पाठलाग (मराठी भयकथा) भाग 4

 

पाठलाग (मराठी भयकथा) भाग 4

आकाश चा खून झाल्याचं कळल्यानंतर जयेश शहरात आला आणि तिथून त्याने स्वतःला वाचविण्यासाठी आपल्या गावी काही दिवस जाण्याचा निर्णय घेतला आणि तो ताबडतोब संध्याकाळची ट्रेन पकडून गावाकडे निघाला या दरम्यान त्याला घडलेल्या सर्व घटना विचित्र वाटत होत्या, गावाच्या शिवारात ट्रेन थांबल्यामुळे तो तिथेच उतरून गावकडे पायी निघाला पण वाटेत त्याला तीच बस पुन्हा दिसली त्यामुळे त्याला आपला पाठलाग होतोय अस वाटलं आणि सुरक्षिततेसाठी तो रस्त्याने न जाता शेतांमधून पिकांमधून रस्ता काढत गावाकडे निघाला.

"आता मी काय करू?, गावात जाऊ कि नको ?' शेतात पिकांमधुन चालताना जयेश विचार करत होता. कुठून हि ब्याद मागे लागली असं झालं होत. मुख्य रस्त्याने न जात सुरक्षिततेसाठी जयेश शेतांमधून चालत जात होता. इथून पुढे थोड्याच अंतरावर त्याची देखील शेती होती, तिला बघत त्यातच काम करत तो लहानाचा मोठा झालेला होता. त्याने विचार केला मी जर आता घरी गेली तर हे लोक माझ्या घरापर्यंत सुद्धा पोचतील त्यापेक्षा मी इथेच थांबून या बस चा मागोवा घेतला तर ?. असा विचार करून तो तडक त्याच्या शेताकडे निघाला दोन तीन मोठे मोठे सर्व्हे ओलांडून त्यांचं शेत आलं. आपल्या शेतात आल्यावर त्याला हायसं वाटलं. त्याने मनात काहीतरी निर्धार केला आणि तो शेतात बांधलेल्या खोली कडे गेला खोलीबाहेरच्या पत्र्याचा शेडमध्ये शेतीची अवजारे पडलेली होती. तिथेच एका बाजूला शेतात राखणीला येणार्यांसाठी झोपायला खाट होती आणि त्यावर बिछाना देखील होता. पण पावसाळा असल्यामुळे शेतात झोपायला कोणी येत नव्हतं. जयेश ने तिथेच मनाशी निर्धार केला आणि खात उचलून खोली मध्ये घेऊन गेला. खोली मध्ये खूप पसारा होता पण त्याला या वेळी स्वतःची सुरक्षितता महत्वाची होती. त्याने खोलीमध्येच एका बाजूला प्लग होता तिथे त्याने फोन चार्जिंग ला लावला पण तो प्लग देखील बंद होता. वैतागून तो अंधारात खाटेवर पहुडला. पत्र्याची खोली असल्यामुळे आत मध्ये खूप गरम वाटतं पण सुदैवाने दुपारी पाऊस पडल्यामुळं गारवा होता . त्याने खोलीचं दार आतून लावून घेतलं आणि तिथेच उपाशी पोटी झोपला. घरी जाण्यापेक्षा त्याने शेतात झोपणं निवडलं याला कारण होतं ते म्हणजे त्याला सकाळी लवकर उठून त्या बस चा मागोवा घयायचा होता.
खाटेवर पडून तो इकडे तिकडे कूस बदलत होता. बाहेरून काही आवाज येताय का यावर त्याचं सारखं लक्ष होतं . मध्येच विचार आला कि घरीच गेलो असतो तर बरे झालं असत. पण त्याच्या प्लॅन साठी त्याला इथे रात्री थांबणं गरजेचं होतं.

