बोलला.
यावर जयेश बोलू लागला ,"त्याच्या घरच्यांना हमखास कळलं असेल आणि मला वाटतं त्याची बॉडी सुद्धा मिळाली असेल कारण मी गांधी चौक पोलिसात फोनवरून चौकशी केली तेव्हा र्त्यांना आकाशचा आसरी घाटात बसमध्ये खून झाल्याचं कळलं होत"
"त्यांना कोणी कळवलं ? बहुतेक रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांनी कोणी कळवलं असेल " चंदू ने प्रश्न निर्माण केला आणि स्वतःच उत्तर देखील तयार केलं .
"पण तुला कस कळलं कि पोलिसांना माहिती झालं म्हणून ?" हा प्रश्न व्यावहारिक होता म्हणून जयेश ने सांगितलं ,
"अरे तू नवली गावात गेला आणि मी बसच्या मागे नवली फाट्यावर आली आणि तिथे बस स्टॅन्ड मध्ये मला दोन पोलीस कर्मचारी दिसले मी त्यांची मदत मागितली आकाशला वाचविण्यासाठी मग त्यांनी गांधी चौक पोलीस स्टेशनला फोन केला आणि तेव्हा कळलं कि तुम्ही वर्णन करत असलेल्या व्यक्तीचा आसरी घाटात खून झाला आहे"
"ओके ओके असं झालं तर " चंदू बोलला.
"हं , पण चंदू मला एक प्रश्न आहे, साले त्या दोन पोलिसांनी मला सोडून का दिलं ? किंवा गांधी चौक पोलिसांनी पुढे काहीच तपास का नाही केला ? तपास करत ते आपल्यापर्यंत यायला पाहिजे होते किंवा त्यांनी काही तपास केला असता तर हि बस आज माझ्या गावात नसती तर पोलीस स्टेशनला जमा असती"
"तुझं हि म्हणणं बरोबर आहे जयेश , कदाचित पोलीस यांना सामील तर नाही ना ?" चंदू ने उशीवर डोके ठेवत शंका व्यक्त केली.
"काहीच सांगता येत नाहीए " जयेश बोलला.
"बर मग परवाच काय करायचं ट्रिप च ?" चंदू ने विचारल.
"जायचं ? तू पागल झालाय जयेश , राहुलच्या वर्णनावरून सगळे तेच लोक ट्रिप ला येणार आहेत आणि तू म्हणतोय ट्रिप ला जायचं ? एकदा वाचलो आपण आणि आता परत जायचं ? बरं गेलो तरी करणार काय त्यांना धरणार ? धरून काय सिद्ध करणार ? ते खूप पोहोचलेले लोक आहेत ते तुला शहरातसुद्धा वेड्यात काढतील आणि उचलून नेतील" चंदू टवटवीत बोलत होता.
" चंदू तू पूर्ण एकूण न घेता नको बोलत जाऊस " जयेश .
"बरं तू बोल मग "
"चंदू एक आता आपण जाणार आहोत पण बसमध्ये नाही तर माझ्या मोटरसायकलवर आणि ... "
"... आणि काय ?" चंदू बोलला .
"आता आपण त्यांचा पाठलाग करायचा" जयेश बोलला.
"आणि दगडावर डोकं आपटून घ्यायचं " चंदू जयेशच्या बोलण्यावर काहीसा चिडत बोलला.
"चंद्या आधी एकून तर घेत जा " जयेश आता चिडला होता.
"हा बोल " चंदू वरमला.
मला खूप शंका आहेत या प्रकरणामध्ये पण त्यापैकी एक मोठी शंका उद्या सकाळी स्पष्ट होईल, आता तू फक्त मला साथ दे आणि माझ्यावर विश्वास ठेव" जयेश बोलला.
"विश्वास आहेच रे त्याबद्दल नाही पण परत नवीन संकट नको म्हणून म्हटलं"
"नाही येणार नवीन संकट, आता आपण हेलमेट घालून लढू"
"म्हणजे ?"
".. म्हणजे आता आपण पूर्ण सुरक्षितता बाळगूनच पावलं उचलू आणि आपल्याला आता या प्रकरणात तीन महत्वाची कामं आहेत", जयेश आत्मविश्वासाने बोलत होता, तो पुढे बोलू लागला, "पाहिलं "
"पहिलं काम उद्या सकाळी करायचंय त्यावर पुढच्या दोन गोष्टी अवलंबून आहेत काम फार काही मोठं नाहीये फक्त एक फोन करायचाय " आता जयेश बोलत होता आणि चंदू मुकाट्याने ऐकत होता. गच्चीवर टाकलेल्या गादीवर पडून आकाशातील दिसणाऱ्या टिमटिमणाऱ्या ताऱ्यांकडे बघत जयेश त्याची योजना चंदू ला सांगत होता आणि चंदू देखील आकाशाकडे बघत ते ऐकत होता. त्यांच्या गप्पा संपता संपता रात्र बरीच झाली होती. हळू हळू त्यांनाच कशी झोप लागली ते देखील कळलं नाही.

