पाठलाग (मराठी भयकथा) भाग २

 काळ्या ढगांनी आभाळ व्यापलं होत, आणि त्यांचं वरून पाणी ओतण्याचं काम अव्याहत चालू होतं. त्याचवेळी किंचित अंधारून देखील आलं होतं. ज्या प्रमाणे काळे ढग पाऊस पडण्याआधी जमा होऊन लवकरच येऊ घातलेल्या पावसाची पूर्वसूचना देतात, त्याच प्रमाणे माणसांना देखील येणाऱ्या संकटांची चाहूल कळत गेली तर किती बरं होईल सगळे आधीच संकटाशी दोन हात करायला तरी तयार होतील किंवा इतर मार्ग तरी शोधतील पण दुर्दैवाने तसं होत नाही.
ढगांनी आता आणखी जोराने आभाळातून धरणीवर पाणी ओतायला सुरुवात केली होती. जणू काही ढग कोणावर राग काढत आहेत असा पाऊस कोसळत होता. हा पाऊस कोणासाठी रम्य, कोणासाठी उपयोगी , तर कोणासाठी त्रासदायक होता.
एव्हाना बस शहरापासून बर्यापैकी लांब आणि आता आसरी घाटाच्या अलीकडे आली होती.

बसमध्ये बसलेले सर्वजण मात्र या पावसाने खुश झाले.

अजून त्यांच्या ट्रिप च्या ठिकाणी पोहोचायला खूप अवकाश होता, आधी आसरी घाट ओलांडायचा मग पुढे गेल्यावर नवली फाटा मग तिथून उजवीकडे वळून ४ किलोमीटर वर नवली गाव आणि त्याच रस्त्याने पुढे चाळीस किलोमीटर वर धबधबे, बॅकवॉटर्स , डोंगरांच्या कुशीत केतनच्या मामा च फार्म हाऊस होतं.  
  बाहेर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सगळ्यांच्या अंगावर रोमांच आलं होतं, आणि सगळ्यांना भूक देखील लागली.
"जयेश आकाश ला सांग न प्लिज कुठेतरी चांगलं हॉटेल बघून बस थांबवायला खूप भूक लागलीय पावसात मस्त गरमगरम काहीतरी खावंसं वाटतंय" त्या सहा मुलींपैकी एक जयेश ला बोलली.
नवीनच ओळख असल्यामुळे जयेश तिचं नावदेखील एवढ्यात विसरला होता.
"हो हो प्लिज गाडी कुठेतरी चांगल्या हॉटेलला किंवा ढाब्यावर थांबवायला सांग, खूप भूक लागलीय", चंदू देखील बोलला त्यात इतरांनीही सूर मिसळला.
"अरे इथेच आसरी घाटाच्या अलीकडे एक हॉटेल आहे, खूप छान आणि मोठं आहे आपण तिथेच जाऊया", त्यांच्यातील तीन तरुणांपैकी एक केतन ओरडला.
हा सगळा गोंधळ बस चालविणाऱ्या आकाश पर्यंत पोचलाच होता, तोच तिकडून जोरात ओरडला,"अरे हो हो केतन नाव सांग हॉटेलचं"
"हॉटेल विसावा, आहे बघ ते समोर दिसतंय"तोच मुलगा पुन्हा आकाश ला बोलला.
आकाशने मोठ्या शिताफीने भर पावसात बस हॉटेल विसावा कडे वळवली आणि हॉटेलच्या मुख्य इमारती च्या अगदी जवळ नेऊन उभी केली म्हणजे जास्त पावसात न भिजता पटकन आत जाता येईल.
घुरर घुरर आवाज करत बसचं इंजिन आकाशने बंद केलं, तोपर्यंत सगळे पटापट बाहेर आले. खूप सुरेख अस हॉटेल होतं ते. सगळ्यांनी आपापल्या आवडीच्या डिशेस ऑर्डर केल्या. खाऊन झाल्यावर कोणी वॉशरूम ला कोणी कुठे असे पांगले होते.
आकाश देखील वॉशरूम कडे एकटाच गेला, हॉटेल मधल्या रेस्टॉरंट पासून वॉशरूमकडे जाणार कॉरिडॉर थोडा विचित्र असा शांत होता. जणू काही त्याने खूप काही अनुभवलंय.
आकाश टकटक शूज वाजवत वॉशरूम मध्ये घुसला आपला कार्यभाग उरकून निघत असताना त्याला भिंतीपलीकडे असणाऱ्या वॉशरूम मधून मुलींचा आवाज ऐकू येऊ लागला, मुळातच स्त्रीलंपट असणारा आकाश त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी लाळ गाळत तिथेच थांबला.
"आज रात्रीच सगळं करायचं का मग ?" एक मुलगी बोलली
"आज रात्री ? जमलं तर रस्त्यातच बसमध्ये सगळ पार पाडायचंय आपल्याला" तिला दुसरीने उत्तर दिलं.
हे ऐकून राकेश गालातल्या गालात हसला. पण पुढच्याच वाक्याला त्याचा भ्रमाचा भोपळा फुटला.
जेव्हा तिसरी मुलगी म्हणाली ,
"अगं पण तिघांना आजच मारायचं का? खूप जास्त अवघड होईल ना?"