त्याला रात्री कशीबशी झोप लागली पण तीदेखील काही तासच सकाळी खिडकीत बसलेल्या चिमणीच्या आवाजाने त्याला जग आली पाहतो तर उजेड पडायला लागलेला होता . तो ताबडतोब उठला आणि बॅग पाठीवर अडकवून दिगंबर नानाच्या माळ्याच्या दिशेने धावत सुटला. आता त्याला त्या बस ची भीती नव्हती कारण आता दिवस होता आणि हा त्याचा गावशिवार होता, त्याच्या एका हाकेवर सगळे धावत आले असते. त्याने लांबूनच पाहिलं तर रात्रीच्या जागेवर बस उभी नव्हती बस निघून गेली होती. तरीही तो धावत तिथपर्यंत आला त्याने बसची रस्त्यावर हलक्या चिखलाचे उमटलेली चाकं पहिली त्यावरून एक कळत होतं कि ती बस गावात गेली होती. तो घाईने गावाकडे जायला निघाला शेताच्या रस्त्याला अजून इतर वाहनं आलेली नव्हती त्यामुळे त्याला बसची चाक रस्त्यावर नीट दिसत होती. घाईघाईत तो गावाजवळ पोचला खरा पण बस गावात न शिरता गावाबाहेरच्या हायवेवरून बाहेरूनच शहराच्या रस्त्याला गेलेली दिसत होती.
त्याने बस कुठे थांबली आहे का ते पाहिलं पण रस्त्यावर बस कुठेच थांबलेली दिसत नव्हती. असेही फक्त सकाळचे साडेसहा सात वाजत असावेत कारण अजूनही गावातील, रस्त्यावरील दुकानं आणि हॉटेल्स उघडली नव्हती. त्यामुळे बसमध्ये जे कोणी असेल त्याला किंवा त्यांना थांबण्याला मुभाच नव्हती. तिथून जयेश हळू हळू घराकडे निघाला त्याला बसचा पाठलाग करायचा होता पण तो पूर्ण तयारीनिशी आला नाही आणि उशिरा उठला होता नाहीतर आज त्याच्याच गावात त्याने बस धरली असती. विचार करत करत जयेश घरापर्यंत आला.