सकाळी जयेश ने डोळे उघडले तर लख्ख उजेड पडला होता, आकाशात पक्षी उडतांना दिसत होते ग्रामीण भागात राहण्याचा हा फायदा असतो तुमची सकाळ अशीच निसर्गाच्या सानिध्ध्यात होते, खाली गल्लीतून शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांचा थवा किलबिलाट करत चालला होता त्यांचा आवाज थेट गच्चीवर येत होता. त्याने बाजूला पहिले चंदू अजून झोपलाच होता . मग त्याने घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे फक्त साडेसात झाले होते. च्यायला गावाकडे सकाळी सात ला उठून सुद्धा थकवा जाणवत नाही आणि शहरात दहा वाजेपर्यंत झोपून सुद्धा नीट झोप होत नाही. खरच असं स्वतःशी बोलत त्याने चंदू ला आवाज दिला .
"चंदू उठ रे आपल्याला निघायचंय दहा वाजे पर्यंत लवकर उठलं तर आपल्याला तेवढाच वेळ मिळेल"
डोळे चोळत चंदू उठला, "हो अरे अजून झोपलो असतो ना थोडं "
"साल्या तू जन्माचा आळशी आहेस चल यावर आता पटकन" जयेश बोलला.
खाली मुलगा परत शहरात जाणार म्हणून जयेशच्याआई सकाळीच स्वयंपाकाला लागली होती.
दोघांनाही सकाळी साडेसात लाच उठलेलं बघू ती देखील आश्चर्यात पडली, पण त्यांना लवकर जायचंय हे माहित असल्यामुळे काही बोलली नाही.
सकाळची सगळी कामे आवरून आईच्या हातचं गोड धोड खाऊन दोघांना उशीर झाला. घर सोडून जातांना सुरुवातीला जयेश भावुक व्हायचा पण आता तो समंजस झाला होता, आईवडिलांचा निरोप घेऊन दोघेही पाठीवर बॅग अडकवून घरातून निघाले.
जातांना त्यांना दिगुनाना काही दिसला नाही फक्त जयेशने वडिलांना या गोष्टीतला काही भाग सांगितला होता, आणि दिगुनानावर लक्ष द्यायला सांगितलं होतं
गावातील गल्ल्या मधून भेटणारे बालपणीच्या मित्रांचा निरोप घेत जयेश आणि त्याच्यासोबत चंदू दोघेही बस स्टॅन्ड वर आले तिथून तालुक्याला जायचं व तिथून च शहरात जाणारी ट्रेन पकडायची आणि पुढचा सगळं कार्यवाही करायची असं सगळं ठरलं होतं . बसने तालुक्याला सोडलं तिथून ते शहरात जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसले. ट्रेन मध्ये जाताच जयेशने त्याच्या कामाला सुरुवात केली. त्याने मोबाईल काढला आणि आकाशच्या घरी त्याच्या लहान भावाला फोन लावला.

(क्रमश :)

Comments

Popular posts from this blog

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ७

पाठलाग भाग 1 (मराठी भयकथा )