इतक्यात आणखी एक मुलगी बोलु लागली, "फार्म हाऊस ला जाऊ आपण शक्यतो तिथेच सगळं काम पार पाडू, पण काही कारणाने आऊट ऑफ कंट्रोल वाटलं तर फार्म हाऊस च्या आधी बस मधेच काम करू तिघांचं "
ती अस म्हणताच बाकीच्या मुली खळखळून हसल्या. त्यांचं ते हसणं आकाश ला उगाचच भेसूर वाटलं.
सगळ्या मुलींचा हसण्याचा आवाज ऐकून आकाश घामाघूम झाला त्याला काही सुचेना झालं.
म्हणजे सगळ्या मुली मिळून काहीतरी क्रूर प्लॅन केलेला होता पण तिघांना मारायचं... .. बसमध्ये किंवा फार्म हाऊसवर. ... तो सगळं जुळवायचा प्रयत्न करू लागला.

तिघे म्हणजे कोण ? ऑफिस मधले तिघे की जयेश, चंदू अन मी ? की अजून कोणी आहे ? ते नक्की माणसांबद्दलच बोलताय की कोंबड्या बकऱ्या बद्दल हे सुद्धा त्याला कळत नव्हतं. पण एखाद्या जनावराला कोणी मारेल तर त्याचा इतका विचार का करेल? आणि ते देखील मुली तीन तीन प्राणी मारणं कस शक्य आहे ? शिवाय बस मध्ये मारायला कोंबडी वैगेरे असलं काही सोबत बस मध्ये घेतलं नाहीये, मग ह्या कोणाला मारणार आहेत? ह्या तर एवढ्या क्रूर वाटत नाहीत. तो विचार करत करत त्याच्याही नकळत बसकडे आला आणि ड्रायव्हर सीट वर जाऊन बसला. त्याला मागून जयेश आणि चंदू भयभीत अवस्थेत घाईघाईने येतांना दिसले. ते पटकन बसमध्ये चढले.
"आक्या हरामखोर कुठं फसवलं आम्हाला? " जयेश त्याला ओरडला.
"क ..का.. काय झालं?"
चंदू पुढं बोलू लागला,"अरे आम्ही त्या तीन मुलांना बोलतांना ऐकलं"
"काय बोलताना ऐकलं?", आकाश आता सावध झाला होता.
"अरे आक्या ते आपल्याला मारून टाकणार आहेत आणि आपल्या शरीराचं काहीतरी करणार आहेत. भाडxx खरं सांग हे नक्की तुझ्या ऑफिस चे आहेत ना? की कोणी बाहेर चे?" चंदू चिडून बोलला.
"अरे ते माझ्या ऑफिसचेच आहेत पण मला माहित नाही रे हे लोकं कसे आहेत खरं सांगतो",आकाश रडायला आला होता.
"अरे पण तू का रडतोय?",जयेशने चिडून विचारलं.
"अरे तुम्ही काय ऐकलं मला माहीत नाही पण मी त्या मुलींना सुद्धा असच काहीतरी बोलतांना ऐकलं. ते काहीतरी तिघांना मारण्याचं कारस्थान करत होत्या पण तिघे म्हणजे कोण हे मला कळलं नाही ", आकाश घामाघूम होऊन बोलत होता.
"अरे बैला, ते तिघे आपण आहोत, आणि हा ढाबा त्यांच्या ओळखीचा आहे इथे सगळे त्यांच्या ओळखीचे आहेत",जयेश रागाने ओरडून आकाश ला बोलला.
"म्हणजे?", आकाशने चिंताग्रस्त होऊन विचारलं.