दारात अचानक सकाळी सकाळी जयेश ला बघून त्याची आई आनंदली.
"अरे जयु, इतक्या सकाळी कसा काय आलास ? आणि कोणती गाडी मिळाली तुला ?"
"हो ग आई होती एक ट्रेन सकाळची तिच्यातच आलो" आईने काळजी करु नये म्हणून त्याने खोटच सांगितलं .
"बर बरं, घे आधी तुला हा गरमागरम चहा घे अंघोळ कर तोवर मी नाश्ता बनवते " एवढं बोलून ती माउली कामाला लागली . पण काम करता करता ती जयेश शी गप्पा मारत होती. तोपर्यंत जयेशने मोबाईल चार्जिंग ला लावला होता.
अंघोळ करून नाश्ता करून जयेश वडिलांशी गप्पा मारत बसला होता.
"तुझा मित्र चंदू कसा आहे? त्याचं काय चाललं? " वडिलांच्या या प्रश्नावर मात्र तो सावध झाला आणि त्याला आठवलं कि आपण चंदूशी अजून संपर्क च नाही केला.
"तो पण मजेत आहे पपा", जयेश विषय टाळण्याच्या सुरात बोलून गेला आणि झटकन जाऊन मोबाईल हातात घेतला आणि चंदू ला कॉल लावला.
त्याचे वडील त्याच्या कडे बघतच होते.
दोन तीन रिंग वाजल्या पण चंदू काही फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्याला नंतर फोन करू असं मनाशी म्हणून तो परत जागेवर बसला.
"काय रे काय झालं ?"
"काही नाही पपा चांदूकडे एक काम आठवलं होत म्हणून त्याला फोन केला".
"काय झालं बाळा काही टेन्शन आहे का ?" वडिलांनी त्याला हेरलं.
"नाही पपा काही टेन्शन नाही " असं बोलून तो हसायला लागला. आणि त्याला हसताना पाहून वडीलदेखील खुश झाले.
"बर जरा तालुक्याला जाऊन येतोस का ?हे सामान आणायचं होतं, मी शेतात जाऊन येतो तोपर्यंत ", वडिलांनी त्याला कमला लावलं.
एरवी आज्ञाधारक असणारा जयेश ने मोठ्या नाखुशीनेच होकार दिला कारण त्याला या प्रकरणाचा छडा लावायचा होता विचार करायचा होता.
तरीही थोड्या वेळाने तो त्याच्या वडिलांची मोटरसायकल घेऊन तालुक्याला जायला निघाला.
तो मोठ्या नाखुशीने जरी तालुक्याला जायला निघाला पण वडिलांना नाराज करू नये म्हणून चेहऱ्यावर अजिबात नाखुषी दाखविली नाही त्यांच्यासमोर तो उत्साहाने निघाला. मनातून नाखूष असलेल्या जयेशला तरी कुठे ठाऊक होतं कि तालुक्याला जाऊन त्याला ह्या प्रकरणातली मोठी चावी सापडणार आहे.
हळू हळू त्याची मोटरसायकल गावातील गल्ल्या ओलांडून बाहेर पडली आणि तालुक्याच्या हमरस्त्याला लागली .
रस्त्याने जाताना इतर वाहन देखील भरधाव धावत होती, जयेशच्या मनात कुठे तरी भीती होती कि ती बस मला या रस्त्यात दिसेल. अगदी तशीच हुबेबुब एक बस त्याच्या मागून पुढे गेली पण हि ती बस नव्हतीच हे त्याने ओळखलं. काही वेळाने जयेश तालुक्याच्या गावात पोचला तिथे ज्या दुकानांमधून त्याला शेतीच आणि घराचं काही सामान घ्यायचं होत ते घेत फिरत होता. सगळं घेऊन होई पर्यंत त्याला चार वाजले आता त्याला चहा पिण्याची तीव्र इच्छा होऊ लागली. तालुक्याच्या शहरातच बस स्टॅन्ड च्या पुढे एक बाजूला गाडी लावून तो शेजारी असणाऱ्या चहा च्या टपरीवर गेला आणि एक कडक चहा सांगितला. चहा पित असताना त्याचं सगळीकडे लक्ष जात होतं. बाजूला फळ विकणाऱ्याची दुकाने होती, त्यांच्या पुढे एक मोठं हॉस्पिटल होतं , भोवताली काही हॉटेल्स होती त्यांच्याच पुढे रिक्षा स्टॅन्ड होता. बस स्टॅन्ड मधून बस ची केलेली घोषणा बाहेर ऐकू येत होती. तोच त्याला समोरून दिगू नाना म्हणजेच दिगंबर नाना ज्यांच्या शेताजवळ ती बस लावलेली होती ते येताना दिसले. आणि जयेश पटकन चहा संपवून त्यांच्याकडे धावत निघाला.
