पाठलाग (मराठी भयकथा) भाग 3

 

पाठलाग (मराठी भयकथा) भाग 3

आकाश चा खून झाल्याचं कळल्यानंतर जयेशला मोठा धक्का बसला होता, त्याला इतकं कळलं कि आकाश ला मारल्यानंतर हे लोक आता आपला पाठलाग नक्कीच करतील, कारण त्यांना सगळ्यांना आपण पाहिलं आहे आणि त्यांना आपल्यला मारायचं होत पण आपण त्यातून निसटलो. आता यांच्यापासून वाचायचं तर एकच पर्याय आहे तो म्हणजे शहर सोडून आपल्या १५० किमी अंतरावर असलेल्या गावाकडे पळून जाणं.
हायवे असल्यामुळे नवली फाट्यावरून शहराकडे वेगवेगळ्या गाड्या भरधाव धावत होत्या. तो परत बस स्टॅन्ड मध्ये जाऊन शहराकडे जाणारी बस शोधू लागला सुदैवाने एक बस निघायच्या बेतात होती जयेश धावतच जाऊन त्या बस मध्ये बसला. खिडकीतून तो बाहेर कोणाला तरी शोधत होता, कदाचित त्याला असं वाटत होत कि त्या मुलामुलींपैकी कोणी त्याला शोधत तर नसेल ना ? त्यांनी बस स्टॅन्ड मध्ये येण्याआधी हि बस निघायला हवी हा विचार सारखा त्याला येत होता.
घामाघूम झालेला जयेश बस मध्ये बसल्यावर अजिबात स्थिर नव्हता. या गडबडीतच कंडक्टर ने बेल मारली तसं ड्रॉयव्हरने आधीच चालू करून ठेवलेलं इंजिन ला गियर मध्ये टाकलं व हळू हळू बस पुढं सरकू लागली. घुर्र्र्र घुर्र्र्र करत बस निघाली. बस एकदाची स्टॅन्ड मधून बाहेर पडली व हायवेला लागली तस त्याच्या जीवात जीव आला . या गडबडीत जयेश ने बस मध्ये कोण कोण बसलंय हे पाहिलंच नव्हतं त्याने झटकन बसमध्ये एक नजर मारली, पुढे एक विवाहित जोडपं त्यांच्या बॅग्स सांभाळत बसलं होत त्यांच्या मागे काही मध्यमवयीन लोक बाया माणसं होते, जयेश च्या पुढे कंडक्टर च सीट होतं तर पाठीमागे दोन मध्यमवयीन बायका होत्या त्यांच्या मागे एक तरुण मोबाइलमध्ये गेम खेळत होता एकूण बस मधील वातावरण त्याला सुरक्षित वाटलं, तस त्याने सीटवर मान टेकवली व डोळे बंद केले. बस आता पूर्ण वेगात धावत होती, खिडकीतून येणारा वारा त्याचा घाम पुसून टाकत होता, आता त्याला जरा बर वाटू लागलं. पण आकाशाची आठवण काही स्वस्थ बसू देईना. तोपर्यंत कंडक्टर येऊन गेला याने तिकीट देखील घेतलं.
आता या लोकांपासून वाचायचं असेल तर शहरात थांबणं धोकेदायक आहे, चंदू तर शहरात नव्हताच त्यामुळे त्याचा प्रश्न मिटला. पण हे लोक पाठलाग करत खोली पर्यंत आले तर ..? या विचाराने जयेशला वेडावून सोडलं.
बस आता आसरी घाट पार करत होती, ते जयेशच्या लक्षात आलं तसं तो खिडकीतून बाहेर आकाश किंवा त्या बस शी संबंधित काही दिसतं का ते बघू लागला.
पण बाहेर खळाळून हसणाऱ्या निसर्गाव्यतिरिक्त फक्त काळा कुळकुळीत हायवे आणि भरधाव धावणारी वाहनं इतकंच दिसत होतं .
तीस मिनिटात बस घाटाच्या बाहेर आली. आणि आता शहराकडे धावत होती . कहदी एकदा खोलीवर पोचतो असं जयेश ला झालं होतं. कारण तो स्वतःला बाहेरच्या वातावरणात असुरक्षित समजत होता. त्याला कुठून तरी जाणवत होतं कि ते लोक त्याच्या मागावर असतील आणि त्याला सहज हुडकून काढतील.
अजून दिवस मावळायला वेळ होता त्यामुळे उजेड होता बस तिच्याच लहरीत शहरात असलेल्या बस स्टॅन्ड मध्ये आली. बस थांबायच्या आधीच पटकन दार उघडून तो बाहेर पडला. आता काय करायचं हे त्याच्या समोर स्पष्ट होतं , या लोकांपासून वाचण्यासाठी त्याने एक उपाय शोधून काढला होता. बस स्टॅन्ड पासून एक दीड किलोमीटर वर असलेल्या त्यांच्या खोलीकडे तो धावत पळत पोचला. खोलीचं कुलूप उघडतांना त्याच्या मनात भीती होती कि त्या लोकांनी त्याचा शोध घेत आता खोलीवर नको यायला आणि याच कारणामुळे पटकन फ्रेश होऊन त्याने बॅग भरायला घेतली. अजून चंदूशी काही संपर्क झाला नव्हता. चंदू नातेवाईकांकडे आहे म्हणजे सुरक्षितच असेल म्हणून जयेश आता फक्त स्वतःला वाचविण्याचा विचार करत बॅग भरू लागला. आवश्यक सामान आणि महत्वाच्या वस्तू भरून स्वतःची बॅग पाठीवर घातली. एकवार रूममध्ये नजर टाकली चंदू चे व त्याचे सर्व कागदपत्र व त्यांची ओळख देतील असे कागद त्याने एका बॅगमध्ये भरून ती मोठ्या बॅग मध्ये टाकून घेतली होती, जेणेकरून त्यांच्या पाठीमागे कोणी रूमवर आलं तर त्याला दोघांचा थांगपत्ता लागायला नको.
रूम मध्ये आता फक्त बिछाना आणि दोन चार भांडी टूथपेस्ट ब्रश ई . असच साहित्य होतं.