"अरे, मी त्या तिघांपैकी एक मुलाला हॉटेल मालकाच्या केबिन बोलतांना ऐकलं, मला खिडकीतून तुझ्या ऑफिसच्या त्या मुलाचा आवाज ऐकू आला." जयेश पुढे सांगू लागला, "तो काय बोलला मला पूर्ण कळलं नाही पण, नवीन तीन मुलं आहेत... आणि .. आज रात्री फार्महाऊसवर... आणि नाहीच शक्य झालं तर बस मधेच काम करू " अस बोलत हॉटेल मालकाने आणि त्याने एकमेकांना टाळी दिली".
त्यावर तो हॉटेल मालक म्हटला, हे भारी केलं की एकाचवेळी तीन मुलं आणले, पण सगळं  साहित्य घेतलं का?"
यावर त्या तुझ्या ऑफिस च्या मुलाने त्याला सांगितलं, ही बघ बॅग रेडी आहे माझी आणि असं बोलून तो ती मोठी बॅग घेऊन तो केबिन च्या बाहेर आला.
मला काही कळायच्या आत तो माझ्या समोर येऊन उभा राहिला, आणि मलाच थोड्याश्या रागानेच  विचारु लागला की इथे काय करतोय म्हणून, पण तेवढ्यात तुझ्या ऑफिसचा दुसरा आणि तिसरा मुलगा आला त्यांनी त्याला खुणावले आणि माझ्या पासून जर लांब नेलं. पण मी त्यांचं बोलणं ऐकलं हे त्याला कळलं आहे",

जयेश एका दमात सगळं बोलून श्वास घ्यायला थांबला.

आता आकाश, जयेश अन चंदू तिघेही पळून परत जायचा विचार करणार तोच तिकडून तेच तीन मूलं आणि सहा मुली हसत खिदळत बसच्या जवळ आले आणि बसमध्ये बसले.यावेळी त्यांच्याकडे तीन नवीन मोठ्या बॅग होत्या , मात्र तिघांपैकी एकालाही त्या बॅग बद्दल विचारायची हिम्मत झाली नाही.

सगळेजण येऊन बस मध्ये बसले पण आता बसण्याची जागा बदलली होती बसमध्ये पाहिल्या सीटवर जयेश आणि चंदू बसले होते तर बाकी सगळे मुलं मुली बसमध्ये मागे जाऊन बसले. आकाश, जयेश आणि चंदू यांचे हावभाव बहुदा त्यांनी टिपले असावेत कारण त्यांच्या वागण्या बोलण्यात आता यांच्याविषयीचा वेगळाच पण कुत्सित असा दृष्टिकोन दिसून येत होता.
हे तिघे मित्र सोडून बाकी सगळे हसत खिदळत होते, आणू हे तिघे तोंडावर भीतीयुक्त प्रश्नचिन्ह घेऊन बसले.
"आकाश काढ ना बाबा आता बस, की इथेच मुक्काम करायचाय?"
मागून हुकमी कडक आवाज आला तशी आकाश ने बस स्टार्ट केली. बस च इंजिन घुरघुरत नाही तर थरथरतंय असं आकाशला वाटलं.
बाहेर पाऊस थांबला होता, वातावरण मनोहारी झालेलं होत. अशात हॉटेल बाहेरच्या चिखलात खाली चाकाची निशाणी सोडत बस हळू हळू पुढे निघाली. मुख्य हायवेला लागून डावीकडे आसरी घाटाच्या दिशेने निघाली.
आता बस आसरी घाट चढत होती,