"नाना ओ नाना"
आवाजासरशी दिगुनाना ने जयेश कडे वळून पाहिलं.
"आरं जया तू ?, कवा आलास गावाकडं ?"
"मी कालच आलोय नाना"
"बरं बरं काय चाललं अजून तुझं ? समदं ठीक हाय न्हवं ?" जयेश काही बोलण्याच्या आताच त्यांचा पुढचा प्रश्न येऊन आदळला.
"मजेत आहे नाना सगळं ठिक आहे पण .. मला तुम्हाला एक विचारायचं होतं" जयेश एका दमात बोलला.
"आरं मंग बोल कि गड्या? काय विचारतुस"
"नाना चला चहा पिताना बोलू" असं म्हणून तो परत त्यांना चहा टपरीवर घेऊन गेला. दोघे बाकावर बसून चहा पीत होते.
जयेश पुढे बोलू लागला.
"नाना, मी काल रात्री गावी आलो पण येतांना गाडी आपल्या शिवरातल्या स्टेशनवर चुकून थांबली आणि तिथेच उतरलो "
नाना हा काही भुताटकी सांगतो कि काय या धाकाने त्याकडे बघत होता.
जयेश पुढे बोलू लागला ," तर नाना मी तुमच्या मळ्याजवळ आलो तेव्हा तिथं एक बस उभी होती ती कोणाची होती ? कारण ती मला ओळखीची बस वाटली"
"आरं जया ह्ये एवढं इचारायला बसलास व्हय त आइक मग ती बस नै का शहरातनं आली हुती त्यात माजा भाचा हाय तो बी शहरातच राहतो तर त्याच्या ओळखीचे मित्रपरिवार सोबत हायेत त्येंना पावसाळी सहल करायची होती म्हणून ते इकडं आलेत"
आता जयेशसाठी हा दुसरा धक्का होता,
"तू बी शहरात राहतो आन ते बी मग तू हि बस पाह्यली आसन शहरातच", एवढं बोलून दिगुनानाने स्मितहास्य केलं.
"ओके ओके, म्हणून मला ती बस ओळखीची वाटली असेल " जयेश ने नॉर्मल होण्याचं नाटक केलं, कारण उगाच सगळं दिगुनाना ला सांगण्यात अर्थ नव्हता.
"बरं नाना त्यात मुली पण आहेत का ?"
"न्हाय रे फकस्त मुलंच हायेत तीन चार मूलं हायेत "
"अरे बापरे तीन चार मुलांसाठी अख्खी बस घेऊन आलेत ? " जयेशने मुद्दाम मोठयाने नानाच्या लक्षात आणून दिल.
"आर व्हय कि हा प्रश्न मला बी न्हाय पडला अजून, चार जणांसाठी बस कशी काय घेऊन आले ते "
"दिगू नाना जाऊद्या मग गेले का ते शहरात परत ?"
"न्हाय रे जया ते आजपण हिकडच मुक्कामी हायेत कालच्यासारखं "
"म्हणजे .? " जयेशच्या प्रश्न आला.
"आर म्हंजी ते काळ रातच्याला शेतात पार्टी करत हुते कोंबड्याची आजपण शेतातच थांबणार हैत ते आणि मंग उद्या बिद्या जातील शेहरात परत आज ते इथं डोंगरदेवीला फिरायला गेलेत रात होईस्तोवर परत येतील."
"आणि मग त्यांचं जेवण? ", जयेश ने बिनकामाचा प्रश्न केला.
"त्येच बनिवत्यात समदे मिळून त्यांच्याकडं सगळं शिधा हाय, येत्यांना कोंबड देखील घेऊन येत्यात ते "
"ओके ओके " जयेश विचारात पडला होता.
माझ्या आणि माझ्या मित्राच्या जीवावर उठलेले लोक माझ्याच गावात येऊन पार्टी करत आहेत.... तो विचारात पडला. यांना गाठायचं कसं आणि आकाशच्या खुनाच काय ? ... त्याची बॉडी कुठे आहे ? ... मला पोलिसांनी अजून फोन का नाही केला ?
साला चंदू देखील अजून फोन करत नाहीये. मी च त्याला फोन करतो परत.
"आरं जया काय झालं ? कुठं हरवलास ?" नानाच्या आवाजाने तो भानावर आला.
"काही नाही नाना "
"जया काय टेन्शन हाये का ? आसल तर सांग बिनधास्त मला बी "
"दिगू नाना तुम्हाला खरं सांगायला हरकत नाहीये " जयेश पुढे बोलू लागला