दाराला कुलूप लावून तो पटापट जिना उतरू लागला , काही करून सात वाजेची ट्रेन पकडायची होती.

धावतच तो मुख्य रस्त्यावर आला आणि तिथून स्टेशनला जाणारी ऑटो पकडली, ऑटो स्टेशन च्या दिशेने धावू लागली. स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या इतर ऑटोवाले, वेगवेगळी दुकान, बाहेर पडणारे आणि मध्ये घुसणारे प्रवासी यांच्या मधून धावतच जयेश तिकीट खिडकीवर पोचला. त्याला कसही करून शहराबाहेर जायचं होतं. प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट बघतांना तो खूप बैचेन होता. आजूबाजूचे लोक त्याच्याकडे चोरून बघत आहेत असं त्याला वाटत होतं. सुदैवाने दहा मिनिटे वाट पाहिल्यावर ट्रेन आली, फारशी गर्दी नव्हती त्यात जयेश खिडकीजवळ जाऊन बसला.
हळू हळू गाडी स्टेशनच्या बाहेर निघाली, जसजशी शहरातून गाडी बाहेर पडू लागली तसतसं आजूबाजूला मोकळे रान आणि शेती दिसायला लागली. शहराच्या कोला हला पासून बाहेर आल्याची भावना त्याला सुखद वाटत होती.

गाडीच्या बाहेर आता बऱ्यापैकी अंधारून आलं होत दिवस कधीच मावळला होता, पक्षी घराकडे कधीच परतले होते. झाडे आणि टेकड्या म्हणजे नुसत्याच काळ्या आकृत्या भासत होत्या. धावत्या ट्रेनच्या बाहेर लांबवर कुठेतरी खेड्या गावातील दिवे चमकताना दिसत होते. खिडकीतून येणारा गार वारा खिडकी बंद करायला सांगत होता पण जयेशला खिडकी उघडी हवी होती.

बराच वेळ झाला जयेश विचार करत होता, आकाशच काय झालं काहीच कळलं नाही, त्याचा खून झाला तर त्याची बॉडी कुठे आहे, पोलिसांनी काही तपास केला कि नाही? त्या दिवशी सकाळी आकाशने मला फोन केला होता मग ते कॉल रेकॉर्ड पाहून पोलिसांनी चौकशीसाठी मला बोलवायला पाहिजे होतं पण तसं काही झालं नाही . कदाचित उद्या बिद्या कॉल येईल त्यांचा .