पाऊस थांबल्यामुळे आसरी घाटातील निसर्ग सौंदर्य आता स्पष्ट अनुभवता येत होतं. उंच उंच डोंगररांगा त्यातील अवाढव्य जिराफाच्या माने सारखे भासणारे उंच सुळके, हिरवीगार झाडी लुसलुशीत गवत, काळं कुळकुळीत कातळ, डोंगरांचे कडे सगळं काही नुकत्याच साज शृंगार करून बसलेल्या नवरीसारखं सुंदर भासत होतं.
"जयेश, चंदू तुम्ही मरायला घाबरत का रे ", मागून एक मुलगा दोघांना छेडत बोलला.
यांनी काही बोलायच्या आधीच दुसरा एक चष्मीश मुलगा बोलू लागला,"ए काहीपण काय? मरणाला कोण नाही घाबरत फक्त आत्ता ताबडतोब मरण आलं तर नको बाबा"
यावर तेच सर्वजण फक्त हसले, हे तिघे चूप होते. 

सकाळ कधीचीच गेलं होती  आता उन्हाची किरणं तापायला लागली होती, आसरी घाटातून गेलेला चकचकीत राष्ट्रीय महामार्ग मात्र आता धुकं विरल्यामळे त्याच्याच दिमाखात वळणं घेत घाटातल्या त्या दाट झाडींमधून एखाद्या चपळ सापासारखा धावत गेलेला दिसत होता. हिरव्यागार झाडींमध्ये आणि दोन्हीबाजूला लांबवर असलेल्या उंच उंच टेकड्या आणि धुक्यामुळे तो खूप मनमोहक भासत होता.झाडांमधील पक्षी किलबिल करत या झाडांवरून त्या झाडांवर फिरत होते. याच सर्व मनमोहक वातावरणातून यांची खाजगी बस महामार्गांवरुन धावत चालली होती. बाहेरील घाटाचं वातावरण मनमोहक असलं तरी बसमधील वातावरण आता तसं नव्हतं. आकाश,जयेश, आणि आणि चंदू हे तिघेही भेदरलेल्या अवस्थेत त्या बस मध्ये बसलेले होते. भयभीत झालेले फक्त हे तिघेच होते . "साला कुठून बुद्धी सुचली आणि ह्या आक्याच्या नादी लागलो आणि वाट लावून घेतली ", चंदू हळूच कुजबुजला.
"वाट लावून घेतली? नुसती वाट नाही लावली आता घरी जिवंत परत जाण्याची शक्यता नाहीये आपली." जयेश थोड्या मोठ्याने पण इतरांना ऐकू जाणार नाही अशा आवाजात बोलला.
इतक्यात मागून एका तरुणीचा लाडिक आवाज आला,
"काय रे जयेश काय झालं? काही बोललास का ? आम्हाला सांग ना"
जयेश गोंधळला, तो काही उत्तर द्यायच्या आधीच मागून सगळ्याच मुलींचा हसण्याचा आवाज आला.

तो हसण्याचा आवाज मधुर भासत असला तरी जयेश अन चंदूचा थरकाप उडवणारा होता.