ती बस आपल्या गावात येण हा योगायोग नक्कीच नसेल हा विचार करून जयेश पुढे सगळं खरं दिगू नानाला सांगावं कि नको या विचारात पडला. पण शेवटी कुठे ना कुठे त्याला हे सगळं सांगणं भाग होतच म्हणून तो पुढे बोलू लागला, "तुमच्या शेतात जी बस मुक्कामाला आली होती , त्या बस मधून मी काल प्रवास केला होता, आम्ही देखील फिरायला गेलो होतो एका मित्राच्या मामाच्या फार्महाऊस ला चाललो होतो...."
त्याला लक्षात आलं त्या मुलाचं नाव केतन होतं आणि आपण त्याच्या मामाच्याच फार्महाउस ला चाललो होतो आणि आज दिगुनाना चा भाचा ट्रिप घेऊन दिगू नानाच्या शेतात आला होता. हे मामा भाचा कनेक्शन त्याच्या लक्षात आलं. पण ह्या वेळी नक्की तेच मुलं होते का ? कि खरोखर दुसरे कोणी आले हे कळायला मार्ग नव्हता.
"नाना तुमच्या भाच्याचं नाव काय आहे ?"
"केतन हाये त्याच नाव" दिगु नाना बोलताच जयेशच्या डोळ्यात वेगळीच चमक आली.
"बरं तू कायतरी सांगत हुतास पुढं " दिगूनानांनी आठवण करून दिली. तसा जयेश पुढे बोलू लागला.
"नाना तुमचं आणखी कुठे फार्महाउस आहे का आपला गाव सोडून... म्हणजे जिल्ह्याच्या गावाच्या पुढे, आसरी घाटाच्या पुढे कुठे "
"न्हाय रे जया माझ्या जलमापासून मी हितच हाये जी काय शेती जमवली ती बी हितच दुसरीकडं कुठंच काय न्हाय, पर तू असा येड्यागत का विचारत सुटला मला ? जरा सांग तरी काय झाला ते "
"काही नाही ओ नाना असच सहज विचारलं, आणि .. माझ्या एका मित्रच नाव पण केतन च आहे म्हणून ... ", दिगू नाना ला आत्ताच खरं सांगणं त्याने टाळलं.
"एवढंच ना चाल आता थोड्या वेळात हे पोरं माघारी येतीलच तुला माझ्या भाच्याला केतन ला भेट घालून देतो म्हंजी बस? " दिगू नाना हसत म्हणाला.
"नक्की भेटवा " जयेश काही तरी निर्धार करून बोलला. त्याने मुद्दाम दिगु नाना ला सगळी माहिती सांगितली नाही. त्याला आधी केतन ला पकडायचं होत. आणि तो आयता चालून त्याच्याच गावात आलेला होता.
त्याला आता कळलं कि केतन तेव्हा खोटंच बोलला कि त्याच्या मामाच्या फार्महाउस वर आपण चाललो असं, कारण दिगु नानाची तर तिकडे शेतीच नाहीये फक्त आपल्या गावातच आहे.
केतन ला आज इकडे यायचं होत म्हणून हाच धागा पकडून तो आपल्याशी मामाचं नाव सांगून खोट बोलला असेल. जाऊ दे जे काय झालं ते आपण वाचलो आता आकाश च बघावं लागेल आणि चंदू ? अचानक त्याला चंदू ला फोन करण्याचं आठवलं त्याचा चंदूशी अजून संपर्क झाला नव्हता. त्याने चंदूशी बोलायला फोन बाहेर काढला पण दिगू नाना समोर होता, पण ऐकू देत दिगू नाना ला म्हणून त्याने चंदू ला फोन केलाच.
"नाना एकच मिनिट हा एका मित्राला फोन करतो"
"व्हय व्हय काय घाई न्हाय", दिगू नाना बोलला.
चार रिंग वाजल्यावर तिकडून फोन उचलला गेला .
"हॅलो", चंदू चाआवाज ऐकताच जयेश कडाडला.
"अरे चंद्या तुला अक्कल आहे का रे बिनडोक"
"काय रे काय झालं ?"
"अरे मी तुला कालपासून फोन करतोय तू कसा आहे कुठे आहे विचारायला आणि मिस्ड कॉल बघून फोन सुद्धा करत नाहीस का तू ?" जयेश काळजीपोटी चिडून बोलत होता. हे चंदू ला माहित असल्यामुळे तो खूप शांतपणे बोलू लागला.
"अरे जयेश, मी तुला काळ रात्रीच फोन केला होता, पण तुझा फोन बंद होता "
जयेश ला लक्षात आलं रात्री शेतात झोपल्यामुळे फोन चार्जिंग केला नव्हता. मग तो शांत झाला.
"अरे हो पण मी सकाळी तुला कॉल केला होता ना ?"
"हो रे बाबा त्यासाठी सॉरी कारण इकडे नवली मध्ये नेटवर्क नसत चांगलं म्हणून फोन लागत नाही"
"म्हणजे तू अजून तिथेच आहेस ?" जयेश ने विचारलं.
"हो, पण आता निघालोय शहरात यायला " चंदू बोलला.
" पण तू आत्ता कुठे आहेस मग?"
"मी आता फाट्यावर आलोय इथून बस पकडून शहरात येईल, बर ते जाऊदे तू कुठे आहेस आणि आकाश चा काही पत्ता लागला का ?"
"मी तुला सगळं सांगतो पण माझं एक, तू आता आपल्या रूम वर नको जाऊस "
"का रे काय झालं ?"
"समजून घे , ते तिथे येऊ शकतात "
"कस शक्य आहे ? त्यांना आपली रूम कशी माहित असेल ?" चंदू बोलला.
"कारण ते आता माझ्या गावात आहेत", हे वाक्य जयेश दिगु नाना पासून लांब जाऊन बोलला. पण तिकडं चंद्रकांत मात्र ताड्कन उडाला.
"अरे बाप रे मग आता"
"काही नाही मी त्यांना धरणार आहे गावातच माझ्या लोकांच्या मदतीने, आणि अजून आकाश ची बॉडी सापडली नाहीये आणि मी पोलिसांना इन्फॉर्म केलं गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा माहिती पोचलीये पण मला अजून पोलिसांचा फोन सुद्धा नाही आला "
"अरे बाप रे खूप प्रॉब्लेम झालेत यार"
"हो ना बर मी काय म्हणतो मी चार दिवस सुट्ट्या टाकतोय ऑफिस ला आत्ता ई-मेल करतो मोबाईल वरून तू पण सुट्ट्या घे आणि इकडे माझ्या गावी ये रूम वर नको जाऊस"
"अरे पण तिथे माझे डॉक्युमेंट्स, काही कपडे आहेत " चंदू बोलला.
"ते सगळं मी माझ्या बॅग मध्ये भरून आणलय माझ्या सोबत तू काळजी नको करू"
हे एकूण चंदू खुश झाला. "बर मग मी रात्री पर्यंत येतो तिकडे पण तालुक्याच्या स्टेशनला मला घ्यायला येशील नऊ वाजेला, कारण रात्री ग्रामीण भागात गाड्या नाही भेटत."
"हो चालेल, पण कोणाला दिसू नकोस सरळ इकडे ये " एवढं बोलून जयेश ने फोन कट केला.
"चला नाना जाऊया घराकडे "
आता जयेशची मोटरसायकल परतीला गावाच्या दिशेने धावत होती
जयेश गाडी चालवत होता मागे दिगू नाना बसले होते, त्यांच्या मोठ्या पिशव्या गाडीला अडकविलेल्या होता. साडे चार वाजले होते जयेश ला चार तासांनी परत तालुक्याला यायचं होतं . तालुक्याच्या गावापासून त्याचं गाव नऊ दहा किलोमीटर असेल. जयेश गाईड चालवितांना विचार करू लागला, हा केतन आज इकडे माझ्या गावात आलाय हा ठरवून आला कि चुकून आला ? दिगू नाना त्यांना सामील तर नसेल ना ? त्याला गादीवर पाठीमागे बसलेला दिगू नाना आपल्याला हसतोय असं उगीचच वाटलं .