असा विचार करून तो परत शांत झाला. ट्रेन धडधडत धावत होती, खाली रुळांचा खड्याक खड्याक आवाज येत होता. मधूनच थांबा नसलेले छोटे स्टेशन जाताना उजेड सोडून जात होते.
यादरम्यान जयेशच्या थोडावेळ झोप लागली होती. पण विशेष म्हणजे त्याला अजून चंदू किंवा इतर कोणाचाही कॉल आलेला नव्हता.
काही तासांनी जयेशचं उतरायचं तालुक्याचं स्टेशन जवळ येत होतं.
ही ट्रेन आता तिथेच तालुक्याचा गावाला थांबणार होती तिथे उतरून मग ऑटो किंवा मिळेल त्या वाहनाने जयेश ला त्याच्या गावी जावे लागणार होते. तसं जयेशचं पिंपरी गाव ट्रेन ने जाताना तालुक्याच्या गावाच्या आधी लागायचं पण तिथे असलेल्या छोट्या स्टेशनवर ह्या ट्रेन ला थांबा नव्हता त्यामुळे तालुक्याला उतरणं भाग होतं.
जयेशच्या जाग आली होती, त्याने बाहेरच्या अंधारात पाहिलं, म्हसोबाची टेकडी त्याने ओळखली म्हणजे गाडी त्याच्याच गावाच्या जवळून धावत होती. पिंपरिचं सगळं शेती शिवार त्याला पाठ होतं. अजून वीस मिनिटांच्या अंतरावर तालुक्याचं गाव होतं.
अचानक गाडीचा स्पीड कमी झाला आणि गाडी हळू हळू चालू लागली.
गाडी थांबायच्या बेतात असल्याचं जयेशला कळलं होतं.
आणि खरं तेच होतं, पुढे सिग्नल नसल्यामुळे गाडी छोट्याशा पिंपरी स्टेशन वर मुख्य ट्रॅक वर थांबत होती.
जयेश मनातून खुश झाला अरे तालुक्याला जाऊन परत येण्यापेक्षा इथेच उतरलेलं बरं. त्याने झटकन बॅग पाठीवर अडकवली आणि दाराकडे निघाला आणि तोपर्यंत गाडी देखील थांबली होती.
गाडीच्या आत मध्ये जसा लख्ख पांढरा उजेड होता त्याच्याच उलट बाहेर मिट्ट काळोख होता. सुदैवाने स्टेशनवर काही दिवे जळत होते त्यांचा उजेड होता. गाडीतून टुणकन उडी मारून जयेश बाहेर आला.
जरी हे पिंपरी स्टेशन त्याच्याच गावाचं होतं पण इथून त्याचा गाव अडीच तीन किलोमीटर दूर होता.
रात्रीच्या अंधारात रेल्वे स्टेशन च्या बाहेर तो आला आजूबाजूला सगळी शेतीच होती.तसं त्याच बालपण याच भागात गेलं असल्याने त्याला सगळे रस्ते आणि शिवार तोंडपाठ होतं.
पाठीवरची बॅग सावरत तो गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागला.
बाहेर अंधार असला तरी नाही म्हणायला चंद्राचा थोडा उजेड त्याच्या सोबत होता.

ट्रेनमधल्या दमट वातावरणातून स्वच्छ हवेत आल्याने त्याला फ्रेश वाटू लागलं थोडे अंतर चालल्यावर त्याला गावाकडे जाणारा तुटका फुटका डांबरी रस्ता लागला.
चंद्राच्या मंद उजेडात त्याची अंधुक सावली अंधारात त्याच्या सोबत चालली होती. सगळं रस्ता शेती शिवरातून गेला असल्याने आजूबाजूला झाडांवर मधूनच पक्ष्यांची फडफड ऐकू यायची.