त्यांना आपली कुजबुज कळली तर बसमध्येच काहीतरी व्हायचं म्हणून परत दोघे शांत बसले.
पुढे आकाश गाडी चालवतांना विचार करत होता कि आपण कोणत्या परिस्थितीमध्ये येऊन फ़सलोय. या मुलं मुलींना तर मी चांगलं समजत होतो पण हे तर वेगळेच निघाले. आजवर आयुष्यात मुत्सद्देगिरीने वागत आलेला आणि जिंकत आलेला आकाश आज यांना ओळखण्यात अपयशी ठरला होता.
पुढे आकाश आणि मागे जयेश व चंदू संधी मिळताच कसं बसमधून बाहेर पडून पळ काढायचा हाच विचार करत होते. मधून मधून ते मूळ मुली यांना डिवचायचा प्रयत्न करत होते पण हे मस्करी केल्यासारखं करून वेळ मारून नेत होते .
कसंही करून बसच्या बाहेर पडायचंच हा विचार करत असतांना बस नवली फाट्याला पोचली. फाट्यावर फारसं कोणी नव्हतं, सराईत बसचालकाप्रमाणे आकाशने बस तिथून उजवीकडे वळवली. हे बघून मात्र चंदू आणि जयेश चा पारा चढला होता, कारण त्यांच्या मते हायवे ला असे पर्यंत ते सुरक्षित होते त्यामुळे आकाश ने बस हायवेवरच उभी करायला हवी होती. पण भीतीपोटी आकाशला काही सुचत नव्हतं त्यामुळे तो ट्रिप च्या ठिकाणाकडे बस घेऊन निघाला होता.
"आकाश ए आकाश बस थांबावं ", चंदू ओरडला. तसे सगळे चंदूकडे बघायला लागले मागून दोन मुलं ताड ताड पुढे आले.
" काय झालं ?, बस का थांबवली? " त्या मुलाने विचारलं.
"काही नाही रे ",असं म्हणत चंदू ने त्याला करंगळी दाखवली.
"हा हा चल मी पण येतो मला पण सुसु आलीये ", असं म्हणत तो देखील त्याच्यासोबत उतरला.
चंदूचा प्लॅन फसला हे बघून जयेश जागेवरच बसून राहिला.
थोड्याच वेळात ते परत बस मध्ये आले आणि पुन्हा बस निघाली.
काही अंतरावर असणार नवली गाव ओलांडून आता बस पुढे निघाली होती. यापुढे रस्त्याला आता एकही मोठं गाव लागणार नव्हतं, लागलंच तर आदिवासींचा पाडा वैगेरे त्यामुळे आता तिघांची चिंता वाढली होती. त्यातल्या त्यात डोंगराळ भागातले सुनसान रस्ते जास्तच भीती घालत होते कारण वातावरण पूर्ण प्रतिकूल होतं.
ते मूलं मुली आता यांच्याशी गप्पा मारण्यात इंटरेस्टेड नव्हते, ते त्यांच्या त्यांच्यातच बोलत होते.
इतक्यात त्यांच्यातील एक केतन चा मोबाईल खणखणला.
"हॅलो, बोल मामा... "
"क .. काय? ... अरे ... मग ... "
"परत जावं लागेल ?... "
सगळेच जण त्याचं बोलणं कां देऊन ऐकत होते, कारण ट्रिप त्याच्या मामाच्या फार्महाउस ला जाणार होती आणि त्याच मामाचा फोन आलेला होता.