मनातून जयेश अत्यंत खुश होता, कारण तो आता केतन ला त्याच्याच गावात धरणार होता आकाशाचा खुनी आणि त्याच्या मागावर असलेल्या केतन . त्याच्या नजरेसमोर केतनच्या प्रतिमा येऊ लागली मोठे मोठे कपाळावर येणारे केस बारीक डोळे गोरा वर्ण आणि फोनवर बोलतांना एका विशिष्ट पद्धतीने हात हलवायची लकब. आधी चांगला वाटणारा केतन त्यांच्या म्हणजे जयेश चंदू आणि आकाशच्या आयुष्यतील खलनायक ठरला होता. आणि आज त्याला गाठायची संधी मिळाली होती. सुदैवाने काही तासांत चंदू देखील त्याच्या गावात येणार होता. त्यामुले आता केतनचं काही खरं नाही असं मनोमन समजून जयेश खूप खुश होता.
तो त्याच्याच विचारात असतांना गादीवर मागे बसलेल्या दिगू नानाने त्याला अजिबात डिस्टर्ब नाही केलं.
आता गाडी गावात प्रवेश करत होती, हळू हळू एक एक गल्ली ओलांडत गाडी पुढे सरकत होती, दिगुनानाच घर आलं तस जयेशने त्याची बाईक थांबवली.
"नाना मला भेटवा केतन ला मग आल्याबरोबर मला असं वाटतं आणि हो त्याला माझा नाव नका सांगू त्याला सरप्राईझ द्यायचंय
"सर.... पाईज... हे काय अस्त ब्वा ? "
"अहो नाना म्हणजे गम्मत आहे ती अचानक न सांगता भेटायचं असं कारण आम्ही ओळखतो एकमेकांना"
"अस्स असं ठीकाय जया, तो आला रे आला कि मी तुला गुपचूप येऊन सांगतो मग", दिगू नाना भाबडेपणाने बोलला "
हो हो म्हणत जयेश गाडी स्टार्ट करून घराकडे निघाला.