चंद्रप्रकाशात तो चालत होता मागून रेल्वेस्टेशन वरून गाडीचा लांब भोंगा ऐकू आला तस त्याला कळलं कि टगाडी ला सिग्नल मिळाला असेल म्हणून निघतांना हॉर्न वाजविला. साधारणतः अर्धा ते एक किलोमीटर चालून आला होता आता गाव अजून दोन अडीच किलोमीटर लांब होता . दिगंबर नानाच्या शेताजवळ त्याला लांबून एक मोठं वाहन ट्र्क किंवा बस उभं असलेलं दिसत होतं . जसजसा तो पुढे जाऊ लागला त्याला कळायला लागलं कि ती बसच होती. झपझप पावले टाकत जयेश पुढे सरकत होता. तो तिथपर्यंत पोचला आणि त्याच्या अंगावर भीतीने सर्र्कन काटाच उभा राहिला. कारण....
... कारण हि बस तीच होती ज्यामध्ये ते ट्रिप ला गेले होते. पण हि बस इकडे कशी काय आली ? आपलं काही चुकत कर नाही कि तशीच दिसणारी दुसरी बस आहे म्हणून तो जवळ जाऊन निरीक्षण करू लागला. दरवाजा लॉक नव्हता म्हणून त्याने बस चा दरवाजा उघडून आत मध्ये पाहिलं . अगदी तशीच बस होती कि तीच होती? मध्ये अंधार होता पण चंद्राचा उजेड खिडक्यांमधून झिरपत होता. त्या मर्यादित उजेडात तो भारावल्यासारखा बसमध्ये चढला ड्राइवर सीट पाहिलं त्यावर असलेलं सीट कव्हर अगदी त्या बस सारखंच होतं . त्याचं ह्रदय आता धडधडायला लागलं होतं . हळू हळू तो तो आणि चंदू ज्या सीटवर बसलेला होता त्या सीट कडे जाऊ लागला . त्याला बस च्या मध्यभागी एक हत्तीच्या आकारात बनवलेलं एक छोटंसं झुंबर टांगलेलं दिसत होतं ते त्याने ओळखलं अरे हि तर तीच बस वाटते आहे सकाळी त्याने त्या बस चा नंबर पहिला नव्हता पण आता मधील हत्तीच्या आकारातील झुंबर त्याच्या लक्षात होतं . तो त्याच्या सीट कडे गेला तिथे पाहिलं तर सकाळी त्याने खाल्लेलं अर्धवट वेफर्स च पाकीट तसेच पडून होतं . आता मात्र भीतीने त्याचा थरकाप उडायला लागला . होय हि तीच बस होती.
पण हि बस इकडे त्याच्या गावी कशी आली ? आणि त्याच्या रस्त्यातच कशी काय आली ? खूप सारे प्रश्न त्याच्या मनात विषारी नागासारखे फणा काढून उभे राहिले. या विचारात तो विसरला कि तो अजून बसमध्येच उभा आहे अचानक तो भानावर आला, ताबडतोब बसमधून बाहेर निघणं भाग होतं. त्याला भीती वाटू लागली कि तो बसमध्ये असतानाच कोणी तिथे नको यायला . तो माघारी फिरला व झटकन बसच्या बाहेर निघायला लागला त्याचवेळी आपल्याला कोणी बघत नाहीये ना हे सुद्धा बघू लागला.खिडक्यांमधून किंचित चंद्राचा उजेड मध्ये येत होता,बसला मोठमोठ्या खिडक्या असल्याने त्यामधून बाहेरच सगळं दिसत होतं. धाड धाड करून तो बसच्या पायऱ्या उतरला व बाहेर रस्त्यावर आला. त्याचा कॉमन सेन्स त्याला सांगू लागला कि आता रस्त्याने जाणं धोक्याचे आहे, काहीही होऊ शकतं . म्हणून तो आधी रस्ता सोडून धावत समोरच्या पिकांमध्ये घुसला. रस्त्या रस्त्याने घरी जाणं धोक्याचे आहे तो स्वतःला सांगू लागला. मला शेता शेतांमधूनच गाव आणि घर गाठावं लागेल. या सगळ्यांपासून वाचण्यासाठी जयेश गावाला आला होता पण तीच बस त्याच्याच गावाच्या शिवारात बघितल्याने मात्र तो भयंकर विचारात पडला.डोकं काम करत नव्हतं, सहज मोबाईल बघितला तर बॅटरी कमी असल्याने तो बंद झाला होता.
त्याने मनाशी निर्धार केला कि काही होवो मी आता मरणार नाही मी सगळी सुरक्षितता बाळगेल.
पिकांमधुन चालताना त्याच्या शूज ला खालचा चिखल आणि गवतावरच पाणी लागत होतं . उंच पिकांमधुन चालताना तो बाहेरून कोणालाही दिसून येत नव्हता. पिकांमधुन शेतांमधून गावाकडे मार्गक्रमण करताना तो विचार करू लागला , "खूप दक्ष राहावे लागेल हि बस गावापर्यंत आली म्हणजे काय ? कदाचित ती पाठलाग करत आली असेल , त्यांना माझं गाव आकाश कडून कळलं असेल ? , कि गावातीलच कोणी आकाश च्या मदतीने माझ्या मागे लागलं असेल पण असं असलं तर ते मला मारायला इतका वेळ का घेतील , ती ट्रिप का प्लॅन करतील? मारायचंच असतं तर कधीही एकटं दुकट गाठून ठार मारता आलं असतं. आणि मला मारायला मी कोणाचा दुष्मन नाही किंवा कोण्या मोठ्या धनवान किंवा राजकारणी व्यक्तीचा मुलगा देखील नाहीये मग हे इथे आलेच कसे ? आकाश मी आणि चंदू आम्हा तिघांना हे मारणार होते म्हणजे आमच्या तिघांमध्ये काहीतरी समान धागा आहे. पण हे मारणारे कोण आहेत ? त्यांच्या वागण्यावरून तर ते मला अमानवीय वाटत होते. असे एक ना हजार प्रश्न जन्माला घालत तो पिकांमधुन सरसर गावाकडे चालू लागला.
(क्रमश :)

Comments

Popular posts from this blog

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ५

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ७

पाठलाग भाग 1 (मराठी भयकथा )