त्यांच्यातला चष्मीश मुलगा थोडासा चिडलेला दिसत होता. फोन ठेवताच त्याने केतनला विचारलं,
"काय रे काय झालं?"
"अरे मामाचा फोन होता, माथ्यावर खूप जोराचा पाऊस झाला आहे त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडले आहेत, पुढे दोन किलोमीटरवरच्या पुढे पाणीच पाणी आहे नदीचं आपण ओलांडून जाऊच शकत नाही "
"क ... का ... काय ? असं कस झालं यार ", एक बारकी उंच मुलगी चिडत बोलली.
"ते माहित नाही पण आपल्याला इथूनच परत फिरावं लागेल",केतन चिडून ओरडून बोलला.
"म्हणून काय झालं? आपण आपला एन्जॉय करणारच", तिसरा मुलगा ओरडला.
"पण आता इथून तर परत फिरावंच लागेल" केतन बोलला.
केतनचं हे वाक्य एकूण जयेश, चंदू आणि राकेश तिघेही मनातून आनंदले होते, त्यांचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
छोटा रस्ता असल्यामुळे बस पूर्ण उलटी वळवणं शक्यच नव्हतं म्हणून आकाश पुढे कुठे मोठा रस्ता किंवा जोडरस्ता येतो का बघत बस पुढे नेत होता.
तिघांच्या सुदैवाने लवकरच एक चौफुली लागली आणि तिथे दोन चार जण एस टी बस ची वाट बघत उभे होते.
आकाश ने बस हळू केली आधी एका बाजूला पूर्ण नेली व रिव्हर्स मध्ये टाकून हळू हळू बाजूच्या रस्त्याकडे नेली. बसचा कमी झालेलं स्पीड आणि खाली असणारे चार लोकं , हि जयेश ला योग्य संधी वाटली त्यांने चंदू ला खुणावलं आणि तो घाईघाईत पुढे असलेल्या बसच्या दाराकडे गेला, त्यापाठोपाठ मागून दोन तीन मुली घाईघाईत उठल्या
"काय झालं जयेश ? कुठे चाललास ?", त्या जवळजवळ किंचाळल्याच.
पण दुर्दैवाने आकाशला काही कल्पना नसल्यामुळे त्याने बस जोरात भर्रकन वळवली आणि परतीच्या मुख्य रस्त्याला लावली. आता अचानक बसचा वेग वाढल्यामुळे जयेश चा प्लॅन देखील अपयशी झाला, पण आता मधून ओरडणाऱ्या मुलामुलींना काहीतरी स्पष्टीकरण सांगावं लागेल.
म्हणून त्याने मी पळून जायला न व्हे तर त्या खालील चार लोकांची फजिती करायला म्हणून दाराकडे आलो असं भासवायला बसच्या दारातूनच जोरजोरात, "चला नवली फाटा आहे का? चार सीट नव्हती फाटा ? तीस रुपये फक्त." असं ओरडायला लागला आणि मोठ्याने हसायला लागला. त्या खालील लोकांनी ते ऐकलं आणि ते बस कडे धावत आले पण तोपर्यंत बस खूप पुढे निघून आली आणि त्यांची फजिती झाली . तसा जयेश आणखी हसायला लागला. त्याच हसणं वरवरचं आणि खोटं होतं, पण त्याची मात्र चालली आणि बसमधील ते मुलंमुली देखील त्या लोकांची कशी फजिती झाली म्हणून विकृत पणे हसू लागले. त्यांना वाटलं कि जयेश खरंच पळायला नव्हे तर त्या लोकांची फजिती करायला गेला होता.

पण तरीही त्यांना एवढं कळलं होतं की, हे तिघे पळण्याच्या प्रयत्नांत आहेत आणि यांनी पळू द्यायचं नाही. बसमध्ये पुन्हा ह्या तिघांसाठी भीतीदायक वातावरण झालं होतं. कारण पलायन करण्याचे तीन प्रयत्न अपयशी ठरले ते एकमेकांमध्ये समन्वय नसल्यामुळे.
आता मात्र पश्चिमेकडून ऊन जाणवत होतं. बसमधलं वातावरण त्यांच्यासाठी अतिशय भयानक भूतबंगल्यापेक्षाही भयावह वाटत होतं. त्या छोट्याश्या रस्त्यावरून छोटेमोठे झटके खात बस परतीच्या रस्त्याला पुढे पुढे सरकत होती.
साधारण अर्ध्या तासाने आता बस नवली गावाजवळ आली, आता इथून चार किलोमीटर वर हायवे त्यामुळे तिघे थोडे हुशार झाले होते. इतक्यात अचानक एका मोठ्या खड्ड्यात बसच एक चाक गेलं, तसा जोराचा झटका सगळ्यांना बसला सगळे सीटवरून खाली पडले. पुढे बसलेले जयेश आणि चंदू ने मात्र ह्या संधीचा फायदा घ्यायचाच हे ठरवलं. घाईघाईत मागे आपलं काही पुरावा या विकृतांकडे राहू नये म्हणून दोघांनी बॅग ओढली व धावतच जवळ असलेल्या दाराकडे सुटले. जयेशने दार उघडलं आणि यावेळी त्याने चंदूची वाट पहिली चंदू दाराजवळ आला तसं त्याने त्याला बसच्या बाहेर ढकललं, तोपर्यंत मागून सगळेच धावत पुढे आले, ते येईपर्यंत जयेश देखील भर्रकन आपली बॅग घेऊन बसच्या बाहेर पडला. आकाशने बसचा ब्रेक लावला पण त्याला बाहेर पडायला संधी मिळेपर्यंत मागचे सगळे बसच्या दारापर्यंत आले जिथून आकाश अगदी जवळ होता त्यामुळे आकाशच काहीच चाललं नाही.