सूर्य मावळला होता. पाखरे घराकडे पोचली होती. गाई गुरे गोठयात परतून आता निवांत रवंथ करत बसली होती.
चंदू ची ट्रेन जयेशच्या गावाच्या दिशेने धडधडत धावत होती, त्यालाही कधी तिथे पोचतो असं झालं होत कारण शहरापेक्षा गावात सुरक्षित वातावरण होतं . गावात दोन माणसांमध्ये भांडण लागलं तरी आवरायला अख्खा गाव धावून येतो , पण शहरात तस नसत लोक फक्त दुरून तमाशा बघतात. चंदू विचार करत होता.
ते मूलं जयेशच्या गावात नक्कीच जयेशचा पाठलाग करत आले असतील. त्याने घड्याळात बघितलं तर साडे आठ वाजले होते आता जयेशच्या गावाजवळ असलेले तालुक्याचं स्टेशन जवळ आलं होतं. त्याने जयेशला घ्यायला बोलावलं होतं तो कुठपर्यंत आहे म्हणून त्याने मोबाइलवरून फोन लावला.
"हॅलो"
"हा चंदू बोल पोहचला का तू ?"
"हो गाडी स्टेशनजवळ आलीये तू कुठे आहेस "
"अरे मी स्टेशन च्या बाहेरच उभा आहे ये तू"
"ओके ओके " असं म्हणत त्याने फोन ठेवला.
इकडे बाहेर जयेश त्याची वाट बघत उभाच होता. जयेशच्या मनात घालमेल चालली होती, कि केतन त्याच्या हातातून नको सुटायला. एक तर रात्रीची वेळ आणि तालुक्यातून परत आठ नऊ किलोमीटर अंतरावर गावाकडे जाईपर्यंत केतन आणि त्याचे मित्र निघून नको जायला . किंवा दिगू नाना ने चुकून आपलं नाव सांगितलं तर तो पळून नको जायला असं सगळं त्याच्या डोक्यात चालू असतानाच चंदू स्टेशन मधून बाहेर आला.
दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली , अगदी कालपर्यंत सोबत असणारे मित्र असे भेटत होते जसे कि खूप दिवसांनी भेटत आहेत, कारण हि काळजीची भेट होती, दोघे मोठ्या संकटातून निभावून आले होते.

"चंदू चाल पटकन बस गादीवर ते निघून नको जायला ते जर कादिगू नानाच्या शेतात मुक्कामाला निघून गेले तर आपल्याला खूप अवघड जाईल त्यांना गाठायला आणि धडा शिकवायला कारण रात्रीच शेतांकडे कोणी नसतं, आणि ते शेतातच मुक्काम करणार आहेत गावात दिगू नानाच्या घरी फक्त काही मिनिटांसाठी थांबणार आहेत"
असं म्हणताच चंदू ने जयेशकडून बाईक ची चावी घेतली आणि तो गाडी चालवू लागला.जयेश चंदू ची बॅग धरून मागे बसला होता. ग्रामीण भाग व त्यातल्या त्यात रात्र झाल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती . रस्त्याच्या दुतर्फा असणारी मोठमोठाली झाडे अंधारात राक्षसांसारखी भासत होती. जणू काही दोन्ही बाजून मोठमोठे राक्षस खाली वाकून जाणाऱ्या बाकीकडेच बघत असावेत. मोटरसायकल च्या उजेडात पुढचा रस्ता प्रकाशमान व्हायचा पण मागे वळून पाहिलं तर तो भीतीदायक अंधार खायला उठायचा. पावसाचे दिवस असल्यामुळे हवेत गारवा होता. निरव शांततेत फक्त यांची बाईक आवाज करत चालली होती.
"चंदू काय रे काय करायचं ह्या केतनचं त्याला पकडल्यावर ? मार तर तो खाणारच नक्की पण पोलिसात द्यायचं का ? आणि काय सांगायचं ?"
जयेश ती शांतता तोडत बोलला.
"पोलिसात द्यायलाच पहिले साल्याला आणि त्या बाकीच्या मुलांना आणि मुलींना पण देऊ"
"अरे पण इथे फक्त तीन चार मुलं आहेत त्या बसमध्ये मुली नाहीयेत"
"अरे असं कस ?" चंदू ओरडला .
"ठीक आहे ना हे भेटले कि त्या मुलींना पण शोधता येईल , खूप जोर करत होत्या साल्या बस मध्ये आपल्यावर " जयेश बोलला.
"हो रे आधी त्याला पकडू तर दे " जयेश बोलला. बोलण्याबोलण्यात जयेश ने गावाकडे आल्यापासूनच सगळं घटनाक्रम चंदू ला सांगितला. ते एकूण चंदू बोलला ,"जयेश त्यांना खूप ठेचायच गावात आधी आपण सगळं माज जिरवायचा त्यांचा" चंदू रागात बोलला. यावर जयेश फक्त हो म्हटला.
त्यांच्या बोलण्याबोलण्यात गाव कधी आला कळलंच नाही.
आता त्यांची बाईक गावात शिरली होती एकामागून एक गल्ल्या ओलांडत ते पुढे चालले होते .
रस्त्यावरचे ग्रामपंचायत ने लावलेले दिवे नीटसा प्रकाश देत होते त्यांच्या मधून यांची बाईक दिमाखात हळू हळू चालली होती.
आता दोन गल्ल्या ओलांडून दिगू नानाची गल्ली होती , दिगू नाना ची गल्ली आली तसा चंदू ओरडला,
" जयेश बघ हि बस तीच आहे का ?"
"हो हो चंदू हीच बस आहे ती " जयेश जोरात ओरडला "घे गाडी तिकडे"
तोच त्यांना गाडीच्या प्रकाशात दिसलं कि त्या बसमधून तीन चार मुलं उतरतांना दिसले, म्हणजे ती बस आत्ताच आली होती तर.
चंदू ने हेडलाईट च्या प्रकाशात बस ची नंबर प्लेट फाईली बरोबर तीच बस होती पाठीमागचे त्या बसवर हत्तीचं असलेलं चित्र देखील त्याने ओळखलं.
पण बसचा आडोसा असल्याने त्या मुलांचे चेहरे यांना नीट बघता आले नाहीत. तोच त्यांना घरातून दिगू नाना बाहेर पडतांना दिसले. दोघेही लांबूनच बघत होते. त्याने गाडीचा त्याने गाडीचा हेडलाईट बंद केला. दिगुनाना चा पंधरा वर्षाचा मुलगा दीपक हळू हळू मुख्य गल्ली कडे येत होते. अंधारात ते जयेशच्या गल्लीकडे जायला लागणार तोच त्यांना जयेशने आवाज दिला
"दीपक "
"जयेशदादा बरे झालं इथंच भेटलास "
"का रे ? काय झालं ?"
"नानांनी तुला गुपचूप बोलवायला पाठविला मला " दीपक बोलला.
आले का ते मुलं ?" जयेशने मुद्दाम असं विचारलं. चंदू गुपचूप गम्मत बघत होता.
"हो आत्ताच आले बस घेऊन ते लगेच शेताकडं जाणार आहेत " दीपक बोलला
जयेशच्या आणि चंदूचा गावात पोचण्याची वेळ अचूक होती तर बरोबर वेळेवर ते गावात आले होते.
"बर बर " एवढं म्हणत तिथेच मुख्य गल्लीत गाडी लावून ते मिणमिणत्या प्रकाशात दिगुनानाच्या घराकडे जाऊ लागलेत.
दिगू नानाच्या अंगणात मोठा दिवा चालू होता. शेजारीच त्यांची सायकल लावलेली होती. बाजूला बैलगाडी उभी होती.
दारात पोचल्याबरोबर जयेशने आवाज दिला,"येऊ का नाना ?". त्याला अपेक्षित होत कि त्याच्या आवाजाने ते मूलं दचकून त्याच्याकडे बघतील पण असं काही झालं नाही ते मुलं मधल्या खोलीत बसले होते.
चंदू मनात त्यांची नावं आठवू लागला, एक केतन, दुसरा अक्षय, तिसरा मोन्या मोन्या म्हणायचे त्याला पण त्याचं नाव काही आठवत नव्हतं त्यांचे नावं जरी आठवत नसले पण चेहरे मात्र जयेश आणि चंदू कधीच विसरू शकणार नव्हते.
"येरे जया ये ते बघ मधल्या खोलीत बसलाय माझा भाचा केतन कर त्याला तुमचं सर पैज का काय ते" दिगू नाना हसत बोलले.
तो पर्यंत मधल्या मुलांच्या गप्पा रंगात आलेल्या होत्या.
जयेश आणि चंदू मधल्या खोलीकडे जाऊ लागले तसतशी ह्रदयात धडधड वाढू लागली. त्यांना कस सामोरं जायचं काय करायचं सगळं ते विसरून गेले होते पण कानाच्या शिरा तापल्या होत्या. जयेश चा चेहरा लालबुंद झाला होता. चंदूला भीती व रागाने घाम सुटला होता. त्यांना राहून राहून बसमधला त्यांचा प्रवास आठवत होता जयेशच्या कानात आकाशचा खून झालाय हे शब्द फिरत होते. आपण वाचलो पण हे आपला पाठलाग करत इथपर्यंत आलेत साले हरामखोर असं मनाशी म्हणत जयेश पुढे गेला.
दोघेही मधल्या खोलीत पोचले सगळे मुलं मागच्या खिडकीतून काहीतरी बाहेर बघत होते त्यामुळे हे दोघे तिंथे आले हे त्यांच्या गावीही नव्हतं.
जयेश ने रागमिश्रित दरडावून आवाज दिला , "केतन.. "
"काय?" त्यांच्यातील एका मुलाची नैसर्गिक प्रतिक्रिया आली आणि त्याने मागे वळून दोघांकडे पाहिलं. त्याच्यापाठोपाठ बाकीच्या मुलांनी देखील मन वळविली व यांच्याकडे बघू लागले.
इकडे जयेश आणि चंदू मात्र तोंडात मारल्यासारखे चूप उभे राहिले कारण ..? .... ज्या मुलांनी त्यांना मारायचा कट केला कुठेतरी नेऊन त्यांना मारणार होते , ज्यांनी आकाश चा खून केला त्या मुलांपैकी समोर एकही नव्हता . समोर उभे असलेले चारही मुलं अनोळखी होते.
केतन सुद्धा दुसराच कोणीतरी होता . बस तीच होती बस चा नंबर तोच होता , जयेशने पाहिलेलं बस मधलं झुंबर तेच होतं , त्यांनी अर्धवट खाल्लेलं वेफर्स च पाकिटही तेच होत. चंदू ने पाठीमागून बस वर असलेलं हत्तीचं चिन्ह सुद्धा तेच होतं . इतकंच काय केतन सुद्धा होता बससोबत पण हे ते मुलं नव्हते. ना हे मुलं जयेश आणि चंदूला ओळखत होते ना जयेश आणि चंदू ह्या दोघांना ओळखत होते . पाठलाग तर झाला पण खेळाडू बदलले कि काय ? पण दिगू नाना तो का खोट बोलेल काही कळायला मार्ग नव्हता. पण जीवाला धोका तर अजूनही होता , पण आता पाचजणांच्या.


क्रमशः





Comments

Popular posts from this blog

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ५

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ७

पाठलाग भाग 1 (मराठी भयकथा )