चंदू खूप घाबरला होता त्याचे हातपाय थरथरत होते आपण बसच्या बाहेर आलो यावर त्याला विश्वासच बसत नव्हता, जयेश ने त्याला स्वतःच्या आधी बाहेर ढकललं यामुळे तो वाचला होता .
इतक्यात त्या सगळ्यांनी जयेश व चंदू ला आवाज दिला,"काय रे का उतरलास ?, काय झालं ?"
बिथरलेल्या अवस्थेत चंदू बोलला, "हा आमच्या नातेवाईकांचा गाव आहे, परत जाण्यापेक्षा त्यांना भेटूनच येतो आम्ही उद्या शहरात "
इतकं बोलून जयेश चंदूला घेऊन झटकन बसच्या पाठीमागून आकाशच्या ड्रॉयव्हरच्या विन्डोकडून त्याला घ्यायला आले पण ड्रॉयव्हर सीट वर दुसराच मुलगा बसलेला होता. त्यानेबस चालू केली व निघाला. त्यांनी आकाश ला दुसऱ्या सीट वर बसवलं होतं आणि दुसरा मुलगा आता बस चालवत होता. आकाशाची आणि या दोघांची नजरानजर झाली आकाश खूप भयभीत झालेला होता.
इतक्यात आकाशचं लक्ष सीटवर गेलं तिथे खाली जयेशचा मोबाईल घाईत निघताना पडलेला होता त्याने प्रसंगावधान राखत तो मोबाईल गुपचूप उचलला आणि खिडकीतून हात बाहेर काढला . त्या बरोबर बसमधील इतर तीनजण तो मोबाइल हिसकाविण्यासाठी धावले.
बस पुढे निघत होती जयेश बसच्या मागे मागे धावत आकाशला बाहेर आणण्यासाठी विचार करू लागला, तोच त्याला खिडकीतून आकाशच हात बाहेर आलेला दिसला तो जयेश ला त्याचा मोबाईल घ्यायला बोलवत होता, जयेश आणखी जोरात धावत गेला पण बस चा बेग देखील वाढला होता त्यामुळे आकाशने मोबाईल तसाच रस्त्यावर फेकला जेणेकरून हे लोक मोबाईल वरून माहिती मिळवून जयेश चा पाठलाग करणार नाहीत .
बस भरधाव वेगात पुढे निघाली तिला पकडणं अशक्यच होतं . पाणावलेल्या डोळ्यांनी जयेशने खाली पडलेला मोबाइल उचलला, सुदैवाने तो चालू होता.

त्याने मागे वळून पाहिलं तर चंदू त्याची बॅग घेऊन नवली गावाच्या गल्ल्यांमध्ये पळत चालला होता, त्याचे खरोखर त्या गावात नातेवाईक होते हे जयेश ला माहित होत त्यामुळे घाबरलेला चंदू नातेवाईकांकडे जाईल म्हणून जयेश चंदू विषयी निर्धास्त झाला व आता आकाशला कस वाचविता येईल यासाठी जोरात विचारचक्र फिरवू लागला.
नवली गाव तस मोठं होतं त्यामुळे इथे एखादी छोटी मोठी पोलिस चौकी असणारच, मग ताबडतोब जयेशदेखील गावात धावत सुटला. गावाच्या गल्ली बोळ , मुख्य रस्ता सगळ्यांवरून धावत तो चावडी जवळ आला तिथे त्याने एकाला विचारलं कि ,"इथे पोलीस चौकी आहे का ? "
"पोलीस चौकी हिथं न्हाय पर हायवेला हाये, फाट्यावर " त्या माणसाने त्याला माहिती पुरवली.
आता फाट्यावर म्हणजेच हायवेच्या दिशेने जिकडे बस गेली त्या दिशेने तो धावत सुटला.
खांद्यावरील बॅग सावरत, तो धावतच होता, कारण यावेळी एकमेव आशा त्याला पोलिसांकडूनच होती.
त्याच्या दुर्दैवाने त्याला एकही वाहन मिळालं नाही त्यामुळे तो तब्बल पाऊण तासात फाट्यावर पोचला . आणि त्याचवेळी मागून एसटी बस आली जी आता त्याच्यासाठी बिनकामाची होती. हीच बस तासाभरापूर्वी आली असती तर तो फाट्यावर लवकर पोचू शकला असता.
बस हायवेला असलेल्या मोठ्या स्टॅन्ड मध्ये शिरली, तिच्या पाठोपाठ जयेश देखील स्टॅन्ड मध्ये कोणी पोलीस मिळेल म्हणून गेला.
इथे मात्र त्याच्या सुदैवाने त्याला एक महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी दोन सहकारी पोलिसांसह दिसली. जयेश धावतच तिच्याकडे गेला, आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.
महिला पोलीस अधिकारी यांच्याकडे बघू लागली कि हा असा कसा समोर येऊन उभा राहिला. धाप लागल्यामुळे त्याला बोलता येत नव्हतं. कसबस तो बोलायला लागला,
"स.. सर ... " चुकून तो महिला अधिकाऱ्याला सर बोलला.
"सॉरी मॅडम ... "
"हा ठीके ठीके काय झालं बोल आधी", ती महिला पोलीस अधिकारी बोलली .
"मॅडम माझ्या मित्राला वाचवा, तो मोठ्या संकटात आहे , त्याचा खून होऊ शकतो मॅडम "
"अरे बाप्परे काय झालं नीट सांग जरा, तू कुठून आलास ? तुझा मित्र कुठे आहे ? "
"मॅडम तो एका बस मध्ये आहे जी शहरात गांधी चौक भागात जाणार होती, त्या बस मधेच काही जण होते जे त्याला मारणार आहेत "

"मॅडम , मला वाटतं बस शहरात पोचली असेल कारण तासभर झालाय बस जाऊन , तुम्ही प्लिज गांधी चौक पोलीस स्टेशन ला फोन करून त्या बसला पकडायला सांगा, प्लिज काहीतरी करा मॅडम", जयेश गयावया करत बोलत होता.
"नाव काय आहे तुझ्या मित्राचं ?"
"आकाश वाटेकर नाव आहे मॅडम"
त्या महिला पोलीस अधिकारी ने ताबडतोब स्वतःचा मोबाईल काढला व शहरातील गांधी चौक पोलीस स्टेशन ला फोन केला. त्यांना जयेशने दिलेली सर्व माहिती सांगितली.
तिकडून फोनवर जे त्यांना ऐकायला मिळालं ते एकूण त्यांना देखील धक्का बसला. पूर्ण बोलून झाल्यावर त्यांनी जयेशकडे पाहिलं.
"काय झालं मॅडम ?", जयेश ने विचारलं.
"गांधी चौक पोलीस स्टेशन मधून त्यांनी सांगितलं कि तुम्ही जे म्हणताय ते घडून गेलंय , आसरी घाटात आकाश वाटेकर नावाच्या तरुणाचा खून झाला म्हणत आहेत ते, त्यांनादेखील आत्ताच माहिती मिळालीय, "पण खुनी किंवा त्यांची बस याचा काही मागमूस नाहीये "
जयेश साठी हा मोठा धक्का होता तो आता पुरता घाबरला होता.

आकाशने जाताना जयेश चा मोबाईल बसमधून बाहेर फेकला, म्हणजे त्या लोकांनी मोबाईल मधून माहिती काढून जयेशला शोधून त्याचा पाठलाग करू नये म्हणूनच फेकला होता.


(वाचक मित्र आणि मैत्रिणींना विनंती आहे की मी कथा लिहितो ती ती तुमचा विचार करूनच लिहिलतो इतर कोणतीही अपेक्षा ठेवत नाही फक्त तुमच्या अभिप्रायचा मी भुकेला आहे. कृपया कथा कशी वाटली हे तुमच्या समीक्षेतून किंवा मेसेज मधून कळवा, मला पुढील भाग लिहायला स्फूर्ती येईल.)

क्रमश :

Comments

Popular posts from this blog

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ५

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ७

पाठलाग भाग 1 (मराठी भयकथा )